Close
In Travel

Tour A Rajasthan - Part III

Tour_A_Rajsthan ( Part III )
( Link to part I in case if you would have missed

  https://m.facebook.com/story.php?story_fbid=10209966929089938&id=1836426167)

( Link to part II in case if you would have missed  
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10209966929089938&id=1836426167
)

तयारी_प्रभातफेरीची

आदल्या दिवशी रात्री मरेपर्यंत हसून हसून झोपताना अडीच तीन च्या मध्ये कुठेतरी दिसणाऱ्या घड्याळाच्या काट्याकडे पाहून असे वाटत नव्हते कि आम्ही सकाळी लवकर उठू आणि महाराष्ट प्रदेश माहेश्वरी युवा संघटन नियोजित सालासार मधील प्रभात फेरीमध्ये सहभागी होऊ! परंतु सालासारच्या बालाजीने ती जबाबदारी जणू स्वतःवर घेतली आणि एवढ्या उशिरा झोपूनही आम्हाला सकाळी वेळेत जाग आली. वेळेचे बंधन असल्यामुळे अजिबात कोणी कोणाची छेड न काढता या सकाळी साऱ्यांच्या राजस्थान भूमीवरच्या तिसऱ्या आणि दौऱ्यातल्या शेवटच्या आंघोळी सुखाने पार पडल्या. स्नान सेशन नंतर स्वतःला प्रभात फेरीसाठी नटविण्याचा महान सेशन सुरु झाला!

प्रभात फेरीसाठी ड्रेसकोड ठेवला गेला होता, मस्त पांढरा शुभ्र सलवार कुरता! अशा कार्यक्रमांमध्ये ट्रॅडिशनल वेशभूषा करणे याची मजा काही औरच! मी परिधान केलेल्या सलवार कुरत्यावर रुटीन प्रमाणे परफ्युम घेऊन त्याची नेहमीच्या स्टाईल ने फूस-फूस करून फवारणी करायला लागलो तोच मला पाठीमागून आवाज आला, "ये दर्शा थांब, हे काय करतोय? आज मी तुला परफ्युम कसा मारायचा ते शिकवतो." पॉश कुर्ता घालून तयार झालेल्या धीरजने माझ्या हातून परफ्युम ची बॉटल घेतली आणि मला अक्रॉस उभं राहून त्याच्या समोरून काही पावले आडवे चालत जायला सांगितले. मी चालायला सुरुवात केली तोच त्याने परफ्युम माझ्या चेहऱ्याच्या उंची पासून अगदी गुडघ्याच्या खाली पर्यंत फूस फूस करत नेला. म्हणजे जेणेकरून मी कार्यालयाच्या दारात लावलेली अत्तरदानी असते तिच्या समोरून अत्तरस्नान करून पुढं गेल्यासारखं झालं ते! धीरजशेठ म्हणाले सारडांच्या भरतनी दिलेलं शिक्षण आहे हे आम्हाला. नंतर तोच प्रयोग त्याने सारडांच्याच वकीलसाहेबांवरही केला.

सहसचिव भाई अमितजी सोडून आम्ही सार्यांनी ड्रेसकोड फॉलो केला होता. रात्री झोपेमुळे सुजलेले डोळे जरा बरे दिसावेत यासाठी थोडासा नट्टापट्टा करून त्या मस्त पांढऱ्या शुभ्र युनिफॉर्म मध्ये परफ्युम चाही युनिफॉर्म सुगंध बरोबर घेऊन आम्ही दोनशे सात ला लॉक करून भुवनचे जीने उतरलो आणि लागलीच चहा खारी वर ताव मारणाऱ्या फेरी साठी रेडी झालेल्या क्राऊड मध्ये चहा कॉफीचे कप घेऊन मिसळून गेलो. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतून आलेले जवळपास साठ-सत्तर भाई भुवन पासून सालासार बालाजी मंदिरापर्यंतच्या दिड दोन किलोमीटर च्या प्रभातफेरीसाठी सेट झाले होते. पवित्र सालासार नगरीच्या त्या पवित्र मार्गावरून आम्ही फेरीबरोबर बालाजीच्या आमच्या दुसऱ्या दर्शनासाठी मार्गक्रमण करू लागलो. अर्थातच जाताना फोटोज निघत होते, व्हिडीओज रेकॉर्ड होत होते, बजरंग बली चा जयजयकार होत होता,एकमेकांच्या नवनवीन ओळखी काढत समूहाचा रस्ता कटत होता.

सालासार_बालाजी_दर्शन

पाहता पाहता मंदिर आले, समूहाने आलेल्या भाईंनी सामूहिक पद्धतीनेच अगदी शिस्तीने दर्शन घेतले. साऱ्यांचे दर्शन झाल्यानंतर अस्सल एनर्जी तेव्हा मिळाली जेव्हा आम्ही मंदिराच्या आवारात सामूहिक रीत्या तुलसीदास लिखित हनुमान चालीसा गायली. दोन दोह्यांच्या मध्ये चाळीस चौपाईया असलेली ती हनुमान चालीसा त्या मंदिरात एका सुरात गाताना शरीरामध्ये तयार झालेली ती व्हायब्रेशन्स, ती विलक्षण प्रेरणादायी मानसिकता, निरंतर आपल्या सोबत असावी, फक्त आठवायचा अवकाश आणि तीने येऊन आपल्याला त्या सामूहिक पठणानंतरच्या मानसिक स्थितीमध्ये घेऊन जावे, अशी मनोमन प्रार्थना करून आम्ही मंदिरातून बाहेर पडलो.

