Close

वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा...

"हा काका, गुड मॉर्निंग! दर्शन बोलतोय, आठ वाजता जायचंय.आज, येताय ना तुम्ही?",सकाळी सकाळी लवकर

आवरून मी आचार्य काकांना कॉल केला.

"हा, हा दर्शन, गुड मॉर्निंग. हो हो, जाऊया ना, बरं का, पावणे आठ झालेत. एक दहाच मिनिटात तयार होतो मी, चालेल ना?", काकांनी नेहमीच्या उत्साहाने प्रतिसाद दिला.

"एस, चालतंय, येतोच मी मग दहा मिनिटात तुम्हाला घ्यायला", असे म्हणून मी सेल खिशात ठेवत हातातल्या चहाच्या कपमधील शेवटचा घोट संपवून गाडीची चावी घेऊन बाहेर पडलो.

"हॅलो, सचिन सर, गुड मॉर्निंग! आचार्य काका येनार आहेत, तर मग मी त्यांना घेऊन येतोय, तुम्ही तुमची बाईक घेऊन पुढे निघा", दरबारच्या कोपऱ्यावरून मी सचिनशी फोनवरून आठला पाच कमी असताना संवाद इनिशीयेट केला.

"अच्छा येताहेत का काका, चालतंय मी माझी गाडी काढतो मग. पण साडे आठ ठरलय ना. काल नाही का विषय झाला आपला शेवटी निघताना", सचिन सर बोलले.

"अरे, साडे आठ चे टायमिंग आहे होय, उगच गडबड करून लवकर उठलो मग मी. असू दे, चला या अज्ञानापोटी अर्धा तास जास्त जगायला मिळाला!", फोन बंद करत आता अर्धा तास आहे अजून तर घरी जावे का काकांकडे जावे या गोष्टीचा क्षणभर विचार करत काकांच्या घराकडेच गाडी घेतली.

बंगल्याच्या बाहेरच्या झोपाळ्यावर मस्त कोवळ्या सूर्यकिरणांच्या कवडशांमध्ये पेपर वाचत बसलेले काका मला पाहताच निघायच्या तयारीने गडबडीत उठू लागले.

"बसा, बसा. अजून वेळ आहे अर्धा तास. साडे आठ चे टायमिंग ठरलेय वाटतं, माझं थोडं कंफ्युजन झालं होतं.", असं म्हणत गाडी लावून मी ही पाळण्याच्या दिशेने निघालो.

"ओह अच्छा ठीक आहे ना, काय वाजतीलच एवढ्यात, ये बैस", काकांनी पाळण्यावर पसरलेल्या वर्तमानपत्रातून माझ्यासाठी थोडी जागा करत मला बसण्यास सांगितले.

लॉ ऑफ याट्रॅक्शन नुसार का कोण जाणे पण कालच अभय दि चावट बॉय कडून रेफरन्स मिळालेल्या द्वारकानाथ संझगिरींचा जुन्या आठवणींच्या धर्तीवर लिहिलेला लेख नजरेस पडला आणि मग तोच वाचण्यास नजर स्थिरावली.

"या द्वारकानाथ संझगिरींच्या लिखाणाची स्टाईल एक भन्नाट असते", मी वाचता वाचता बोलून गेलो.

"हो हो, खूप सुंदर लिहितो तो माणूस", काका उत्तरले.

"तुम्ही सध्या काय वाचताय?", सहज विषयावरच होतो तर काकांना विचारले.

"आमचे सध्या ज्ञानेश्वरीचे वाचन चाललेय. त्याचसोबत एक दत्त संप्रदायावरचे पुस्तक आणलेय परवा, ते वाचतोय", काका उत्तरले.

"आत्ता ती अर्थासहित संस्कृत सुभाषिते एक वाचनात आलीत बरं का, एक एक इतकी सुंदर आहेत तुम्हाला सांगतो", म्हणत काकांनी पुढे सांगायला सुरुवात केली.

"करोति स्वमुखेनैव बहुधान्यSस्य खण्डनम्। नमो पतनशीलाय मुसलाय खलायच"

"याचा अर्थ सांगताना त्यांनी म्हटलंय, मुसळ बघा धान्यावर घाव घालून त्याचे तुकडे करतं तसंच काही लोक इतरांच्या शब्दांचे कायम खंडन करतात, अशाप्रकारे मुसळ आणि असे खंडन करणारे हे दोघेही खालच्या दर्जाचे आहेत. तिथे बहुधान्यस्य या शब्दात अनुग्रह केलाय बघा, जो संस्कृत मध्ये उपरोधिक अर्थाने वापरला जातो."

