Close

Mukund Lahoti- The Birthday Boy

काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. फेसबुक वॉल वरती एक जण

मुकुंद लाहोटी या नावाने दिवसाला एक
, कधी दोन वगैरे तीन-

चार, तीन-चार कविता टाकायचे.

कधी ते काव्य निसर्गावर असायचे, कधी मैत्रीवर, कधी जीवनावर तर कधी प्रीतीवर! प्रोफाईलचा फोटो पाहून असं लक्षात येत होतं की कोणीतरी साठ पासष्ट वर्षांवरील व्यक्ती आहे.

त्या कविता, त्यांतील वापरलेले शब्द, ते सहजतेने जुळवलेले यमक आणि कव्हर केलेला जवळपास प्रत्येक विषय पाहून मी असं गृहीत धरून गेलो होतो की लिहिणाऱ्या कवीने लहानपणापासून भरपूर साऱ्या कविता लिहिल्या आहेत आणि आता फेसबुक वरती नवीन नवीन जॉईन झाल्यानंतर त्या लिहून ठेवलेल्या संग्रहातून रोज एखादी दुसरी कविता हि व्यक्ती फेसबुक वर पोस्ट करत आहे. मनातल्या मनात लिखाणाचे कौतुक करून आडनाव एक असूनही पोस्ट करणारी व्यक्ती परिचयाची नसल्याने मी त्या वाचून पुढे जात असे.

नंतर एक दिवस, 'Mukund Lahoti commented on your photo' अशी नोटिफिकेशन माझ्या नजरेस पडली. ज्यांचा कवितांनी मला प्रभावित केले होते त्या काकांची आपल्या पोस्ट वर कमेंट पडल्याची नोटिफिकेशन वाचूनच त्यांनी काय लिहिलं असावं हे पहायला माझी उत्सुकता शिघेला पोहचली. पटकन क्लीक करून कमेंट पाहिली, पाहतो तर काय, मुकुंद काकांनी कमेंटमध्ये माझ्यावर परफ़ेक्त यमकात बसवलेली अशी कविताच रचली होती :

हिरवे रान कसे दिसते शोभुन l
दर्शनची गाॅगल मध्ये दिसते शान ll

कडक भडक रोब असे छान l
पहाताच भल्याभल्यांचे सुटते भान ll

लिखाण तर इतके छान छान l
की वाचताना वाटे,सुटते का भान ll

दर्शन तुझेच वाहते असे वारे l
गाणी ऐकताच मन हो बावरे ll

एकलव्य असा तू, असे हरहुन्नरी l
एक एक कला तुझी, लई लई भारी ll

मुग्धमुक्त भेट मनअंतरांची असे l
माणुसकीचा पाईक तु माझा मित्र असे ll

मुकुंद लाहोटी.

सर्वात प्रथम तर स्वतःच एवढं कौतुक वाचून दहा फूट वर गेलेल्या मला जमिनीवर यायला थोडा वेळ लागला. लागलीच अरे हे एवढे शीघ्रतेने एवढे भारी लिहिणारे मुकुंद काका लाहोटी कोण आहेत म्हणून मी घरी प्रश्न केला. तेव्हा अहो, ते रंजनावाले, किशोर भैय्याचे वडील, ते खूप छान लिहितात असं ऐकण्यात आलंय असा प्रतिसाद मिळाला. अहो, ऐकण्यात काय, इथं त्यांनी माझ्यावरच लिहिलेलं क्वालिटी लिखाण माझ्या इथं समोर वाचनात आलंय म्हणत मी लगेच कमेंट ला रिप्लाय करताना आपल्याला भेटले पाहिजे म्हणून काकांना कमेंट बॅक केलं. काकांनीही लगेच माझा नंबर मागून घेतला. त्या कवी माणसाला देतानाही मी नंबर मग कविता करूनच दिला :

सुरवात होते नवानं ()
सत्ती येते मागून ()
छक्कीसत्ती मग लागून (६७)
छक्की आठ्ठी, आठ्ठी छक्की, सत्ती पंजी (६८ ८६ ७५)
च्या तीन खड्डयांनी माझा नंबर जातो भरून! (९७६७६८८६७५)

पुन्हा याच नंबर ला त्यांनी त्यांच्या स्टाईल ने ओळख देताना लिहले :

नित्य नव्याचा नऊ ()
सप्तरंग तुझा असे भाऊ ()
सासष्ट सदुसष्टाची मोट मिळुन राहु (६६६७)
दोनसहा मध्ये बसले दोन अठठे (६८८६)
सातासह पंचम येतो दर्शन चा,वा पठ्ठे. (९७६७६८८६७५.)

अशा या फेसबुक वरच्या व्हर्च्युअल काव्यसंवादाला आम्ही मोती चौकातील बालाजीवर आमच्या दोघांची भेट घडवून आणून थांबवले. वयाची सत्तरी गाठलेल्या मुकुंद काकांनी गेल्या एकोणसत्तर वर्षांपर्यंत आपल्याला कवितेचा कसलाही गंध नव्हता, कवितेचे पान आले की ते पालटून मी पुढे जात असे विधान केले आणि ते विधान मला धक्काच देऊन गेले. कारण माझा असा ग्रह होता की ते आपल्या आत्तापर्यंतच्या एवढ्या वर्षात कधी ना कधी करून ठेवलेल्या कविता पोस्ट करत असतील. पण त्यांच्या या विधानाने क्लीयर झाले की त्यांची प्रत्येक कविता ही ते ज्या दिवशी टाकतात त्याच दिवशी लिहलेले फ्रेश, ब्रँड न्यू, स्वरचित प्रोडकट असते!