मंदिराच्या बाहेर संपूर्ण समूहाचा देवाच्या दारातील त्या आठवणीची साठवण म्हणून एक छान मोठ्ठाला ग्रुप फोटो काढला गेला. त्या ग्रुप फोटो पाठोपाठ आपापल्या विभागातून ग्रुप ग्रुप ने आलेल्या भाईंनी आपापले वेगवेगळे ग्रुप फोटोज काढण्याचा सपाटा सुरु केला आणि त्या सेशन बरोबरच भाईंचा तो मोठ्ठा गठ्ठा पुन्हा छोट्या छोट्या समूहांमध्ये विभागला गेला. सकाळच्या प्रहरीही विलक्षण गरमी असलेल्या तापमानात पोटात काहीतरी थंडगार ढकलून आपली तहान शमविण्याचा निर्णय आम्ही घेतला. निर्णय होतो ना होतोच तोवर समोरच्या लस्सी वाल्याचा आमच्या नजरेने वेध घेतला. देवदर्शन झाले आता चला स्वतःला लस्सीचा नैवेद्य दाखवू असे वकीलसाहेब म्हणाले अन लागलीच आम्ही उर्वरित पाचही जणांनी त्यांना अनुमोदन दिले. लस्सी वाल्याने प्युअर राजस्थानी स्टाईल मधली मातीच्या वाडग्यात फ्रिज करून ठेवलेली थंडगार लस्सी आमच्या समोर पेश केली, त्या गरमीत ती थंडगार लस्सी आम्ही साही भाईंनी एका घोटात टॉप टू बॉटम मारत पोटात ढकलली.

आदल्या दिवशी येऊन गेल्याचे कारण आणि राजस्थान भूमीवरच्या शेवटच्या दिवसाचे टाईट स्केड्युल लक्षात घेऊन फारसा वेळ न दवडता आम्ही परतीचा प्रवास सुरु करण्याच्या हिशोबाने भवन चा रस्ता धरला. या बालाजी मंदिरापासून भवनच्या दिड दोन किलोमीटरच्या पायी प्रवासात आमच्या अखंड प्रवासातील 'एपिक' किस्सा घडला.

कॅमेऱ्याने_जोड्या_जुळ(व)ल्या

कोणत्याही मोठ्या देवस्थानचे आवार हे भीक मागून पोट भरणाऱ्यांसाठी आजघडीला क्रीम पॉईंट असतो. सालासारचे हे मंदिर याला अपवाद कसे असेल? या टप्प्यामध्ये भीक मागणाऱ्यांमध्येही आम्हाला इनोव्हेशन पाहायला मिळालं. त्या टप्प्यामध्ये विशिष्ट सेक्शन्स करून ते सेक्शन महिला भिकाऱ्यांच्या गटांनी वाटून घेतले होते. म्हणजे प्रत्येक ग्रुप ची एक मर्यादित रेंज होती. त्या ठराविक रेंज मधेच त्यांनी काय तो आपला बिझनेस करायचा. त्या पट्ट्यात ती त्याच्या क्लायंट ला पटवू शकली तर तो तिचा, रेंज च्या पलीकडे गेला की ती त्याच्याकडून भीक स्वीकारू शकत नसे. आपल्या रेंज मध्ये आलेल्या क्लायंट चा रेंज मधे आल्यापासून बाहेर जाईपर्यंत जो त्याचा पाठलाग होई तो कौतुकास्पद होता. कन्व्हिन्स, कन्फ्युज, करप्त असे मार्केटिंग चे तिन्ही पेनतरे त्या भीक मागणाऱ्या वापरत होत्या. एक विशिष्ट प्रोफेशनलपण होत त्यांच्या त्याही कामामधे!

"इत्तो गोरो छोरो तू तो बड्डा सेठ ज्यान दिखे हे" सारखे आमची छाती फुगवणारे वाक्यप्रयोग करून त्या आम्हाला त्यांना भीक देण्यासाठी प्रवृत्त करण्याचा पराकोटीचा प्रयत्न करत होत्या. बर एकाला दिले पैसे तर लगेच ज्याने दिले त्याला दुसरी येऊन चिकटत होती. चालताना डायलॉगबाजी करत पाठलाग तर अशा करत होत्या कि वाटावं जणू लग्न झालेले जोडपेच जोडीने चालले आहे. त्यात आमची वेषभूषाही फ्रेश नवरदेवांसारखीच होती. सफेद पांढऱ्या कुर्त्यावर चढवलेला भगव्या रंगाचा मंडळाने दिलेला दुपट्टा उपरण्यासारखाच वाटत होता. हा आयता समोर दिसत असलेला नजारा कॅमेऱ्यामध्ये फोटोरूपात कैद करण्याची हाव मग पाहणाऱ्याला कशी होऊ नये? मी दादांना दोन तीन अशाच जोडी लागलेल्या फ्रेम्स मध्ये टिपले आणि इकडे बिलंदर आनंदने मलाही एक जणीबरोबर तशीच जोडी दिसावी अशा फ्रेम मध्ये शूट केले.

