Close

प्रेक्षकाच्या नजरेतून....

प्रेक्षकाच्या नजरेतून....

शेतकरी आत्महत्या, अर्थातच विषय काही नवीन नाहीये.

गेली वर्षानुवर्षे हा ज्वलंत प्रश्न उभ्या महाराष्ट्रात निरुत्तरीत अवस्थेत ठिणग्या उडवत धगधगत आहे.

त्या धगीत कित्येक शेतकरी कुटुंबे पोळून गेलेली आपण वाचली आहेत. घराच्या कुटुंबप्रमुखाने स्वतःसकट संपूर्ण कुटुंबाला मृत्युच्या खाईत ओढल्याचीही उदाहरणेही कमी नाहीयेत.

कर्मसिद्धांतांना गालबोट लावणाऱ्या काही नतद्रष्ट समाजकंटकांनी याही विषयाचे भांडवल करून आपल्या पोळ्या भाजून घेतल्याचे आपणांस ज्ञात आहे अन त्याचजोडीला कर्मसिद्धांताची दुसरी बाजू असलेल्या नाम सारख्या संस्थांनी आपल्या शेतकरी बांधवांना अशा टोकाच्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या कारणांच्या मुळांवरच घाव घालण्याचा केलेला प्रयत्नही आपल्या पाहण्यात आहे.

खरंतर फक्त शेतकरी आत्महत्याच नाहीतर अक्खा शेतकरी हा विषयच राजकारणाचं भांडवल होऊन बसलाय. भारतासारख्या कृषिप्रधान राष्ट्रात जर शेतकरी सुजलाम सुफलाम झाला तर छोटे मोठे व्यापारी सुजलाम सुफलाम होतील, व्यापारी सुखाने नांदले तर इंडस्ट्रीज ना बहर येईल आणि अर्थातच इंडस्ट्रीज बहरून गेल्या तर संपूर्ण अर्थव्यवस्था बहरेल! साध सरळ सोप्प निसर्गचक्रा सारख्या डिपेंडन्सी चक्राचं उदाहरण वाटतंय!

माझ्यासारख्या या क्षेत्राचा इतंबूत अभ्यास नसलेल्या माणसाने या प्रगल्भ विषयावर आपली अशी अक्कल पाजळणे याला खरतर काहीच अर्थ नाही हे मलाही कळतंय, पण जर एकच गोष्ट अशी वर्षानुवर्षे चिघळत रहात असेल तर नक्कीच सिस्टिम मध्ये कुठंतरी काहीतरी चुकतंय!

असो, याच धर्तीवर साताऱ्याच्या ऐतिहासिक राजपथावरील मारवाडी भुवन गणेशोत्सव मंडळाने आपल्या एकशे एक वर्षांच्या इतिहासाच्या वर्तमानात आज रोजी या प्रश्नाला आपल्या परीने उत्तर द्यायचा प्रयत्न करताना सादर केलेला हा समाज प्रबोधनपर हृदयस्पर्शी देखावा लावलेल्या विशेषणाप्रमाणे हृदय तर स्पर्शून जातोच, पण त्याचबरोबर आपल्या विचारकक्षाही रुंदावून राहतो.

स्वाइन फ्लू च्या अपेक्षित धास्तीने वावरणाऱ्या, पण ती भीती मनी असूनही आपल्या बाप्पाच्या भक्तांनी घेतलेल्या मेहनतीना पाहायला नेहमीच्याच उत्साहाने हजेरी लावलेल्या शाहुवासींयांसमोर जेव्हा या देखाव्याचा पडदा उठतो,
तेव्हा माझ्या राजस्थान ट्रिप च्या काव्यातील इंडिया म्हणजेच अमित कासट आपल्या रुबाबदार व्यक्तिमत्वाने निवेदन करायला फोकस लाईट मध्ये स्टेज वरती उभा ठाकतो,
निवेदन ऐकूनच आम्हा प्रेक्षकांचा पाय जागीच रोवून जातो अन हा देखावा स्टेजवर काय खेळ मांडतोय या अपेक्षेने प्रत्येक प्रेक्षक देखाव्याशी एकरूप होऊन जातो.

