Close

लहानपणीच्या निरागस नजरेतुन...

लहानपणीच्या निरागस नजरेतुन...
( पूर्ण पोस्ट वाचा तुम्हाला आपल्या भीमाची शप्पथाय! )

सालाबादप्रमाणे काल तारळ्याची भीमसेन यात्रा करून साताऱ्याच्या घरी आलो, खूप वर्षांनी भीमसेन कुंतींच्या भव्य विसर्जन मिरवणुकीमधे यावेळी पूर्णवेळ सहभागी झालो.

व्यवस्थित कळत अन आठवत असल्यापासून साधारण अठ्ठावीस-एकोनतीसावे विसर्जन असावे हे माझ्या आयुष्यातले! अन एक ढोबळ अंदाजाप्रमाणे गावच्या इतिहासातील साधारण एकशे पंचविसावे वगैरे!


लहानपणी अनंत चतुर्दशीच्या नंतरच्या दोन दिवसांचे आयुष्यात अनन्यसाधारण महत्व असायचे. गणपती विसर्जनानंतर बाप्पा गेल्यामुळे येणाऱ्या खालीपणाला तारळे मात्र अपवाद असायचे कारण त्याला लगेच दुसऱ्या दिवशी असलेला भीमसेनचा भंडारा आणि तीसऱ्या दिवशीच्या यात्रेचे वेध लागायचे.

या संपूर्ण भिमोत्सवाची चाहूल तेव्हा लागायची जेव्हा श्रावणातली नागपंचमी यायची...

तारळ्यातील आमच्या घरापासून उजव्या बाजूला चाळीस एक मिटर अंतरावर असलेल्या मारुतीच्या मंदिरासमोर मोठ्ठाला मंडप उभारला जायचा. मंडप उभारण्याचा कार्यक्रम हा ही काही कार्यकर्त्यांसाठी उत्सवापेक्षा कमी नसायचा.

या उभारलेल्या साधारण सव्वा डझन फूट उंचीच्या मंडपात भीमाचा भरलेल्या लोखंडी चाकांचा रथ नागपंचमी दिवशी दरवर्षीच्या भीमजन्मासाठी सज्ज व्हायचा. दुपारच्या प्रहरी त्या रथाच्या मध्यभागी चिखलाचा एक मोठ्या तांब्याभर आकाराचा गोळा 'भीमसेन महाराज की जय' च्या सामूहिक गजरात थापुन त्याची पूजा व्हायची. अशा रीतीने भीमाचा गोळा पडण्याचा छोटासा सोहळा होऊन भिमकुंती उत्सवाची खऱ्या अर्थाने सुरुवात होऊन जायची.

त्या गोळ्याचे बालगोपाळांपासून संरक्षण करण्यासाठी जशी यशोदा कृष्णापासून लोणी वाचवण्यासाठी वेगवेगळ्या शकली लढवायची तसे मंडळाचे जेष्ठ त्या गोळ्यावर काहीतरी आवरण वगैरे घालायचा अयशस्वी प्रयत्न करायचे, अयशस्वी या अर्थाने कारण पेठेतले बालगोपाळ तो भीमाचा गोळा दिड दोन दिवसातच गोळा करून त्याचे विसर्जन करून टाकायचे.

गोळा थापून झाल्या नंतरच्या आठवडाभरात भीमसेनची विशाल मूर्ती उभी करायला माती आणण्याचा कार्यक्रम असायचा. पेठेतले दीड दोन डझन अबाल वृद्ध लोक एकत्र येऊन, ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसून, भीमाचा जयजयकार करत जवळच चार दोन किलोमीटर वरून ट्रॉली भरून माती घेऊन जायचे. ठरावीक स्वीकृत इंजिनिअर्स कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शना खाली ट्रॉली मंडपाच्या मध्यभागी खाली केली जायची अन याचबरोबर माती आणणे सोहळा संपन्न होऊन जायचा.