"वाह", मध्ये मध्ये दाद देत मी लक्ष देऊन ऐकत होतो.

"अजून एक असच सोन्याविषयी होतं बघ ..."

"अग्निदाहे नमें दुःखम छेडने ताडणे अपीवा। येतत तुमे मह्तदुखं गुंजया सह तोलनंम"

"याचा अर्थ असा होतो की सोने असे म्हणतेय कि बाबा मला अग्नीतून सुलाखून काढल्याचे, कापल्याचे किंवा घासल्याचे वगैरे एवढे दुःख होत नाही जेवढे दुःख मला त्या गुंजेसारख्या गोष्टीबरोबर माझी तुलना केल्याचे होते", पूर्ण भावनारस ओतून काका ते सुभाषित विस्तृत करून सांगत होते.

"गुंज म्हणजे?", मी अज्ञानापोटी विचारले.

"गुंज म्हणजे ते बघ छोट्या फळासारखं येतं. मिळतं ते पाहायला आपल्याला. त्या प्रमाणात आधी सोने मोजले जायचे. गुंज म्हणजे 'अतिशय क्षुद्र वस्तू' या अर्थाने" , काकांनी गुंज शब्दाचा वापर फोडून सांगितला. "ते सोने शेवटी सोनेच हो, त्याला मोजायला त्याची तुलना त्या गुंजाशी करावी लागतेय. म्हणजे त्याने एवढ्या सत्वपरीक्षेतून जायचं, पण शेवटी तुलना कोणाशी तर अत्यंत साधारण गोष्टीशी, ही त्या सोन्याची खरी व्यथा आहे. बघा किती सुंदर अर्थ आहे! होत असतात का नाही सांगा बरे अशा तुलना आपल्याही दैनंदिन जीवनामध्ये?"

काकांचे ते सुभाषित आणि त्यात दडलेला अर्थ ऐकून माझ्या विचारकक्षा रुंदावल्या. पण त्याचसोबत आपल्या अभ्यासक्रमात आत्तापर्यंत संस्कृत कधीच नसल्याची खंतही क्षणभर झाली.

"हो ना, केवढा मोठा अर्थ दडवून असतात काका हि सात आठ शब्दांची सुभाषिते. मला यांचं वाचन कराल तेव्हा आवर्जून सांगा. खूप आवडेल मला." , मी ज्ञानसाधनेची इच्छा व्यक्त केली.

"हो हो, अगदी अरे, नक्की करू एकत्र वाचन आपण", काकांनीही दुजोरा दिला.

"सलाम आहे अशी सुभाषिते लिहिणाऱ्यांना! 'सोप्प लिहिणं अवघड' असही एक याच धर्तीवरचं कोणीतरी लिहिलेलं सुभाषितही आहेच बघा!",
माझ्यातला सुभाषितांच्या प्रेमात पडलेला दर्शन बोलत होता.

"काका, मी शाळेत असताना आम्हाला फडतरे सर म्हणून पर्यवेक्षक सर होते. ते कधी कोणी सुविचार सांगायला मुलगा नसला की वरचेवर त्यांचा एकच पेटंट सुविचार सांगायचे. ते सुविचार सांगायला आले की आम्ही आधीच म्हणायचो, 'हां, आजचा सुविचार आहे - जय जगत' आणि पुढे सर त्याचे विश्लेषण द्यायचे. शाळेत असताना काय सर दोन शब्दांचा एवढा सोप्पा सुविचार कायम सांगतात म्हणून आम्ही हसायचो. पण आम्हाला हे कळायला खूप वेळ लागला होता की सुविचार जरी दोन शब्दांचा असला तरी त्याचा आशय हा न अनंत आहे. ते सर सुविचार तोच सांगायचे पण आशय प्रत्येक वेळी वेगळा सांगायचे.", मी शाळेच्या आठवणीमध्ये रमून जात बोलून गेलो.

"अगदी बरोबर, हीच तर जादू असते सुभाषितांची", काकांनी दुजोरा दिला आणि चला जाऊ म्हणून उठायची तयारी करू लागले.

"थांबा काका, एक सेल्फी काढू. असे संवाद कायमचे लक्षात ठेवायला मदत होते मला अशा सेल्फीज ची!", माझे जिथे तिथे फोटो काढायचे कारण सांगत मी काकांबरोबर हा सेल्फी घेतला आणि जादा जगायला मिळालेला अर्धा तास सुसंवादाने कारणी लागला म्हणत दोघांनी क्लासचा रस्ता धरला.

वाचन प्रेरणा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...