मंडळाचा मुरलेला अभिनेता ललित कासट उर्फ लल्या याने साकारलेला देखाव्याचा नायक अर्थातच शेतकरी सावकारांच्या सततच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करू लागतो. त्याचवेळी, प्रसाद बारटक्के उर्फ बंडाने साकारलेला तिथून जाणारा पादचारी, शेतकऱ्याला तसं करताना पाहून शहाणपनाचे चार शब्द सांगतो आणि त्याला आत्महत्येपासून तात्पुरते परावृत्त करून त्याच्या घरी घेऊन येतो.

चंदूकाकांच्या आकांक्षाने साकारलेली शेतकऱ्याची बायको, राठींच्या आदित्यने वठवलेली शेतकऱ्याची आई, अक्षय पुणेकर अभिनित शेतकऱ्याचा बाबा आणि छोट्या आरुषरुपी शेतकऱ्याचा छोटा मुलगा अशा चार जणांच्या कुटुंबात पादचारी कुटुंबप्रमुखाला घेऊन येतो. त्याने घेतलेल्या आत्महत्येच्या निर्णयाविषयी कुटुंबातील लोकांना सहजतेने कल्पनाही देतो.

ती बातमी ऐकून कुटुंबातील प्रत्येकाने दिलेली प्रतिक्रिया, घरातल्या प्रत्येकाच्या नजरेत वेगळ्या नात्याने घर करून असलेल्या आपल्या कर्त्या माणसाच्या कायमच्या जाण्याच्या नुसत्या कल्पनेने झालेली त्यांची अवस्था, या गोष्टी असा आत्महत्येसारखा आत्महत्या करणाऱ्याचा स्वार्थी निर्णय किती भयंकर असू शकतो या गोष्टीचा विचार करण्यास प्रेक्षकासही भाग पाडतात.

त्या सर्वांच्या संवादात "शेतकऱ्याची बायको कधी आत्महत्या केलेली ऐकली आहे का?" सारखा सामान्य माणसाने केलेला प्रश्न, "काळजीने पोट नाही भरत" सारख्या डायलॉग ने शेतकऱ्याने केलेला डिफेन्स, हळू हळू प्रेक्षकाच्याही नकळत त्याचे डोळे पाणावून जातात. या विषयाच्या गांभीर्याची गंभीरताच ते संवाद जणू दर्शवतात.

काम करणाऱ्याच्या पाठिशीच देव असतो असे म्हणत सामान्य माणसाच्या रुपात घरी आलेला माणूस शेतकऱ्याचे मनपरिवर्तन करून एक्झिट घ्यायला लागतो तेव्हा पुन्हा "कोण आहेस तू" वाला प्रश्न शेतकरी त्याला करतो. इथेच देखाव्याचा क्लायमॅक्स होतो आणि लाईट्स अन स्मोकच्या जुगलबंदीत सामान्य माणसाच्या जागी साक्षात विठ्ठल स्टेजवर प्रकट होतो!

जागेच्या मुबलकतेची समस्या असूनही थोडक्या स्टेज चा मंडळाने सेट उभा करण्यासाठी विभागात केलेला वापर वाखानन्याजोगा आहे. अवघ्या चार दोन दिवसाच्या रिहर्सल मध्ये देखाव्याचे केलेले सादरीकरण, पात्रांना जिवंत करनारा कलाकारांचा जीव ओतून केलेला अभिनय आणि मंडळाचे एकूणच प्रयत्न या सर्वांचे चीज करून एक चांगला मेसेज लोकांपर्यंत पोहचवण्याचा गणपती बाप्पाने मारवाडी भुवन मंडळाला शंभर वर्षाच्या भक्तीचा यशरूपी प्रसादच दिला आहे.