कसे बसे त्या भिक्षुक महिला संघटनेपासून सुटका करून घेऊन आम्ही हसत खेळत भवन वर पोहचलो. रस्त्यात लागणारे खाटू शामजींचे देवस्थान करून रिटर्न फ्लाईट साठी जयपूर एअरपोर्ट गाठायचा क्रम होता. भवनवर पोहचल्या नंतर आम्ही कार्यक्रमाची सलवार कुर्त्याची वेशभूषा उतरवून पुन्हा कॅज्युअल्स अंगवस्त्रे परिधान केली. तोपर्यंत खाली आमच्या अनुपसिंगनी इंनोव्हा पार्किंग मधून बाहेर काढून निघण्यासाठी सेट केली. दोनशे सात च्या हास्याठवणी मनात ठेऊन तिला चेक आऊट चे कुलूप लाऊन, चावी काऊंटर वर जमा करून, भेटेल त्याला चला, भेटू, या साताऱ्याला म्हणत इनोव्हामधे स्थानापन्न झालो अन अनुपजींच्या सारथ्याचा लाभ घेत खाटू श्यामजीकडे मार्गस्थ झालो.

दूरपर्यंत कुठेही आडवळन दिसत नसणाऱ्या रुंदच्या रुंद डांबरी सडकेवरून आमची इनोव्हा झोकात मार्ग कापत होती. मी आणि दादा मागच्या सीट वर, सीएसाहेब, वकीलसाहेब आणि जिल्हाध्यक्ष मधल्या सीटवर तर सहसचिव ड्रॉयव्हर अनुपजींच्या डाव्या बाजूच्या फ्रंट सीट वर बसले होते. पोट धरून हसत हसतच काढलेले फोटो मोबाईल ग्यालरीज मध्ये सर्फ करायचा सेशन सुरु झाला.

वकीलसाहेबांनी आनंदने माझा त्या महिला भिक्षुकी शेजारी असताना काढलेला फोटो "दर्शनरी नवीन जोडी, भगवान रा दर्शन लेऱ वापस आवताना" अशा कॅप्शन सहीत आमच्या युवा संघटनच्या व्हाट्सऍप मंत्रिमंडळ ग्रुप वरती शेअर केला आणि एकच कल्ला उडाला.

काहीच मिनिटात मला पर्सनल व्हॅट्सऍप वरती वाईफ मितालीकडून माझा तोच जोडीवाला फोटो 'ये क्या है? कौन है आपके साथ?" अशा कॅप्शन सहित आला. मंत्रीमंडळ ग्रुप वर असलेल्या माझ्या मोठ्या भावाने, आशिषने, मजेने तो पुढे मितालीला फॉरवर्ड केला होता.

मी ही मग मज्जेत अजून मज्जा करायला बायकोच्या मेसेजचा स्क्रीनशॉट काढला आणि "वकील साहेब, 'संधिरो सोनो करो' असं काल तुम्ही मोटिव्हेशनल स्पीच मध्ये आमच्या सोबतच ऐकलं हे मान्य, पण म्हणून लगेच क्लायंट मिळवायला असले उद्योग करणं हे बरोबर नाही. हे पहा, तुमच्या असल्या पानचटपणामुळे इकडे आमचा संसार घटस्फोटाकडे जायची वेळ येऊन ठेपली आहे" अशा कॅप्शन सोबत ग्रुप वर शेअर केला. झालं, साताऱ्यातील मंत्र्यांना हसायला एकच कारण मिळालं आणि त्याचबरोबर माझ्यावर सहानुभूतीच सांत्वनही सुरु झालं.

त्यापाठोपाठ वकीलसाहेबांनी लगेच दादांचा दुसऱ्या महिला भिक्षुकीसोबत टिपलेला फोटो "सिनियर लाहोटीची जुनियर लाहोटीला खुन्नस" अशा कॅप्शन ने शेअर केला, इतका परफेक्ट टिपला गेलेल्या त्या फोटोने ग्रुप वर अजून जास्ती धिंगाणा घातला.

या सर्व क्रमावर कळस चढवणारा अजून एक फोटो वकीलसाहेबांनी शेअर केला, ज्यामध्ये दादांची नवी जुळलेली जोडी, त्या महिला भिक्षूकेच्या हातात प्रसादाचा डबा, दादांच्या आणि मागून चालणाऱ्या माझ्या चेहऱ्यावर तरल हास्य होतं. "जोडीसु प्रसाद खावताना ओरु लारे छोटो देवर, तिन्या रा चेहरामाते आनंद हे" हे कॅप्शन वरून त्या फोटोला वकिलांनी जोडलं अन आम्हा साऱ्यांचं ते योगायोगे परफ़ेकत जुळून आलेलं रसायन पाहून हसून हसून पोट दुखायला लागलं.