एक दोन दिवसातच त्या मातीला आकार देण्याचे काम अर्थातच कुंभार वाड्यातील कुशल कुंभार स्वखुशीने अत्यंत कुशलतेने करायचे. तिथून पुढचे तीन चार दिवस 'भीम कुठपर्यंत आलाय' या एकाच आतुरतेने आम्ही शाळेतून घरी यायचो. आपल्या परीने प्रत्येक जण तयार होत असलेल्या मूर्तीचे समीक्षण करायचा. मग गेल्यावर्षी पेक्षा उंच झालेय, छोटी झालेय, मान जर्राशी तिरकी झालेय, चेहऱ्यावर यावर्षी एक वेगळेच तेज आलेय वगैरे सारखे मत प्रदर्शन करायचा. या सगळ्या खेळात मातीच्या गोळ्याचा भीमसेन होण्याचा भीमाचा प्रवास एका विशिष्ट गतीने सुरु असायचा.

मातीकाम चालू असताना मूर्तीचा शेप मेंटेन करायला तिला विशिष्ट पद्धतीने धोपटले जायचे. यातूनच हळूहळू भीमाचा मोहक रेखीव चेहरा आकार घेऊ लागायचा. ज्याच्या मनात पाप आहे त्याला तो चेहरा आपल्याकडे रागाने पहात असल्यासारखा भासायचा तर ज्याच मन निर्मल आहे त्याला तो चेहरा कायम प्रसन्नच वाटायचा.

यानंतर भीमाच्या संपूर्ण मूर्तीला खळ लाऊन कापड चढवले जायचे. मूर्तीचे इंजिनियर हे काम कमालीच्या भक्तिभावाने चोख पूर्ण करायचे. कापड चढवल्यानंतर त्याला पांढरा रंग दिला जायचा. तो रंग अशा प्रकारे दिला जायचा की रंग न दिलेला भाग हे भीमाने परिधान केलेले जॅकेट आहे असा भास द्यायचा. भीमाने परिधान केलेले हे पहिले वस्त्र असायचे. हातात गदा घेतलेल्या गदाधारी भीमाचे ते जणू यौवनच भासायचे.

भीमाची इकडे प्रगती सुरु असताना तिकडे कुंभार वाड्यात आकार घेत असलेली कुंती माता भीमाच्या मंडपात आगमन करण्यासाठी सज्ज झालेली असायची. श्रावणातल्या शेवटच्या शनिवारी कुंतीमातेचे वाजत गाजत भीमसेन च्या मंडपात आगमन व्हायचे. भीमसेनच्या उजव्या हाताला लागून स्थित गाड्या मध्ये कुंतीमातेला 'कुंती माता कि जय' च्या घोषात अत्यंत काळजीपूर्वक विराजमान केले जायचे. भीमाचा मंडप कमान पडद्यांनी भरून जायचा. माता कुंतीच्या आगमनाने भीमाचा मंडप हा एक मंडप न राहता भीमाचा दरबार होऊन जायचा.

माता कुंतीच्या आगमनानंतर दोन महत्वाच्या गोष्टींना सुरुवात होऊन जायची. पहिली म्हणजे त्या दिवसापासून काही दिवसांनंतर भंडार्याच्या दिवसापर्यंत अखंड विना भक्तांकडून घेतली जायची. एक भक्त एक तास या वेळापत्रकानुसार वीणेचे प्रहार आखले जायचे आणि भीमाच्या दरबारी त्या प्रहारांमध्ये चोवीस तास वीणेसोबत भगवंताचे नामस्मरण सुरु व्हायचे.

दुसरी गोष्ट म्हणजे अखंड पेठ निनादून सोडणारी भीम कुंतीची आरतीही त्या दिवशीच सुरु व्हायची. मंडळाचे ढोल ताशे नऊ वाजल्यापासून युवा कलाकार मूर्तीच्या मागच्या आणि मारुती च्या समोरच्या पारावर बडवायला सुरु करून आक्खी पेठ जागी करायचे. दरबारात बांधलेली मोट्ठी घंटा मोठ्ठाला निनाद करून भक्तांना दरबारात बोलवायला साद द्यायची.

