Close

दिवाळी पहाट २०१८

दिवाळी_पहाट_२०१८
"तर या जरूर, नका चुकवू ही सुरेल संगीतमय पहाट पाडव्याची, बाबूजी, गदिमा अन यशवंतजींना नमन करून रंगवू मेहफिल संगीताची,
घेऊ अभ्यंग स्वरांचा, न्हाऊन जाऊ अवघ्या स्वराभिषेकाने
घेऊ अभ्यंग स्वरांचा, न्हाऊन जाऊ अवघ्या स्वराभिषेकाने
दिवंगतांचे स्मरण करुनी, श्रीमंत होऊ स्वरसमृध्दीने!"

आशिष ने आलापबद्ध केलेल्या भीमपलास च्या स्वरांबरोबर तारळ्याच्या भीमसेन सभागृहाच्या गाणमंचावरून सवंगडी ग्रुप तसेच भीमसेन क्रीडा मंडळ तारळे यांच्यावतीने अध्यात्मसमृद्ध तारळ्याच्या कलारसिक श्रोत्यांना मी वरील शब्दांत केलेले आवाहन किती अंशी रास्त होते, याची प्रचिती पाडव्याच्या मुहूर्तावर आयोजित दिवाळी पहाटेचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर आली! मराठी संगीताच्या भक्तिरस, भावरस, विरहरस, वीररस अशा जवळजवळ हरएक रसाने कार्यक्रमास उपस्थित मंडळी आवाहनाप्रमाणे स्वरांचा अभ्यंग घेऊन न्हाऊन निघाली!

या कार्यक्रमास एक सादरकर्ता म्हणून मी स्टेजवर होतो पण त्याचबरोबर त्या कार्यक्रमाचा सर्वात जवळचा श्रोताही होतो. गणपुलेंच्या ज्या आशिषला गाताना ऐकत, त्याचा आदर्श समोर ठेवत लहानाचा मोठा होताना संगीतक्षेत्राशी लळा लागत गेला त्याच आशिष सोबत स्टेज शेअर करायला मिळणे हीच मुळात मोठया अभिमानाची गोष्ट अन त्याच्यासोबत सहगायनाचा लाभ म्हणजे त्या अभिमानावर कळसच! या दिवाळी पहाटेच्या निमित्ताने वर्षातून एकदाच येणारे हे क्षण पुनःपुन्हा न जगू वाटले तर नवलच!

दिवाळी पहाटे मध्ये पहाट शब्द जरी असला तरी अशा कार्यक्रमाला सुरुवात व्हायला सकाळ ही उजाडतेच! साउंड सिस्टीम ची क्विक टेस्ट घ्यायला अयोध्येच्या राजाचे आरंभी एक कडवयातून वंदन करून, उपस्थितांच्या साक्षीने बाळासाहेब पाटणकरांच्या हस्ते श्रीफळ फोडून या सांगीतिक मेजवानीस सुरुवात झाली.

घनश्याम सुंदरा गाऊन भूपाळीचे स्वर छेडले गेले,

योगायोगाने पूर्व दिशेलाच तोंड करून बसलेल्या गायकाच्या मूखुन प्रभाती सारा गाव जागवीत येणाऱ्या सूर्यदेवाचे पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव गाऊन गुणगान झाले,

लेकरांची सेवा करणाऱ्या विठू माउलीचे गुण गात, सर्वसृष्टीनिर्मात्याचे उपकार कसे फेडायचे हे प्रश्न करत अभंगामध्ये गोडी आणण्याचे प्रयत्न झाले,

वेदांना सुद्धा ज्याच्या सीमांचा थांग लागला नाही त्या पंढरीच्या राजाला गदिमा लिखित बाबूजींच्या कानडा राजा पंढरीचा या सुरेल गीताने भजले गेले!

भूपाळी अन भक्तिगीतांकडून भावगीतांकडे जातानाच्या वळणावर दरबारी आलेल्या रसिक श्रोत्यांना भक्तिभावाने निःसंग होऊन नाचण्या गाण्याचे आवाहन करणाऱ्या टाळ बोले चिपळीला या यमन रागातील सुश्राव्य गीताचे सादरीकरण झाले. या सादरीकरणामध्ये राग यमनची जादू, यमनच्या व्याप्तीची अनुभूती देण्याच्या प्रयत्नात यमन रागातील आठ दहा गाण्यांना टाळ बोले च्या तिसऱ्या चरणात गायले गेले.