काल रात्रीच्या हास्यकहरानंतर हा फोटो शेअरिंग चा गाडीतच रंगलेला जवळपास अर्ध्या पाऊण तासाचा हसाहाशीचा कार्यक्रम म्हणजे लिटरली कळसच होता. एवढा कहर कि इथून पुढे अर्धा तास तरी कुणी काहीही हसू येईल असं बोलायचं नाही असं आम्हाला ठरवावं लागलं!

वाढदिवस_वाडीकर_सरांचा

इनोव्हा खाटू शामजी देवस्थानाकडे कूच करत होती. सहसचिवांना विंडो सीट देऊन मी अनुपसिंग नी लावलेल्या राजस्थानी लोकगीतांच्या तालावर ठेका धरत फ्रंट सीट वर बसलो. आदल्या दिवशीच्या जागरणामुळे बहुतेकांनी डोळे मिटून डोक्यांना सीट्स वर रेस्ट दिली होती. मोकळया मिळालेल्या वेळाचा फायदा घेऊन मी सेल काढून वाढदिनाच्या योगे त्या दिवशीचे उत्सवमूर्ती असलेले माझे गुरुवर्य श्री संजीव वाडीकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा लिहायला घेतल्या. त्या लिहिताना फेसबुक ला मनोमन भरपूर वेळा थँक्स म्हणू वाटलं कारण त्या माध्यमा मुळेच आज ज्यांच्या मुखी नुसते आपले नाव ऐकायला जीव तरसायचा त्यांच्याशी आज मनमोकळा संवाद साधायची संधी प्राप्त झाली होती. काही वेळात ओळीला ओळ जोडत माझी रचना तयार झाली, ती पोस्ट करायच्या आधी झोपलेल्यांना उठवून त्यांना वाचूनही दाखवली. वाचून दाखवलेलं लिखाण साऱ्यांना मनापासून भावलं अन हर्षभरित अंतःकरणाने मी ते लागलीच फेसबुक वर सरांना टॅग करून पोस्टही करून टाकलं.

खाटू_श्यामजी_दर्शन

पाहता पाहता शंभर एक किलोमीटर रन करून इनोव्हा खाटुश्यामजी ज्या द्वारी येऊन स्थिरावली. 'चालो श्यामजी आयग्या ' म्हणत साऱ्यांनी आळस मोडला आणि राजस्थान भूमीवरच्या शेवटच्या देवदर्शनासाठी गाडीतून पायउतार केला.

बाकी देवस्थानांच्या तुलनेत राजस्थानातील सिकार जिल्ह्यातील या खाटू गावी विराजित श्यामजींच्या देवस्थानी प्रचंड गर्दी होती. तीन ते चार मोठमोठी वळणे घेतलेली भक्तांची भलीमोठी लाईन आम्हाला दुरूनच नजरेस पडत होती. दर्शनाच्या लाईन मध्ये उभे राहायला आम्ही जवळच सोय असलेल्या पाण्याने हात धुवून घेतले. जो जास्त वेळ शांत राहील तो आनंद कसला. पाण्याने हात धुवून झाल्यानंतर अध्यक्षांनी उगाचच दोन्ही हात आभाळी उडवले अन त्यांच्या या कृतीने विरुद्ध बाजूला जाणाऱ्या महिलेच्या अंगावर पाण्याचे चार थेंब पडले. अचानक कुठून भर उन्हात पाऊस पडायला लागला म्हणून त्या महिलेने भोळ्या आश्चर्यचकित नजरेने आकाशात पाहिले अन इकडे आपण काहीच केले नाहीच्या थाटात अध्यक्ष लाईन मध्ये उभे राहायला पोहचले.

लाईन मध्ये उभे राहिल्यानंतर धीरजने खाटू शामजींची थोडी माहिती आम्हास दिली. घटोत्कचाचा पुत्र बार्बारीक याने महाभारतातील युद्धात भाग घेऊ नये म्हणून ब्राह्मण वेशात येऊन स्वयं श्रीकृष्णाने त्याचे मस्तक मागितले आणि बार्बारिकाने स्वतःचे मस्तक छाटून श्रीकृष्णाला अर्पण केले. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला त्याची 'श्याम' या नावाने पूजाअर्चा केली जाईल आणि तो भक्तांच्या इच्छाअकांक्षा पूर्ण करेल असे वरदान दिले. नंतर कलयुगामध्ये एक गाय जेव्हा या जागी उभी राहिली तेव्हा तिला फुटलेला दुधाचा पाझर काही केल्या थांबत नव्हता. पाहणाऱ्यांना अचंबा होऊन ती जागा खोदली गेली आणि तिथे बार्बारीक म्हणजेच खातूश्याम च्या पुरलेल्या मस्तकाचे अवशेष सापडले. तदनंतर तत्कालीन खाटू राजाला झालेल्या स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे त्या जागेवर हे खाटूश्यामजीचे मंदिर उभारले गेले ज्याचे आज आपण दर्शन घेणार आहोत. जय खाटूशामजिरी म्हणून धीरजने आपली अशी छोटीसी रंजक कथा संपवली अन मंदिरात पोहचण्याची आस आम्हाला लागली.