ढोल ताशा घंटेच्या गजरात बरोब्बर साडे नऊच्या काट्यावर भीमाच्या भव्य दरबारात भीमकुंतीची भव्य आरती व्हायची. युगे अठ्ठावीस विटेवर उभा असलेल्या विठ्ठलापासून सुरुवात व्हायची, लवथवती विक्राळा ब्रह्मानंदी माळा म्हणत आरती शंकराचा जल्लोष करायची, सत्राणें उड्डाणे हुंकार वदनी होता हणमंताचा जयजयकार करत जणू उभी पेठ कडकडून जायची आणि दुर्गे दुर्गट वारी च्या निनादाने महिषासुर वदनी चे चिंतन होऊन भीमकुंतीची आरती पांढऱ्या शुभ्र गोड खोबऱ्याचे प्रसाद वाटपासोबत संपन्न होऊन जायची.

कुंतीच्या डाव्या बाजूला विराजित भीमाच्या त्या रुपाला भीमसेनाचे रूप तेव्हा यायचे जेव्हा गुलाबी रंग देऊन त्याच्या मोहक चेहऱ्यावर कागदी डोळे, मिशा वगैरे लावल्या जायच्या. गदाधारी भीमसेनाच्या त्या करारी रूपा समोर रोज रात्रीनंतर विधविविध भजनी मंडळे येऊन भजन करायची. ऐकायला कोणी असो ना असो ती मात्र टाळ चिपळ्यांच्या नादात भगवंतांशी एकरूप होऊन जायची. खुद्द भीम-कुंती आपल्या भजनाचे श्रवण करताहेत एवढी एकच भावना त्यांच्या मनी असायची, मानधनाची पुसटशी अपेक्षाही त्यांना नसायची.

भिमोत्सवाला समांतर अर्थातच गणेशोत्सव हि त्याच काळात सुरु असायचा. देखावे पाहायला बाहेर पडलेला गणेशभक्तांचा लोंढा भीमाच्या दरबारातूनही आवर्जून जायचा. संपूर्ण तारळे गावाला त्या आठ दहा दिवसात अध्यात्माचा विलक्षण रंग चढलेला असायचा. गावचा हर जातीधर्माचा हरएक नागरिक त्या भक्ती रंगात न्हाऊन चिंब भिजून गेलेला असायचा.

याचदरम्यान भीमसेनाला मस्त असे कागदी जॅकेट चढवले जायचे. त्या जॅकेट मध्ये भीमसेनाचे रूप खुलून निघायचे. या भीमसेनाच्या रुपाचा कळस म्हणजे भीमाच्या डोक्यावर फेटा चढविण्याचा दिवस! नारायण मंदिरात दिवसभर कागदी फेटा बनविण्याचे काम करून तो कागदी फेटा कमालीच्या कुशलतेने भीमाच्या डोक्यावर बसवणे ही गोष्ट सुद्धा काही सोहळ्याहून कमी नसायची. गडद गुलाबी रंगाची पंख काढलेली ती फेट्याची कागदी पकड भीमसेनाच्या मूर्तीला एक विलक्षण शोभा आणायची!

गदाधारी अन आता फेटधारी असलेल्या भीमसेनाच्या कागदी डोळे मिशांच्या जागी आता रंगवलेल्या डोळे, मिशा, नाम, अलंकार वगैरे आलेले असायचे. जवळ जवळ संपूर्ण झालेल्या भीमसेनाच्या मूर्तीचे ते स्वरूप अन सौंदर्य कुठे ठेवू अन कुठे नाही असे दरबारी आलेल्या भक्ताला व्हायचे!

आपल्या मुलाचे रोज बहरत जाणारे ते रूप पाहून शेजारी बसलेल्या कुंती मातेच्या चेहऱ्यावरचे भावही खुलत असल्याचे भासून जायचे. आपल्या बलाढ्य पुत्राचे वैभव पाहून जणू माता कुंतीलाही गहिवरून जायचे!

अनंत चतुर्दशी दिवशी गावातील प्रत्येक गणपतीचे विसर्जन देखील भीमाच्या साक्षीनेच व्हायचे. पेठेतून जाणारे प्रत्येक मंडळ भीमसेनची प्रसादारती घेऊनच पुढे जायचे. ते सर्व दृश्य अखंड तारळे गावात असलेल्या ऐक्याचे जणू प्रकटीकरणच करायचे!