त्यामध्ये,

प्रथम तुला वंदितो मधून झाले गणरायाचे नमन,
लगोलग झाले कबीराचे शेले विणणाऱ्या कौशल्येच्या रामाचे स्मरण,
एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात म्हणत विनंती झाली ज्याच्या अंगणी आपले शेवटचे घरटे आहे त्या श्रुष्टीकर्त्याला,
द्वंद्वातील भावरसाकडे जाताना धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना मधून लागलीच प्रेमरसही वाहिला,
धुंदी कळ्यांच्या शब्दरूप आले मुक्या भावनांकडून लगेच झाले पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा वाल्या भावनांचे प्रकटीकरण,
अवघे रसिक खुलून गेले जेव्हा झाले निगाहे मिलाने को दिल चाहता हे चे क्विक सादरीकरण,
समर्थांच्या मनाच्या श्लोकांना लावली गेली निगाहे मिलानेची चाल,
एहसान तेरा होगा मुझपर ऐकताना हळूहळू यमनच्या जादूने श्रोते होऊ लागले बेहाल!

खरी मजा आली जेव्हा आला क्लायम्याक्स,

"ख्वाबो में छुपाया तुमको, यादों में बसाया तुमको

मिलोगे हमे तुम जानम, कही ना कही..." या परिचित ओळी ऐकून श्रोत्यांनी आपोआप पुढे सोचेंगे तुम्हे प्यार गायले आणि इकडे स्टेजवर मूळ मुद्द्यावर परत येत आशिष सरांनी जनसेवेपायी काया झिजवली अन लागलीच टाळ्यांच्या स्वरूपात रसिक श्रोत्यांची दादही मिळवली. एकंदरीत यमनची जादू श्रोत्यांना खूप भावली!

एकापाठोपाठ एक अशा लागून आलेल्या एकाच रागातील पण विभिन्न तालांतील या गीतांना कोणत्याही फारशा सरावाविना तबला विशारद ज्ञानेश्वर वनारसे यांनी दिलेली तबल्याची साथही निव्वळ प्रशंसनीय होती!

भावगीतांना सुरुवात करताना सर्वपित्री अमावस्येदिवशी स्मशानभूमी मध्ये भजनाला बसून स्वतः सादर केलेले उद्धवा अजब तुझे सरकार हे अर्थपूर्ण असे कर्णमधुर गीत कांता बुवा लोहार यांनी गायले. प्रत्येक ओळीतून समाजातील विरोधाभास मांडणारे जगाच्या पाठीवर चित्रपटातील बाबूजींचे हे गीत श्रोतहृदयांना स्पर्शून गेले.

गेल्या दोन वर्षी, मी प्रत्येक वेळी गाण्यासाठी निवडलेले पण व्यवस्थित न बसल्यामुळे ऐनवेळी कँन्सल केलेले, माझ्या साठी ऑल टाईम इन्स्पिरेशन राहीलेले आकाशी झेप घे रे पाखरा हे आराम हराम है चित्रपटातील सुधीर फडकेंचे गीत गाण्याचा यावर्षी मी प्रयत्न केला. कष्टाविन फळ ना मिळते, तुझं कळते परी ना वळते हे चरण गाताना जणू ती सेल्फ इंस्ट्रक्षण असल्यासारखाच फील येऊन गेला!

त्यानंतर यशवंत देवांनी स्वरबद्ध केलेलं वसंतरावांनी गायलेलं कुणी जाल का सांगाल का हे अतिशय मधुर अन तितकच अवघड असं भावगीत आशिष सरांनी ज्ञानेश्वर च्या तबला साथीने अतिशय सुंदररित्या सादर केले.

आयुष्यावर बोलू काही च्या माध्यमातून खरेंनी ओतलेला काव्यरस मन तळ्यात मळ्यात हे गोड गीत अशिषमुखी ऐकताना श्रोत्यांनी भरभरून प्रश्न केला, त्या सहजसुंदर गाण्याला प्रेक्षकांचा वन्स मोअर हि मिळाला!