नेहमीप्रमाणे याचा असा फोटो काढ, त्याचा तसा फोटो काढ असले फाजील चाळे करत करत आम्ही लाईन मध्ये पुढे पुढे सरकत होतो. थोड्याच वेळाच्या प्रतिक्षेने आम्ही मंदिरात पोहचलो अन श्यामजींच्या मूर्तीसमोर दर्शन घेण्या उभे ठाकलो. एकामागून एक असे साही भाईंचे दर्शन झाले, मोठमोठ्ठाले खोबऱ्याचे तुकडे अन बत्तासे आम्हाला प्रसाद म्हणून मिळाले.

बाहेर येऊन एक दोन थंडगार पेये रिचवून थोडीफार खरेदी आम्ही केली. अन थोडाफार आधार मिळालेल्या पोटांना घेऊन इनोव्हा गुलाबी शहराकडे मार्गस्थ झाली.

मजा_जेवणाची

जाता जाता रस्त्यामध्ये एका हॉटेल वर अनुपसिंगनी इनोव्हा थांबवली. दणकून भूक लागलेली असूनही ओव्हरऑल हॉटेल चा सेटप पाहून, इथे नको पुढे जरा मस्त राजस्थानी ढाच्याच्या कॉटवाल्या ढाब्यावर जेवायला थांबवा अशी विनंती अनुपसिंगना आम्ही केली अन त्यांनी ओके म्हणून अनुमतीही दिली. पण अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, तसा रस्त्यात तसा ढाबा काही दिसेना. नंतर तसा ढाबाच काय तर जेवायला हॉटेल, रेस्टो असा काहीच सोअर्स मिळेना. ढाब्यावर जेवायची हौस मोठी, चांगले जेवलो असतो का नाही थांबलो होतो तिथेच असं एकमेकांवर खापर फोडत भाईंची गाडी शेवटी जयपुरातही दाखल झाली.

आता जवळजवळ चहापाणाच्या वेळी आम्हाला जेवायला कोण देणार हा मोठा प्रश्न होता त्यामुळे जिथे दिसेल तिथे थांबू अन मिळेल ते खाऊ असा निर्णय आम्ही घेतला. सुप्रसिद्ध ऐतिहासिक अशा राजमंदिर सिनेमागृहाशेजारी आम्ही थांबलो. तिथेच बाहेर पावभाजी अन साऊथ इंडियन पदार्थांचा गाडा आमच्या नजरेस पडला. जास्त मागे पुढे न पाहता आम्ही चार पाच वेगवेगळ्या डिशेस ची ऑर्डर देऊन मोकळे झालो. ऑर्डर तयार होईपर्यंत साताऱ्याच्या उर्वरित मंत्र्यांना आम्ही पिक्चरही बघितला म्हणून सांगायला आम्ही थिएटर च्या बाहेर दोन तीन सेल्फी काढायची हौस करून घेतली. ऑर्डर प्रमाणे आलेल्या इडलीचा पहिला घास तोंडात टाकता क्षणीच आपण सपशेल गंडलो आहोत याची प्रचिती आम्हाला आली. अपेक्षेप्रमाणे इडलीप्रमाणे बाकीही आयटम्स खाणे म्हणजे जीभ आणि महत्वाचे पोटावर अत्याचार करण्यासारखेच होते. प्रारब्धाच्या संकल्पनेनुसार एखाद्या दिवशी जर उपवासच नशिबात असेल तर तुम्ही कुणीही असा, कितीही आटापिटा करा, तुम्हाला व्यवस्थित जेवण मिळतच नाही असे तत्वज्ञान कुणीतरी सांगितले आणि रिकाम्या पोटी आम्हीही खरे आहे, खरे आहे म्हणत त्याच्या संमतीत माना डोलावल्या, त्या माना डुलता डुलता मागे वळल्या अन वाळवंटात पाणी दिसल्यासारखे 'अरे हे बघ मागे केवढे मोठे हॉटेल' म्हणणाऱ्या आशयाचा ओळी त्या मान मालकांच्या तोंडून एक साथ बाहेर पडल्या!

'आपल्यापैकी कोणालाच कसे दिसले नाही' या केवळ एकाच प्रश्नाचे उत्तर स्वतःला विचारात आम्ही सारे भाई गाडा वाल्याचे बिल भागवून त्या हॉटेल कडे निघालो. खरंतर ते त्याच्या एक्सटेरिअर वरून कोणत्याच बाजूने हॉटेल वाटत नव्हते. एखाद्या लेडीज शॉपी सारखा सेटअप असलेल्या त्या हॉटेल चे इंटेरियर अल्टिमेटच होते. कहर म्हणजे तिथे केवळ हॉटेलचं नव्हते तर त्या बिल्डिंगच्याच बॅक साईड ला म्यक्डोनाल्ड्स ही होते. स्वतःला वायझेड म्हणत दादा, मी आणि इंडिया मॅक डीमधे घुसलो आणि अध्यक्ष, वकीलसाहेब आणि सीएसाहेब त्या हॉटेल मध्ये घुसले. थोड्याच वेळात साही जण मनसोक्त ढेकर्स वगैरे देत सोप चे दाणे खात खात कोणाचे किती बिल झाले म्हणत बाहेर आलो आणि आपल्या प्रारब्धात जेवण लिहले होते फक्त जरा हौस भागवून उशिरा लिहले होते म्हणत पुन्हा इनोव्हा मध्ये बसलो.