या दिवशीची भीमसेनची आरती सर्वांची सर्वात लाडकी आरती असायची कारण या आरती नंतर प्रसाद म्हणून असलेली खिरापत ही विधविविध अन मुबलक असायची. पेठेचे सार्वजनिक गणेश विसर्जन करून आलेली मंडळी त्याच ओल्या कपड्यांत अन पाच दगडांनी भरलेल्या ताटात दरबारात आरतीला जमायची. नुकतेच बाप्पांना निरोप देऊन आल्याने काहीशा गहिवरलेल्या स्वरांमध्ये ती आरती व्हायची!

अनंत चतुर्दशीचा पुढचा दिवस हा भंडाऱ्याचा दिवस असायचा. दिवस उजाडल्यापासून श्री भीमकुंतीच्या महाप्रसादाचा घाट सजायचा. सकाळच्या प्रहरी छोटी दहीहंडी काठीने फोडून सात दिवस अखंड चाललेल्या विनावादनाला खंड पाडणारी विनापूजा व्हायची. गावांतील सर्व घरांमध्ये भीमाला नैवेद्य म्हणून मोदके भरली जायची.

नवसाला पावणाऱ्या भीमापुढे श्रद्धेने नवस बोलले जायचे. नवसांच्या या माध्यमातून एक दृढ विश्वास घेऊन नवस बोलणारे लोक घरी जायचे. भीम स्वतः येऊन काही करणार नाही याची माहिती त्यांनाही असायची. दरबारी येऊन मेहनत करण्याची प्रचिती मात्र त्यांना व्हायची. वर्षभरात झालेल्या त्या प्रचितीचा रिझल्ट बहुतांशी लोकांना मिळायचा. सद्भावनेने पुढल्या वर्षी बोललेला नवस फेडला जायचा. पूर्ण न झालेल्या नवसांची नवीन ऊर्जा मिळविण्यासाठी भीमाला पुन्हा आठवण करून दिली जायची. दरबारातल्या या राजाप्रती असलेली लोकांची भक्ती मात्र दुनावतच राहायची.

भंडाऱ्या दिवशी दरबारात येणाऱ्या भक्तजनांची गर्दी, त्यांचा उत्साह, 'भीमसेन महाराजा, टिम्ब टिम्ब गावाचे टिम्ब टिम्ब आजवर्षी धडधाकट बरे होऊन तुझ्या दरबारात आले पाहिजेत. ते अकरा नारळाचे तोरण आणि एक हजार एक रुपयेची माळ तुझ्या चरणी अर्पण करतील, बोला भीमसेन महाराज कि जय ' सारखे दिवसभर पुकारले जाणारे नवस, देणगीदारांच्या नावांचा गजर यांनी श्रीच्या दरबाराचा एक विलक्षण फील येऊन जायचा. फेडल्याला नवसाचे प्रसादाचे पेढे खायला मिळण्याचा लहानपणीचा स्वार्थ निव्वळ अवर्णनीय असायचा. अख्खा दिवस न जेवण करता नुसत्या पेढ्यांवर ही भागून जायचा. सात आठ मस्त कंदी पेढे आम्हाला खायला देऊन नंतर एक साखरेचा पेढा नकळत खायला घालून भीमदादा आमच्या कंदी खाऊन धुंदी चढलेल्या जिभेवर जणू साखरच फिरवून जायचा!

जस जसा दिवस मावळू लागेल तस तसा भाविकांचा लोंढाही वाढू लागायचा. भीमाच्या चरणी उभे राहून भाविकांचे आलेले नैवेद्य दाखवण्याचा अनुभव फुल मजा देऊन द्यायचा. कुंती समोर आले की काही जणींच्या अंगात येऊन जायचे, कोणी आपले बाळ भीमाच्या पायाला लावायला द्यायचे.