कार्यक्रमाच्या मध्यंतरातील सेशन मध्ये या वाऱ्याच्या बसुनी विमानी या बालगीताच्या चालीवर मी रचलेले 'चला लोकहो सुरु करूया उत्सव गणपती देवाचा' हे गीत तबला पेटीच्या साथीने गाण्याचा प्रयत्न केला. यांतील मुख्य आकर्षण म्हणजे अगदीच लहान वयात संगीत शास्त्राची उत्तम जाण असलेल्या छोट्या ऋग्वेद आणि अथर्वने पेटी तबल्याची साथ केली. माझ्यातील लिमिटेड ज्ञानाच्या गायकाने बिचार्या ऋग्वेदची परीक्षा पहिली. त्याने काळी दोन मध्ये सेट केलेले गाणे माझ्याकडून ऐनवेळी चुकून वरच्या पट्टीत उचलले गेले, स्वरचित गाण्याला स्टेज मिळाले, एवढेच काय ते समाधान मिळाले!

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आशिष सरांनी चहा पिऊन तरतरी आलेल्या प्रेक्षकांसाठी आपल्याच काकांनी रचलेला चहा वरील पोवाडा आमच्या जी-जी साथीने ताकदीने गायला, निखळ मनोरंजन झालेल्या श्रोतेवर्गात तो ऐकून एकच हशा पिकला.

तदनंतर, गणपुले सरांनी उद्धव अजब तुझे सरकार सारखीच समाजातील पैशाच्या धर्तीवर असलेल्या विरोधाभासावर प्रकाश टाकणारी जगदीश खेबुडकर रचित वासुदेवाची वाणी आपल्या वाणीतून ऐकवली जी प्रेक्षकांनी आपल्या टाळ्यांनी उचलूनही धरली.

संगीत क्षेत्राशी आपली नाळ जोडलेल्या पण प्रथमच स्टेजवर गायची संधी मिळालेल्या सागरने मिळालेल्या संधीचे सोने करत दिवस तुझे फुलायचे हे गोड गाणे तितक्याच सुमधुरतेने गाताना श्रोत्यांनाही गाण्यासोबत झुलवत ठेवले.

झुलत झुलत श्रोतावर्ग सावरत नाही तोवर गणपुले सरांनी काटा रुते कुणाला या नाट्यगीतातून, ज्ञानेश्वरांच्या तबल्याची अप्रतिम साथ घेत, एक सुरेल तालबद्ध भीमपलासी काटा श्रोत्यांच्या मनांमध्ये रुतवला अन जणू आपल्या आतल्या जीवाची कळच काय ती पुढे पोहचवली.

रुतलेल्या काट्याच्या वेदना भरून येत नाहीत तोवरच नुकतेच दिवंगत झालेल्या स्वर्गीय यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली, अरुण दातेंनी गायलेली, मंगेश पाडगावकर लिखित वृंदावनी सारंग मधील भातुकलीची कहाणी सांगायचा मी प्रयत्न केला.

आदल्या दिवशी हनुमान पेठ आयोजित दिवाळी पाहत कार्यक्रमात झालेले, दोन पहाटेंमध्ये एकमेव कॉमन असलेले गीत वगळून त्या जागी जस्ट आदल्या दिवशी बसवलेल्या अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान या सागरने लीड केलेल्या समूह गायनाने श्रोतेवर्गाच्या मुखातूनही मारुती मंदिराच्या दारी हनुमानाचा जप वदवून घेतला. गीताच्या शेवटी राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमानकी च्या जपाबरोबर हे राम चा पॅरलल सूर जेव्हा लागला तेव्हा अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला!

यानंतर जे गाणे आले त्याने संपूर्ण कार्यक्रमावर कळस चढवला! ते वीरगीत होते वीर सावरकरांचे ने मजसी ने परत मातृभूमीला, सागर प्राण तळमळला!

आशिष ने सुधीर फडकेंच्या आर्त सुरांतल्या चालीची झलक सादर करून नंतर संपूर्ण गाणे ह्रिदयनाथांच्या संगीतबद्ध चालीमध्ये सादर केले! त्या गीतासोबत उपस्थित जण त्या वीररसामध्ये अक्षरशः वाहून गेले.

