Close

विजयादशमीच्या सोनेरी शुभेच्छा

 "अहो, काय हे, किती उशीर? सव्वा सात इथंच वाजले, कधी जाणार आपण, कधी भजन करणार आणि कधी उठणार?

मला पुढं विकासनगर मध्ये अजून एक भजन आहे.",

माझ्या ऑफिसच्या बाहेर गाडीवर बसलेले महेशराव घड्याळाकडे बोट दाखवत म्हणाले.

"सॉरी स्वारी, थोडी ऑफिस मध्ये इलेव्हन्थ हावर ला गडबड झाली आज", म्हणत म्हणत मी महेशरावांच्या दिशेने निघालो.

"चला चला बसा लवकर आता तरी", महेशराव गाडीला लगबगीने किक मारत म्हणाले.

आज जाऊ का नको या कंफ्युज्ड स्टेट ऑफ माईंड मधेच मी खरंतर गाडीवर बसलो कारण मला दांडिया याटेंड करायला गावात जायचे होते आणि भजनही मिस करायचे नव्हते.

"हे काय बसलो ना, चला फास्ट, मला बहुतेक भजन अर्धवट सोडून यावं लागणार आहे आज, गावात जायचंय दांडियालाS, आ सावकाश!", मी कचकन रस्त्यात लागलेल्या एका खड्ड्यामुळे माझी किंचित बदललेली पोझिशन जैसे थे करत म्हणालो.

"हम्म, म्हणजे भक्ती सोडून मौज करायला निघालाय तुम्ही म्हणा की", महेशरावांनी टोमणा मारला.

"हाहा, अहो, ती पण एक प्रकारची भक्तीच आहे. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून निष्कपट, निष्कलंक भावाने भगवंताशी एकरूप झालं म्हणजे बास अशी साधी, सरळ, सोप्पी या वयात तरी माझ्यासाठी भक्तीची व्याख्या आहे. मग ते टाळ, पेटीच्या संगतीने केलेलं गायन, वादन असो किंवा आता हे असं नवरात्रीत गरबा, दांडिया खेळत देवीसमोर केलेलं नृत्य असो. गाणं वाजवणं काय अन नाचणं काय, त्या भगवंतानीच त्याच्या भक्तांना त्याच्या पर्यंत पोहचण्यासाठी दिलेले वेगवेगळे मार्ग नाहीत का", मी माझ्या भजन चुकविण्याच्या डिफेन्स मध्ये बोलून गेलो.

"कसलं काय, बदललंय ओ सगळं आता.", न पटल्याच्या भावात, दांडिया म्हणजे मौजच, या आपल्या भावनेवर ठाम रहात महेशराव वदले.

भजनावर निस्सीम भक्ती करणाऱ्या महेशरावांना फारसे उलटे न बोलता आपले म्हणणे पटवून देणे अवघड आहे हे जाणून मी शांतीतच क्रांती समजून वाचा शांत केली. पण, इकडे वाचवयवाच्या वीतभर वर असलेल्या भागात मात्र भजनावर प्रेम करणारा दर्शन आणि त्याचबरोबर दांडिया वरही तितकेच प्रेम करणाऱ्या दर्शन मध्ये आपसांत जुगलबंदी सुरु झाली.

त्याला अलंकापुरीत नांदनारा तो सुपात्र ज्ञानराजा ही देवस्थानी वाटला आणि अलगिरी नंदिनी वाली देवीही!
गवळनींमध्ये केलेलं राधेचं वर्णनही आवडलं आणि राधा ही बावरी, परी हूँ मै सारख्या रचनातले नायिकेचे वर्णन अन आत्मविश्वासही!
एकतारी संगे एकरूप होणारे भजनी तर भावलेच पण चौघडा वाजवत सनन सनन होणारे गरबा खेळणारेही!

कुठे ना कुठे मनी भाव तोच आहे फक्त भावाचं प्रदर्शन वा सादरीकरण बदललंय!
काळानुसार ते बदलतही राहणार!
त्या बदलांचा करून घेतला तर त्रासही होणार आणि आत्मसात केला तर आनंदही!
भगवंताने दिलेल्या आयुष्यात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा मस्त ब्यालेन्स ठेऊन आनंद मानत जगणे हे केव्हाही चांगलेच!
सोन्यासारख्या या आयुष्यात सोन्यासारखे होऊ, सोन्यासारखे वागू, सोन्यासारखे जगू!
हे शक्य झाले तर प्रत्येकाला लाभलेल्या सोन्यासारख्या या आयुष्याचे खऱ्या अर्थाने सोनेच होईल!

सोने व्हा, सोन्यासारखे रहा!
विजयादशमीच्या सोनेरी शुभेच्छा! हैपी दसरा!!

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...