खरेदी_कपड्यांची_अन_सातशे_रुपयांच्या_पानांची

फ्लाईटचे टायमिंग होईपर्यंत हाती काही वेळ शिल्लक होता. तो व्यतीत करायला सगळ्यात चांगला उपाय कोणता असेल या प्रश्नाच्या उत्तरादाखल कुठेतरी जाऊन थोडीफार शॉपिंग करू या उत्तरावर सारे एकमत झाले आणि एका भव्य बिल्डिंग मधल्या भव्य कापड दुकानासमोर अनुपजींनी इनोव्हाला ब्रेक मारले. योगायोगाने चहाची वेळ झालीच होती आणि बिल्डिंग समोर मस्त राजस्थानी स्टाईल चहाची टपरीही होती. दुकानात घुसायच्या आधी चहा ढोसायचे ठरले आणि टपरीवर गोळा होऊन अध्यक्षांनी लीड घेतले. चहाची ऑर्डर देताना अध्यक्षांनी स्वतः मालक असल्यासारखे टपरीमालकाला सल्ल्यावर सल्ले द्यायला सुरुवात केली. मग त्यामध्ये दूध जादा डालो, साखर कम डालो, अद्रक का वापर करना, जरा जादा उकळना सारख्या सल्ल्यांचे अध्यक्षांनी अस्खलित हिंदीतुन पारायण चालू केले. टपरी मालकाने वैतागून, "हा भाई, सब करुंगा, बस आप वहा जाके खडे हो जाये तो बडी मेहेरबानी होगी" असा अध्यक्षांना विनंतीवजा आदेश दिला आणि पाणउतारा झालेल्या अध्यक्षांचा पडलेला चेहरा आम्ही भाईंनी हसत हसत कॅमेऱ्यात टिपून "राजस्थानच्या भूमीवर साताऱ्याच्या जिल्हाध्यक्षांचा घोर अपमान" अशा कॅप्शन ने मंत्रीमंडळाच्या ग्रुप वर झळकावला.

चहा घेऊन आम्ही समोरच्या कापड दुकानात एन्ट्री मारली. सरलेल्या आयुष्यात जवळपास सगळेच या ना त्या काळात कापडदुकानदार राहिलेले साही भाई आज एकत्र कपडे खरेदी करत होते. सर्वप्रथम अध्यक्षांनी भाभींसाठी ड्रेस पाहायला सुरुवात केली. काही वेळ खरेदीचा रंग जणू असा होता की जणू अध्यक्षांच्या लग्नाचा बस्ताच सुरु आहे. अध्यक्षांपाठोपाठ आम्ही बाकी भाईंनीही त्यांच्या पायावर पाय टाकत थोडीफार खरेदी केली अन साऱ्यांच्या मिळून आठ दहा हजाराच्या किरकोळ खरेदीचा मान ठेऊन त्या दुकानदाराने क्वालिटी कॉफी आम्हाला पाजली. बिले भागवून पिशव्या घेऊन आम्ही बाहेर पडतो ना पडतो तोवर असा धो धो पाऊस सुरु झाला कि बोलायची सोय नाही. दुकानात घुसलो होतो तेव्हा ना आभाळ होत ना पावसाचं कसलंही नामोनिशाण! हो हो म्हणता काही वेळातच इनोव्हाचे वीस टक्के वगैरे टायर्स पाण्याखाली जातील एवढे मोठ्ठाले पाण्याचे तळे तयार झाले. उगाच आपण राहतो तिथं सोयी नाहीत, सोयी नाहीत म्हणून ओरडत असतो, इथंही काही वेगळी परिस्थिती नाही म्हणून त्या हि परिस्थितीत मनोमन खुश झालो.

संधी मिळवून आम्ही शेजारी असलेल्या एका पान शॉप मध्ये घुसलो. भन्नाट इंटेरियर, आर्टिफिशियल पाने फुले वापरून केलेला लायटिंगचा झगमगाट, कॉर्नर मध्ये केलेला बुक्स चा क्रिएटिव्ह सेटअप, ती पुस्तके वाचायला तिथेच दिलेली मस्त छोटीशी बैठक, हे सारं त्या पान शॉपचं वैभव पाहूनही आम्ही किमती न विचारता रुबाबात फोटो बिटो काढत मस्ताय मस्ताय म्हणत पाने खाऊन मोकळे झालो अन जरा चुकलोच. कारण सहा जनांच्या सात-आठ पानांचं बिल त्या भाईने थोडं थोडकं नाही तर तब्बल सातशे सहा रुपये केलं! झालेल्या बिलावरून वाद घालायला आलेल्या अध्यक्ष आणि वकीलसाहेबांना त्या भाईने मेनू कार्ड दाखवून शांत केलं. तुझ्या एवढ्या महागड्या पानांचं मेनू कार्ड लपवून काय ठेवलंय, लाव ना त्या भिंतीवर, लेका सातशे रुपयेत आम्ही महिनाभराची पाने खातो म्हणत शॉप बाहेर पडणाऱ्या जीभ रंगवलेल्या वकीलसाहेबांपाठोपाठ आम्ही मात्र शंभर रुपयाचं पान खाल्याच्या अभिमानाने बाहेर पडलो.