सवंगड्यांच्या आग्रहाखातर गेल्या वर्षी गायलेल्या सुख के सब साथी चे एक कडवे गायले गेले आणि बघता बघता कार्यक्रमाच्या भैरवीची वेळही आली.

भैरवीचे गोड स्वर लागायच्या आधी वागडोळे गुरुजींनी आभारप्रदर्शनाचा भार आपल्या खांद्यावर घेतला. आपल्या जातीच्या विनोदी शैलीत त्यांनी सादरकर्त्यांचे, आयोजकांचे, उपस्थितांचे साभार आभार मानले. पाटणकरांच्या काकांकडून आभाराचा नारळ स्वीकारताना अजून प्रगतीची गरज आहे वाला ( पर्टीक्युलर्ली मला! ) गेल्या वर्षीचाच रिव्हिव यावर्षीही मिळाला अन मला पुन्हा आकाशी झेप मधल्या कष्टावीण फळ वाला पॅरा आठवला!!

आभार प्रदर्शनाचा कौतुक सोहळा झाल्यानंतर आपल्या स्वलिखित, स्वरचित निवेदनाने कार्यक्रमाची उंची वाढविणाऱ्या निवेदिका सौ. अनुष्का गणपुले वहिनींनी सवंगडी ग्रुपसाठी चार शब्द कौतुकाचे बोलले, ते ऐकून मन अक्षरशः भरून आले. मला वाटतंय त्या चार शब्दांचे पाच शब्द जरी झाले असते तरी भावना उतू जाऊन डोळ्यांतून पाणी बाहेर आले असते!

अनुष्का वाहिनींचे ते चार शब्द हे असे होते,

"काही पुण्य असल्या शिवाय चांगले मित्र भेटत नाहीत. आज मला आणि माझ्या मैत्रिणींना खूप आनंद वाटतो की आम्ही सवंगडी ग्रुप मधील सदस्यांच्या पत्नी आहोत. कारण लग्नानंतर संसारात अडकून जाणारी अनेक माणसं मी पहिली. पण सवंगडी ग्रुप सारखी घट्ट मैत्री कोणाचीच नाही अनुभवली. ग्रुप मधील प्रत्येक जण आज यशाच्या शिखरावर असताना फक्त मी आणि माझं एवढंच न जपता प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होतो.

लांब सहली, गेट टुगेदर, वाढदिवस असो सगळे आवर्जून एकत्र येतातच. तिथं पैसा, हिशोब याचा पत्ता कधीच नसतो. सवंगडी ग्रुपच्या सौजन्याने आपल्या मित्राला दाद देण्यासाठी सर्व जण रात्रीपासून धडपडत आहेत. जे करायचे ते मनापासून करताहेत. त्यांच्यामुळेच आज कलाकारांना गायनाची, वादकांना वादनाची आणि रसिकांना सुंदर/सुरेल गाणी ऐकण्याची संधी मिळत आहे. या सवंगडी ग्रुप ला, त्यांच्या अंतर्गत प्रेमाला कोणती कोणतीच दृष्ट लागू नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना!"

आभार प्रदर्शन झाल्यानंतर भैरवीचे सूर लागले,
गीत रामायनातील त्रिवार जयजयकाराचे गणपुले सरांपाठोपाठ समूह गायन झाले,
रामाच्या झालेल्या त्या त्रिवार जयजयकाराने अवघे सभामंडप निनादुन गेले!

समयिं वर्षतिल मेघ धरेवर
सत्यशालिनी धरा निरंतर
सेवारत जन, स्वधर्मतत्पर
शांतिः शांतिः मुनी वांच्छिती, ती घेवो आकार
त्रिवार जयजयकार, रामा, त्रिवार जयजयकार

हेंचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा
गुण गाईन आवडी हेचि माझी सर्व जोडी
हेचि माझी सर्व जोडी हेचि माझी सर्व जोडी
न लगे मुक्ति आणि संपदा, संतसंग देई सदा
तुका ह्मणे गर्भवासी सुखें घालावें आह्मांसी
सुखें घालावें आह्मांसी सुखें घालावें आह्मांसी

बोलापुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम !
पंढरीनाथ महाराज कि जय !!!!

- D For Darshan

 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...