Close

स्पेक

स्पेक
कुठे बाहेर जाण्याच्या गडबडीत घरात एन्ट्री मारली की

डोळ्यांवरचा स्पेक काढणे आणि विचार न करता ठराविक उंचीवर असलेल्या मोकळ्या जागेवर ठेऊन देणे,मग ती जागा बसायचा सोफा असो, ड्रेसिंग टेबल असो, फ्रीज असो वा स्टडी टेबल असो, ही माझी नित्त्याची अजागळ सवय! जशी आपली श्वसन क्रिया आपल्या नकळत सुरु असते, काहीशी तशीच ही माझी स्पेक काढून ठेवण्याची क्रिया माझ्याकडून बहुदा माझ्या नकळतच घडून जाते! मग साहजिकली ठेवतानाच लक्ष देऊन न ठेवल्यामुळे आवरून घराबाहेर पडताना तो स्पेक कुठे ठेवलाय त्याची शोध मोहीम करावी लागते! मग अशावेळी अर्थातच स्वतःचा काही क्षण तिरस्कार वाटतो, पण काही वेळातच कशाला स्वतःवर राग करून आपणच स्वतःला दुखावून घ्या म्हणून माझ्यातले फ्लेक्झिबल व्हर्जन मला सांभाळून घेते!

माझ्या याच सवयीच्या संलग्न काल एक किस्सा घडला. एका ठिकाणी लवकर पोहचायच्या गडबडीत धावत धावत घरात एन्ट्री मारत मी स्पेक सोफ्यावर टाकून फ्रेश व्हायला गेलो. फ्रेश होऊन बाहेर पडताना जेव्हा स्पेक हातात घेतला तेव्हा पाहतो तर काय त्याच्या काचेच्या दांड्याशी असलेल्या साधारण ऐंशी-नव्वद अंशाच्या कोणाचा पस्तीस-चाळीस वगैरे अंशाचा कोन होऊन बसला होता. त्याचा आकार पहाता त्यावर हॉल मध्ये फुटबॉल खेळणारे अनिष - अन्वेष किंवा त्यांच्या मधे मधे लुडबुड करणारी अन्वी यांपैकी कोणीतरी एकजण त्या स्पेक वर चुकून बसल्यासारखे वाटत होते. स्पेक ची अवस्था पाहून अर्थातच यावर कोण बसले म्हणून मी ओरडणार तोच घरातील ही तीन चार जण आसपास गोळा झाली आणि मला असच पाहिजे, स्वतःलाच वस्तू ठेवताना कळले पाहिजे असा घरचा आहेर देऊन गलका करू लागली. सरळ सरळ चूक आपलीच असल्याचे कळत असल्याने मी ही पुढे काही न बोलता मूग गिळून बाहेर पडलो, इंजर्ड स्पेक ला गाडीच्या डिकीमध्ये ठेवले आणि त्याला तडक घरापासून दिड दोनशे मीटर्स वर त्याचा प्रोव्हायडर असलेल्या टायटन आय प्लस च्या शोरूम मध्ये त्याला पुर्वतत करण्याच्या आशेने घेऊन गेलो.

गॉगल स्टाइलड टायटन आय प्लस ची फ्रेम वुईथ उन्हात गेल्यानंतर गॉग लूक घेणाऱ्या कोटेड डे नाईट ग्लासेस असे सारे मिळून घेतला तेव्हा साधारण साडे सहा एक हजार पर्यंत गणित गेलेला माझा तो आज साधारण दीड एक वर्षे वय असलेला स्पेक हवालदिल अवस्थेमध्ये टायटन आय प्लस च्या म्यानेजर च्या हातात होता.

'सर, इसे सिधा करणे के लिये पक्कड लगानी पडेगी. सर्व्हिस तो फ्री है, उसका कोई इशू नही पर रिपेअर करते समय पक्कड युज करेंगे तो फ्रेम ब्रेक होणे के चान्सेस बहोत है, क्या करे?', असे म्हणून त्याने मला दुविधा मनस्थितीत टाकले. त्याला जे काही करायचं त्याला हो म्हणण्यावाचून दुसरा काहीच पर्याय मला सुचत नव्हता, खरंतर सुचायला दुसरा काही पर्यायच नव्हता.