प्रवास_परतीचा

जेवढ्या लवकर तळ साचलं होतं तेवढ्याच लवकर ते ओसरुनही गेलं. इकडं तिकडं कुठंही न बघता आता थेट एअरपोर्ट वर घेऊन चला म्हणत इनोव्हाच्या शेवटच्या स्वारीसाठी आम्ही इनोव्हामध्ये बसलो अन काहीच मिनिटात प्यासेंजर्सच्या संख्येच्या हिशोबाने जगात भारी असलेल्या जयपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट वर दाखलही झालो. धिरजने अनुपसिंगजींचा हिशोब मिटवून त्यांच्या दिल्या सेवेबद्दल त्यांचे आभार मानले तर इकडे दादा आणि अमितजी बॅग्ज साठी ट्रॉल्या घेऊन आले. मी इकडे फेसबुक वर ट्रॅव्हलिंग ब्याक टू ग्रीन सिटी फ्रॉम पिंक सिटी चा स्टेटस तीन चार सेल्फीनची जोड देऊन अपलोड केला अन तिकडे आनंदशेठ अन वकिलांनी चेक इन च्या फॉर्म्यालिटीज पूर्ण करून आमचा मार्ग मोकळा केला. फावल्या वेळात आनंदने जुगाड करून एअरपोर्ट लॉन्ज वरती फुकट वाले सॅन्डविच आम्हाला खाऊ घातले. होहो म्हणत फ्लाईट ची वेळ झाली आणि ट्रॅव्हल व्हॅन मध्ये बसून धिंगाणा घालत आम्ही आमच्या मुंबईच्या दिशेने झेप घेणाऱ्या हवाईजहाजाकडे कूच केली.

असे विमानात घुसळल्यानंतर जर एन्ट्री मारल्या मारल्याच आपल्या ओळखीचे कोणी दिसले तर कसले भारी वाटते याची प्रचिती आम्हाला आत गेल्या गेल्या कार्यकारणी मिटिंग साठीच आलेल्या मुंबईच्या काही भाईंचे चेहरे पाहिल्यानंतर आली. त्यांना हाय अन लगेच 'चला सोबतच उडू' म्हणून लागलीच बाय म्हणत आमच्या सीट्स शोधत पुढे आलो. डाव्या लेन मधल्या तीन पैकी अलीकडच्या दोन सीट्स वर वकीलसाहेब आणि अध्यक्ष बसले. त्यांच्या पुढे एक सीट सोडून पुढच्या सीट च्या विंडो सीट वर एका मस्त उंचपुर्या फॉरेनर कपल शेजारी त्यांनी इंडियाला बसवले. उजव्या लेन मध्ये आनंद अन वकिलांच्या सीट ला बऱ्यापैकी पॅरलल असलेल्या सीट च्या विंडो सीट चा ताबा दादांनी घेतला अन दादांच्या डावीकडे मधल्या सीट वर माझा नंबर लागला. सहावे राहिलेले सीए साहेब बरोब्बर माझ्या पुढच्या सीट वर लेफ्टमोस्ट साईड ला परदेशी हनिमून च्या हिशोबाने आखलेल्या पहिल्या टप्प्याचा प्रवास करणाऱ्या हरियाणाच्या एका नवविवाहित जोडप्याच्या शेजारी आसनस्थ झाले.

आमच्यापैकी कोणाचाच पहिला वहिला विमान प्रवास वगैरे काही नसल्यामुळे कोणाला थोड्याच वेळात सुरु झालेले एअरहॉस्टेस चे कॅसेट ऐकण्यात फारसा रस नव्हता अन त्यांना पाहून माणूस त्यांचं ऐकायला प्रवृत्तच होण्यासारखा त्यांच्या रुपामध्येही फारसा काही दम नव्हता. त्यापेक्षा आम्ही शेजाऱ्यांशी संवाद साधण्यास प्राधान्य दिले.

सालाबादप्रमाणे अजमेर ट्रिप करून आलेले माझ्या शेजारी बसलेले मुंबईचे रहिवासी असलेले साधारण चाळिशीतले गृहस्थ लोखंडाचे मोठे व्यावसायिक होते अन सपत्नीक अजमेर टूर करून आपल्या घरी परतत होते. त्यांच्याशी मी गुजगोष्टी करत होतो तोवर मागून आनंद हातातली कापसाची पुडी दाखवत मला कानात घालायला हवा असेल तर कापूस मागून घे म्हणून खुणावू लागला. मीही लगेच शेजारून गुजरणाऱ्या हॉस्टेस ला, कुड यू प्लिज ऍरेंज मी अ कॉटन प्लिज म्हणून विनंती केली आणि तिनेही शुअर लेट मी चेक म्हणून तिथून तात्पुरती एक्झिट घेतली.