इकडे दरबारात हे सुरु असताना तिकडे तारकेश्वर मंदिरापासून आळीचे मानाचे उदबत्तीचे झाड दरबाराकडे यायला निघायचे. गवत लावलेल्या खांबावर भक्तजनांच्या उदबत्त्या रोवत रोवत भक्तजन वाजत गाजत झाड दरबाराकडे घेऊन यायचे. झाडापुढे होत असलेल्या गुलालीच्या उधळणीने अवघा रंग गुलाबी होऊन जायचा. कुणी रॉकेल तोंडात घेऊन आगीचे लोळ काढायचा तर कुणी दांडपट्टा फिरवण्याचे आपले कौशल्य सादर करायचा.

कमालीच्या उत्साहाने या उदबत्तीच्या झाडाचे श्री च्या मंडपात आगमन व्हायचे. आगमन झाल्याक्षणी घंटा टाळ्यांचा नाद होऊन जमलेल्या तुफान गर्दीत भीमसेन कुंतीच्या भव्य आरतीला सुरुवात व्हायची. भगवंताच्या जयजयकाराने पवित्र झालेल्या त्या वातावरणात या ना त्या कारणाने सहभागी लोकांचे सत्कार मंडळाकडून केले जायचे आणि भव्य अशा महाप्रसादाचा नारळ लगोलग फुटायचा.

पुन्हा काही इंजिनिरार्स च्या मार्गदर्शनाखाली प्रसाद आणि वाढप्यांची मॅनेजमेंट केली जायची. इथून तिथं पर्यंत च्या साथ सत्तर मीटर अंतरामध्ये भक्तांच्या प्रसाद घेण्यासाठी लांबच्या लांब पंगती लागायच्या. भात, आमटी, खीर, बुंदी आणि असतील तेवढ्या मोदकांचा प्रसाद कमालीच्या भक्तिभावाने वाढला आणि खायला जायचा. भीमकुंतीच्या नजरेसमोर होत असलेला महाप्रसादाचा महासोहळा निस्सीम भक्तिभावाने संपन्न व्हायचा.

महाप्रसाद झाला की दरबारात रात्र जागवणारे महाभजंनच जणू व्हायचे. फक्त दरबारातच नाही तर पूर्ण गावात जागा मिळेल तिथे कोणते ना कोणते भजनी मंडळ बसायचे. अखंड रात्र भगवंताचे नामस्मरण व्हायचे. बाराच्या ठोक्याला पंचपदी सुरु झालेल्या मंडळांची भैरवी होई पर्यंत पहाटेचे पाच वाजायचे.

त्यानंतर उगवायचा तो यात्रेचा दिवस, भीमकुंतीच्या दरबारातील दर्शनाचा शेवटचा दिवस, भीमोत्सवाचा अखेरचा दिवस, श्री भीमसेन महाराज आणि कुंती मातेच्या विसर्जनाचा दिवस!

या दिवशी कुंती माता गावदर्शनासाठी सकाळी सकाळी बाहेर पडायची. पारंपरिक रूट नुसार कुंतीमातेचा गाडा भक्तांमार्फत गावातील शक्य असेल त्या प्रत्येक घराच्या दारात दर्शनासाठी पोहचवला जायचा. प्रत्येक घरातून कुंती मातेची खणानारळाने ओटी भरली जायची. काही घरी आम्हा कार्यभक्तांना चहा सरबत पाजून आमचीही सेवा व्हायची.

तिकडे कुंती माता गवदर्शनासाठी बाहेर पडली असताना पाच साडे पाच फुटांची ती शेकडो किलोची भीमसेनची मूर्ती सांभाळणारा दणदणीत गाडा हळू हळू आपली जागा सोडायचा. पुन्हा काही इंजिनिअर्स लोकांच्या मार्गदर्शनाखाली भीमसेन राजा विसर्जन मिरवणुकीसाठी तयार व्हायचा.

तीनसाडेतीन च्या दरम्यान संपूर्ण गावातुन फिरून आलेली कुंतीमाता पुन्हा शनिवार पेठेत येऊन जणू आपली प्रदक्षिणा पूर्ण करायची. जाताना मोकळ्या असलेल्या पेठेतून येताना मात्र तिला प्रचंड गर्दीतून आपली वाट काढावी लागायची. कुंतीच्या आगमनाची खबर लागताच इकडे भलीमोठी भीमसेनाची मूर्ती सुद्धा दरबार सोडण्यासाठी सज्ज व्हायची. गडद गुलाबी शालीत गुंडाळलेल्या गुलाबी फेट्यातल्या त्या बलाढ्य भीमाच्या दरबारा बाहेर येऊन दिलेल्या दर्शनाने भक्तजनांची अवघी मने तृप्त होऊन जायची.