बाप रे! वय वर्ष सत्तर! आत्तापर्यंत लिखाणाचा काही एक गंध नाही! आणि ही व्यक्ती अचानक या वर्षात लिहायला लागते, नुसते लिहितच नाही तर चक्क दिवसाला एक दोन कविता वगैरे करते आणि त्याही या वयात स्मार्टफोन सारख्या गोष्टीचा फोबिया वाटावा तशा फोन चा किबोर्ड वापरून त्या व्यवस्थित टाईप करून सोशल प्ल्याटफॉर्म्स वर टाकते आणि वर्षाअखेर आपल्या कवितांचे पुस्तक छापायचा ध्यास ही ठेवते, काय ही लिखाणाची गती आणि काय ती प्रतिभा अन कसली आलेय वयाची मर्यादा?

काकांचे बोलणे ऐकून मला त्यांच्यासाठी वय हा फक्त एक आकडा असल्यासारखा वाटला. तदनंतर त्यांनी त्यांच्या कविता मला वाचायला देणे, त्यावर मी रसग्रहण करणे, माझ्या पोस्ट्स वर त्यांनी त्यांच्या हटके स्टाईल ने काव्यातूनच कमेंट्स करणे, मी गायलेली गाणी कानसेनाच्या भूमिकेने ऐकणे, जिथे चुकेल तिथे बरोबर त्या त्या जागा आवर्जून दाखवून देणे, त्यांच्या कवितेला मी चाली लाऊन त्यांना माझा आवाज देऊन काव्याचे गाण्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न करणे, परस्परांना उत्स्फूर्तपणे प्रोत्साहन देणे वगैरे आमचे जणू रुटीन झाले आणि समविचारी, लाईक मायंडेड असलेल्या आम्हा दोघांत जणू एक मित्रत्वाचे नातेच तयार झाले.

त्यांनी मला त्यांचे स्वतः प्र के अत्रे यांच्याकडून विगसा ही पदवी मिळालेले, ज्यांची आजवर कैक पुस्तके पब्लिश आहेत आणि जे कि स्वतः प्रकाशक आहेत असे त्यांचे लंगोटी यार वि ग सातपुते यांचा परिचय करून दिला. आपल्या या बालमित्राला गुरु मानत आज सत्तरीकडून शंभरी कडे वाटचाल करताना कविता करण्याचे हे स्वतःला लावलेले वेड,

वाणिज्य शाखेत शिक्षण घेऊन संपूर्ण आयुष्य कापड व्यापारी म्हणून जगलेल्या,
साताऱ्याच्या मोती चौकातील भव्य अशा 'रंजना शोरूम' चे मालक असलेल्या,
घरात कुटुंबप्रमुख या नात्याने प्रेम आणि शिस्त या दोन्हीच्या रसायनाने अखंड परिवाराला एकत्र बांधून ठेवणारा धागा बनून राहिलेल्या,
नातवंडांसोबत खेळताना त्यांच्या सम लहान होणाऱ्या,
मीत्रांसह बोलताना त्यांच्या सम तरुण होणाऱ्या,
आपल्या प्रॅक्टिकल विचारांना कमालीची प्रगल्भता असणाऱ्या,
त्या अंगी असलेल्या प्रगल्भतेमुळे कोणत्याही गोष्टीचा चतुरस्र विचार करणाऱ्या,
ग्राहकाला भगवान माननाऱ्या आणि विधात्यासमोर नतमस्तक होणाऱ्या,
वयाची बंधने झुगारून आपल्या अंगी असलेल्या प्रतिभांना न्याय देत जगावं कसं हा जणू संदेश समाजाला देणाऱ्या,
माझ्या वयाने पितृस्थानी पण नात्याने घनिष्ठ मित्र असलेल्या या मुकुंद काकांना

भविष्यात "कवी मुकुंदराज" वगैरे म्हणून त्यांची ओळख करून देईल, यात आश्चर्य ते कोणते!

वाढदिनाचे अभिष्ट चिंतन काका! तुमच्या इथून पुढच्या वाटचालीसाठी चिंतायला तुम्ही स्वतःच लिहिलेल्या या कवितेतून समर्पक आशयापेक्षा दुसरा आशय तो कोणता असेल!

#संध्यासमय रचना : Mukund Lahoti

सुर्यास्त अजून! नाही झालेला l
जीवनातील खेळ! बाकी आहे l
संध्यासमयीचे जीवन! बाकी आहे l
शंभरी वयाची! होणे बाकी आहे ll

येता सत्तरीत! शंभरी दिसते आहे l
आताशी जगणे! शिकलो आहे l
आनंदाची लेनदेण! बाकी आहे l
नातवडात रमणे! अजून बाकी आहे ll

गत आठवणी काढणे बाकी आहेl
जिवलगांशी हितगुज! करणे बाकी आहे l
सुखदुःख सांगणे! बाकी आहे l
मित्रांसह आयुष्य! वाटून घेणं बाकी आहे!

बाल्य अल्लड! जगणे बाकी आहे l
नेत्रात चित्र भरणे! बाकी आहे l
मृत सवंगडी ते! आठवत आहे l
मित्र अजुन बरेच सोबती आहेत ll

सुर्यास्त अजून! नाही झालेला l
जीवनातील खेळ! बाकी आहे l
संध्यासमयीचे जीवन! बाकी आहे l
शंभरी वयाची! होणे बाकी आहे ll

काका, एक्काहत्तराव्या वाढदिवसाच्या अरबो खरबो शुभेच्छा,
शताब्दी सोहळा तुमच्या खूप साऱ्या कविता संग्रहांच्या साक्षीने करू हीच सदिच्छा!!

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...