माझा प्रश्न ऐकून माझ्या शेजारी बसलेल्या त्या भाईंनी मुझे नहीं लगता ओ देगी, यहां नही अलाऊ करेंगे वगैरे वाक्ये माझ्या कानात हळू आवाजात पुटपुटायला सुरुवात केली. मला काही कळायला मार्गच नव्हता की ते असं का म्हणत आहेत अन कापसाचे बोळे अलाव करायला विमान यंत्रणेचे काय जाणार आहे! तेवढ्यात हॉस्टेस छोटीशी कॉटनची बडीशोप च्या पुडी सारखी पुडी मला सुपुर्द करून गेली आणि ती पाहून भाईंनी "अच्छा कॉटन, मुझे लगा क्वॉटर!!!" अशी भन्नाट रियाक्शन दिली! मला पडलेल्या प्रशनाचे उत्तर मला मिळाले अन तो किस्सा समजलेल्या आसपासच्याना हसूच आवरेनासे झाले जेव्हा माझे कॉटन मागणे भाईंना क्वॉटर मागण्यासारखे वाटले.

इकडे तोपर्यंत फ्लाईट ने टेक ऑफ करून स्वतःला व्यवस्थित सेट केलं होतं. हॉस्टेस नी सर्व्ह केलेले कसलीही चव नसलेले मेल फुकटच असल्यामुळे आम्ही चवीने खाऊन घेतले. त्यानंतर सियेसाहेब त्यांच्या शेजारी बसलेल्या नवविवाहित जोडप्याशी हितगुज करू लागले. हरियाणाच्या चंदिगढचा मुंडा असलेला तो लेटेस्ट नवरदेव एका प्रायव्हेट स्कुलचा मालक होता. दोन पाच मिनिटाच्या संभाषणात सियेसाहेबांनी त्याला बिझनेस विषयी पाच पन्नास सल्ले दिले. हे एक्झेम्पशन, ते एक्झेम्पशन म्हणत त्याला व्यवस्थित बाटलीत उतरवून आपले कार्डही देऊन मोकळे झाले.

हसत खेळत कळलेही नाही कधी तास सरला आणि कधी फ्लाईट लँड व्हायला सुरुवात झाली. दादांना विंडो सीट च्या विंडो तुन रात्रीच्या अंधारात रोशनाईने सजलेली मुंबई नजरेस पडू लागली. महाराष्ट्राच्या राजधानीचे ते राजस रूप कसे आणि कुठे साठवू असे जणू होत होते, तीन दिवसांच्या अंतरानंतर आपल्या भूमीवर पुन्हा पाय ठेवण्याचे वेध आम्हाला लागले होते. एकच आबदार दणका देऊन सुईईईईईन करत फ्लाईट आम्हाला घेऊन जमिनीवर धावताना जाणवली अन आमची सहा जणांची टोळी हा स्वप्नवत दौरा संपवून मुंबापुरीत पोहचली!

अध्यक्षांच्या प्रायॉर म्यानेजमेंट नुसार टवेरा आम्हाला मुंबईच्या भव्य एअरपोर्ट वर रिसिव्ह करायला आलीच होती. मुंबईच्या एअरपोर्ट चा सहलीच्या शेवटच्या टप्प्याप्रमाणे आनंद घेऊन आम्ही टवेरा गाठली. फुल्ल पाऊस अन रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात आमची मुंबई टु सातारा प्रवासाला सुरुवात झाली. रात्रीत चहाचे एक दोन ब्रेक आणि पुण्यात वकिल साहेबांना ड्रॉप करण्याचे सेशन सोडले तर एका दोरीत झालेल्या प्रवासानंतर आम्ही पहाटे पहाटे साताऱ्यात पोहचलो. उतरताना दर्शा आपल्या ट्रिप वर एखादी छोटी कविता लिही म्हणून भाईंनी माझ्या डोक्यात साप सोडला आणि त्या सोडलेल्या सापाच्या कृपेने तयार झालेल्या "टुअर ए राजस्थान" या छोट्याशा प्रवासवर्णनाचा इथेच इती झाला!

- D For Darshan

Dont miss to watch and hear video version of the same below, preferably on speakers or headsets! )

[

काव्यातील पात्रांची ( कार्यकारणी मध्ये ज्यांना भाई असे संबोधले जाते ) ओळख :

Amit Kasat - सतरंगी लेडीज शॉपी पोवई नाका, महाराष्ट्र राज्य बॉडीबिल्डिंग पंच, महाराष्ट्र प्रदेश सहसचिव
( इंडिया, द कोच )

Dhiraj Kasat - CA धीरज कासट असोसिएट्स ( धीरज, धीऱ्या, सीए साहेब )

Gokul Sarda - Advocate Satara Court, अखिल भारतीय सल्लागार समिती ( वकील, नानू, गोकुळ )

Anand Karva - Computer World Satara, सातारा जिल्हा समाज अध्यक्ष ( आनंद, अध्यक्ष, आनद्या )

Pankaj Lahoti - Pankaj Crations ( दादा )

Darshan Lahoti - iDealocean Technologies ( दर्शन, दर्शा )

]

Loading...
Loading...