एवढ्या मोठ्या गाड्याचा बॅलेन्स आणि गती सांभाळण्यासाठी गाड्याच्या पुढे आणि मागे असे दोन्ही बाजूला दोर लावलेले असायचे. काही कार्यभक्त पुढचा दोर पकडून गाडा ओढायचे तर काही मागचा दोर ओढून गाड्याला मागे ओढून रेझीस्टन्स द्यायचा प्रयत्न करायचे. या दोघांच्या अद्भुत रसायनाने भीमसेनाचा भव्य गाडा गुलाल चिरमुऱ्यांच्या उधळणीत हळू हळू वाट काढत पुढे सरकत राहायचा.

पुढे कुंती माता आणि मागे बलाढ्य पुत्र भीमसेन यांची भव्य विसर्जन मिरवणूक शनिवार पेठेतून वेशीच्या शेवटी असलेल्या तारळी नदीकडे निघायची. गुलालाच्या उधळणीने फक्त गुलाबी या एकाच रंगात प्रत्येक भक्त दिसायचा. वाजंत्रीसोबत आपला ताल धरून तो आपल्याच धुंदीत नाचत असायचा. भीमसेन महाराज की जय, कुंती माता की जय च्या जयघोषात विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेला अखंड जनसमुदाय भीमकुंति सोबत नदीच्या तीरी गोळा व्हायचा.

विसर्जनाचा पहिला नंबर अर्थातच माता कुंतीचा असायचा. पुलाच्या उजव्या बाजूला कुंती मातेची मूर्ती घेऊन भक्तजन नदीतीरी जायचे. मा दुर्गे ची एक आरती होऊन शांतपणे कुंती मातेचे विसर्जन व्हायचे. इकडे कुंती मातेचे विसर्जन होईपर्यंत तिकडे भीमसेनाचा गाडा नदीच्या डाव्या बाजूच्या तीरी आलेला असायचा.

भव्य गाडा आणि खडतर निसरडा रस्ता या गोष्टींचा विचार करून कमालीच्या कुशलतेने गड्याला नदीतीरी आणायचे काम भक्तांना करावे लागायचे. ते करताना कधी गाड्याचे चाक हलक्या रिमझिमीमुळे चिखल झालेल्या रस्त्यात रुतायचे तर कधी चुकून थोडाफार मार्ग सोडायचे. हे सर्व सांभाळत सांभाळत भीमसेन महाराज मोठ्या कष्टाने विसर्जनासाठी नदीतीरी सज्ज व्हायचे.

मूर्ती विसर्जनासाठी व्यवस्थित बांधून तयार केली जायची आणि विसर्जनापूर्वी श्री भीमसेनाची भव्य आरती गायली जायची. आरती नंतर विसर्जनासाठी विरुद्ध बाजूला पाण्यात गेलेल्या बांधवांकडून दोर ओढले जायचे आणि भीमसेनाच्या प्रचंड मूर्तीचे विसर्जन व्हायचे प्रयत्न व्हायचे. बऱ्याच वर्षी बहुतेक भीमसेन राजांना ही बहुदा भक्तांना सोडून जायची मनापासून इच्छा नसल्याने मूर्तीचे विसर्जन करणे कठीन जाई, अशावेळी श्रींची दोनदा, तीनदा आरती होई. अखेर भक्तांच्या प्रयत्नांना यश येई, ''भीमसेन महाराज कि जय' च्या जयघोषात त्या भव्य मूर्तीचे पाण्यात विसर्जन होई, एवढ्या मोठाल्या मूर्तीच्या पाण्यात पडण्याने उडालेल्या नुसत्या पाण्यानेही तीरावरच्या लोकांची अंघोळच होऊन जाई, त्या जलसमाधीने भीमसेन राया आपल्या भक्तांचा वर्षभरासाठी निरोप घेई!