"आता क्या करे काय, भगवान का नाम ले और लगा जो कुछ पक्कड वगैरा लगानी है ओ", असं प्रत्युत्तरादाखल बोलून मी त्याला माझी दीड वर्षाने डेप्रीशियेट झालेली असली तरी माझ्या काळजात घर करून राहिलेली साडे सहा हजारी मालमत्ता टेक्निशियन च्या हवाली करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला.

"हां सर, थोडी देर बैठीये प्लिज, आपको बस एक रीसक फॉर्म भरना पडेगा!", असे म्हणत त्याने मला शेजारी असलेल्या चेअर वरती बसायची विनंती केली.

"रीसक फॉर्म?", मी बसता बसता न कळल्याच्या भावात त्याला प्रतिप्रश्न केला.

"हां ये रीसक फॉर्म, रिपेअरिंग करते समय बाय चान्स चीज डॅमेज हो जाती है तो सेफटी के तौर पर हम ये फॉर्म कस्टमर से पेहलेही भरके लेते है", असे सांगत त्याने एक फॉर्म माझ्या समोर ठेवला.

अच्छा याला 'रिस्क फॉर्म' म्हणायचे होते तर, आधीच या सडन स्पेक ब्रेक ने सक झालोय, आता तू हा रीसक फॉर्म वगैरे भरायला लावून री-सक कर असं मनातल्या मनात म्हणत मी तो फॉर्म भरायला लागलो. हॉस्पिटल मध्ये पेशंट च्या ऍडमिशन चा फॉर्म भरावा असाच काहीसा फील होता तो! फॉर्म भरून मी ओटी मध्ये पेशंट ला डॉक्टरच्या हवाली करून बाहेर आत काय होतंय याची कल्पना करत डॉक्टर बाहेर येण्याची वाट पहात बसावं तसं फिंगर्स क्रॉस करून टेक्निशियन बाहेर यायची वाट पहात बसलो.

थोड्याच वेळात आयसीयू मधून डॉक्टर बाहेर यावा तसा रुमालाच्या शोधात असलेला टेक्निशियन हातात स्पेक घेऊन बाहेर आला. मी उत्साहाने त्याला स्पेक ची कंडिशन विचारली, मऊ रुमालाने स्पेक च्या ग्लासेस आबदार पुसणारी त्याची प्रसन्न भावमुद्राच मला माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन गेली!

पुन्हा नव्वद अंशाच्या आहे त्या कोनात आलेला माझा स्पेक त्याला काहीही इजा होऊ न देता अत्यंत कुशलतेने रिपेअर केल्याबद्दल मी त्याला एक मोठ्ठाला थँक्स म्हणत त्याच्याकडून आपल्या हाती घेतला. त्याला डोळ्यांवर ठेवताना, "बाबा, आज पुन्हा मरता मरता वाचलोय, आता तरी शहाणा होऊन या निर्जीवाला काळजीपूर्वक व्यवस्थित ठिकाणी ठेवत जा", जणू असेच तो मला म्हणत होता! शोरूम मधून बाहेर आल्यानंतर गाडीवरून परतताना ही पुढे अजून चार ओळी माझ्या स्पेक ने मला ऐकवल्याच :

विचारांचे भोवरे पोसत
तू आपल्याच नादात जगतो 
मोठमोठ्या कल्पना चिंतत
छोटंछोट्या गोष्टी मात्र दुर्लक्षित करतो!

असे केलेले दुर्लक्ष 
तुला वेळ गाठून लक्ष करते 
त्यावेळी विसरलेली साधी गोष्टही 
तुला फार महागात पडते!

एवढं साधं कसं लक्षात राहिलं नाही? 
असा तेव्हा स्वतःला तू प्रश्न करतो 
गोष्टीला 'साधं' समजतो तिथंच चुकतो 
अस उत्तर मग तू तूलाच देतो!

विसरणं ठीक आहे रे 
पण विसरायची सवय लागून घेऊ नको
एकदा जर ती जडली 
तर ती कायमची नडल्यावर मला विचारू नको!

- D For Darshan

Loading...
Loading...