Close

का_वाचावं? काय_वाचावं? कसं_वाचावं? पण_वाचावं!

का_वाचावं?

"वाचाल तर वाचाल" हा तीन शब्दांचा सुविचार वर्षानुवर्षे प्रचलित आहेच.

का वाचावं या प्रश्नाचं उत्तर माझ्या नजरेतून जणू त्यामधेच दडलं आहे -

वाचण्यासाठी वाचावं! मिळालेले एक आयुष्य जगण्याच्या पलीकडे जाऊन जर त्याच आयुष्यात अनेक आयुष्य जगायचा अनुभव घ्यायची इच्छा असेल तर ते अनुभव जगण्यासाठी वाचावं!

लोकं छंद या कॉलम मधे 'वाचन' लिहितात, वाचन हा छंद नसून ती गरज आहे हा विचार प्रचलीत होणं गरजेचं आहे. पुन्हा का वाचावं याचं उत्तर यामध्येही दडलंच आहे. जस पोटाची भूक भागविण्यासाठी खाणं जरूरी आहे तसंच मेंदूची वैचारिक भूक भागविण्यासाठी वाचणं जरुरी आहे!

आत्तापर्यंत लिहून ठेवलेल्या साहित्याचा एका उभ्या आयुष्यालाही सर न होणारा डोंगर साहित्यिकांनी आपल्यासाठी उभा करून ठेवला आहे. पण तो सर करायचे दूरच त्यावर पहिलं पाऊल टाकायलाही आजरोजी जास्त कुणी मागत नाही. येणाऱ्या पिढ्यांमध्ये वाचनाची आवड तेव्हा निर्माण होईल जेव्हा आजच्या पिढ्या आवडीने वाचतील. शेवटी येणाऱ्या पिढ्यांचा 'अनुकरण' हाच धर्म असतो. त्यामुळे वाचन ही आवड नसून गरज बनून राहिली आहे आपल्याच पिढीसाठी!

काय_वाचावं?

इतरांचे अनुभव जाणून घेण्यासाठी आत्मकथा वाचाव्यात, स्वतःमध्ये आग लावून आत्मविश्वासाने पेटून उठण्यासाठी मोटीव्हेशनल पुस्तके वाचावीत, स्वतःची करमणूक करत स्वतःलाच उपदेश करण्यासाठी कथा-कादंबऱ्या वाचाव्यात, स्वतःला पवित्र करण्यासाठी अध्यात्म वाचावे, बसल्या जागेवरून सफर करण्यासाठी प्रवासवर्णने वाचावीत, काय वाचायचं नाही तर काय काय म्हणून वाचायचं?

मी तर म्हणेन काहीही वाचाव ( अर्थातच चांगलं ) ते केलेलं वाचनचं आपल्याला आपण पुढे काय वाचायचंय याचं मार्गदर्शन करेल. आपण पुढे काय वाचावं याची उकल जसजसे वाचत जाऊ तसतशी आपोआप होत जाईल!

कसं_वाचावं?

मनाची सताड दारे उघडी ठेऊन वाचावं,
जे वाचतोय त्याच्या प्रत्येक पानावरील, प्रत्येक वाक्याच्या, प्रत्येक शब्दाला मान देऊन वाचावं,
लिहिणाऱ्याने कोणता भाव मनी ठेवून लिहिलं असावं याचं भान ठेवून वाचावं,
नुसतं जे वाचलं जातंय त्याला आहे तसं आत्मसात करण्यापेक्षा त्यावर लिहायला आपल्यातील लेखकाला जाग येईल असं वाचावं!

पण_वाचावं!

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...