यावर्षीही मी माझ्या नजरेतून पाहिलेल्या या लहानपणीच्या गोष्टी जवळपास याच पद्धतीने घडल्या. पण ज्या निरागस भावाने मी भिमोत्सवाच्या या सर्व गोष्टींकडे त्या वयात पाहत होतो, ती निरागसता मला माझ्या नजरेत या वयात आणायला या गोष्टी अशक्यच भासल्या!

ही निरागसता कधी लोप पावते आणि कधी माझी सुशिक्षित(?) बुद्धी त्या निरागसतेवर तिचा ओव्हरराईड मारते हे मलाही कळत नाही, मग...

एक चिखलाचा गोळा वाजवत आणणे हा विचारच मला थट्टा वाटू लागतो!

माती आणायला स्वतः जाण्यात वेळ घालवण्यापेक्षा चार पैसे देऊन मी कंत्राट देऊन टाका म्हणतो!

मूर्ती तयार करताना मूर्तीपेक्षा मूर्तिकारांमधली व्यावसायिकताच माझे लक्ष वेधून घेते!

कापड वगैरे लावताना करतोय ना एक जण, तासाभराच्या कामासाठी मी कशाला जाऊ असे मनात येते!

आरतीच्या वेळचा ढोल ताशा घंटेचा नाद मला ध्वनी प्रदूषण वाटू लागतो!

रोज त्याच त्या आरत्यांवर त्याच त्या टाळ्या वाजवन्यात मला कंटाळा वाटू लागतो!

मग मी आरतीला न जाता कालच्या आरतीच्या रेकॉर्डेड विडिओ पोस्टवर कमेंट् करण्यातच आनंद मानू लागतो!

त्या नेहमीच्या खोबऱ्याच्या प्रसादाच्या जागी 'एवढे पैसे येतात तर जरा पेढे बिढे ठेवत जावा प्रसादाला' असे मी सांगू लागतो!

एकही श्रोता नसलेल्या भजनी मंडळाला कोणासाठी भजन करताहेत म्हणताना मला तो भीमच दिसेनासा होतो!

स्वतःलाही ऐकू न येणाऱ्या त्या वीणेच्या आवाजासाठी कशाला एवढे हात अवघडून घ्यायचे असा मी विचार करू लागतो!

दरवर्षी तो कागदी फेटा तयार करत बसण्यापेक्षा एकच झगमगीत रेडिमेड कापडी फेटा आणून टाका असा सल्ला मी देतो!

नैवेद्य स्वीकारणे लांबच तो घेऊन मंडपात जायला मला लाज वाटू लागते!

नवसांची भावना मला देवावरचा विश्वास न वाटता अंधश्रद्धा वाटू लागते!

'मुलगाच झाला पाहिजे' सारखे नवस मला स्त्री भ्रूण हत्येसारख्या कक्षेतले वाटायला लागतात!

गर्दीत जाणे मला स्वाईन फ्लू सारख्या गोष्टींची आठवण करून देतात आणि न जाणे हाच सुज्ञ पना आहे असे विचार सांगतात!

एवढी मोठी मूर्ती एवढ्या गर्दीतून एवढ्या गोंगाटात विसर्जनाला घेऊन जाणे यात मला रिस्क दिसू लागते!

अशा मिरवणुकांसाठी संपूर्ण प्रशासन यंत्रणा कामाला लावणे मला विचित्रपणाची भावना देते!

हे असलं नको असलेलं ट्रान्सफॉर्मेशन माझ्यात कधी, कसे आणि का होत ते माझ मलाही कळत नाही!

हाच प्रश्न त्या लहानपणी भक्ती केलेल्या भीमाला विचारु म्हटले तर 'ती निर्जीव मातीची मूर्ती याच काय उत्तर देणार' हे शहाणपणाचं उत्तरही स्वतःकडून स्वतःला कधी मिळतं याचा ठाव ही लागत नाही!

- D For Darshan

Pics & source of pics credits - Suraj Bendre

सौजन्य - श्री भीमसेन क्रिडा मंडळ, तारळे

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...