प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे शिवाजी वा संभाजी महाजारांवरचे या मंडळाने सादर केलेले देखावे प्रेक्षकांनी गेली काही वर्षे पाहिले, त्यांना प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद अन दाद ही दिली. मिळालेल्या बक्षिसांनी कलाकारांच्या प्राणतिडकीने केलेल्या अभिनयाची कदरही झाली. साक्षात महाराजच स्टेज वर अवतरले आहेत या गोष्टीचा फील आपली नजर अन देहबोलीतून प्रेक्षकांना देणाऱ्या Sanket ला प्रेक्षकांनी मिसही केलं. पण हे सर्व असूनही इतिहासातून बाहेर येऊन मंडळाने हा ज्वलंत विषय घेऊन वर्तमानात मारलेली उडी निश्चितच सराहनिय ठरली!

माझा मात्र हा देखावा पाहिल्यानंतर थोडा अर्जुन झाला. समाजाला पोसणाऱ्या शेतकरी बांधवांना त्यांच्या जीवांचे महत्व पटवून देण्यासारखी वेळच मुळात समाजावर का यावी? या देखाव्यातील विठ्ठल, शेवट करताना एक खूप चांगला संदेश देऊन जातो तो असा की, "कष्ट करणाऱ्यांच्या पाठीशी मी कायम उभा आहे" निराशेच्या खाईत लोटल्या गेलेल्या व्यक्तीला भगवंताच्या अशा आधाराच्या दिलाश्यापेक्षा मोठा दिलासा तो कोणता! पण माझ्यातला अर्जुन मला असं विचारून जातो की, भगवंताला असं का वाटून राहातं की शेतांमध्ये काळ वेळ न पाहता राब राब राबणारा शेतकरी कष्ट करत नाही? त्याच्या एवढं कष्ट त्याच्या कडून पैसे उकळायला आलेला एखादा सावकार करतो का माझ्यासारखा दिवसभर एसी मध्ये खुर्चीत बसून काम करणारा? देवाचे, त्या श्रुष्टि कर्त्याचे अस्तित्व मी कायमच मान्य करत आलोय, आणि करत राहीन, पण असे विरोधाभास पाहिले की त्या श्रुष्टीकर्त्याच्या लॉजिक वर लॉजिकच काम करत नाही.

एका बाजूला शून्यही मोजणे अवघड जाईल एवढ्या रकमेची कर्जे बुडवून त्या विध्यात्याच्या राज्यात लोकं या भागातुन त्या भागात जाऊन ऐश करू शकतात तर दुसऱ्या बाजूला कष्ट करत खितपत जगणाऱ्या शेतकरी बांधवांना किरकोळ रकमांच्या कर्जासाठी भगवंत त्यांना स्वतःच स्वतःला मारायचा निर्णय घ्यायला लावून आपल्या घरी बोलावून घेतात.

आपण भगवंताच्या मर्जीने येतो अन भगवंताच्या मर्जीने जातो तर मग कर्माचा सिद्धांत सांगणारा भगवंत असा दुटप्पी का वागतो? मारणाराही तोच अन मरण्यापासून परावृत्त करणाराही तोच?

स्वतः श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की, कर्म कर फल की चिंता मत कर, मग असे सांगताना कर्म करूनही फल न मिळालेल्या या शेतकऱ्यांला पार चिंतातुर करून सोडून त्याला असं मरण्याचं आमंत्रण का देतात? राब राब राबूनही जर केलेल्या कर्माच फळच मिळालं नाही तर त्या शेतकऱ्याने त्याच्या परिवाराला खायला काय घालायचं?

या धर्तीवर मला बाबूंजींचं हा विरोधाभास मांडणार भगवंताला उद्देशून गायलेलं ते गीत आठवतय :

उद्धवा, अजब तुझे सरकार!
लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार!

इथे फुलांना मरण जन्मता
दगडाला पण चिरंजीविता
बोरीबाभळी उगाच जगती, चंदनमाथि कुठार!

लबाड जोडिति इमले माड्या
गुणवंतांना मात्र झोपड्या
पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार!

वाइट तितुके इथे पोसले
भलेपणाचे भाग्य नासले
या पृथ्वीच्या पाठीवर ना माणसास आधार!
उद्धवा, अजब तुझे सरकार!

खरंच भगवंता, अजब आहे तुझं सरकार!!

अभिनंदन मारवाडी भुवन गणेशोत्सव मंडळ!! वर्ष१०१

- D for Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...