Close
In Videos

Tour A Rajasthan - Part II

Tour_A_Rajsthan ( Part II )
( Link to part I in case if you would have missed

Facebook : https://m.facebook.com/story.php?story_fbid=10209966929089938&id=1836426167

YouTube : https://www.youtube.com/watch?v=fvATOaYy1qQ)

सकाळ_सालासारमधली

सतरा तारखेला जेव्हा सालासारच्या मुक्कामी भुवन मध्ये जाग आली तेव्हा कार्यकर्त्यांची लगबग चालू झाली होती. समाजातील अशा कार्यक्रमांचे नियोजन आणि लग्नातील एखाद्या वर्हाडाचे नियोजन यामध्ये काही विशेष फरकच नसतो. तेच सकाळी सकाळी लवकर उठून आवरण्याचा आग्रह करणं, तो आग्रह करताना नाश्टा संपेल असा विनंतीवजा दम देणं, उठल्या उठल्या मस्त चहा, कॉफी, खारी, बिस्किट्स ची पाहुण्यांना रूमपोच सेवा देणं, अर्थातच हे सारं होतंच. ?

त्या दिवशी आम्ही उठलो तेव्हा नानू, आनंद आणि अमित तिघे दोनशे सहा मध्ये उठले तर धीरज, दादा आणि मी दोनशे सात मधे, अर्थात झोपलोही तिथेच होतो! ? चिल्ड एसी मध्ये थंडगार पडलेल्या त्या झोपल्या नंतर काही इंच खाली जाणाऱ्या गुबगुबित मऊमऊ बेड्स वरती झोपेतून उठणे यासारखे दुसरे कठीन काम नव्हते. नुसतं झोपायला हजार दिड हजार किलोमीटरचा पल्ला गाठून एवढ्या लांब राजस्थानपर्यंत आलोय का सारख्या झालेल्या आत्मसाक्षात्काराने एकामागोमाग एक करत सगळ्यांनी त्या स्वर्गसुखाला तिलांजली दिली.

असे बाहेर गेल्यानंतर खोड्या न काढता एकमेकांना सुखाने अंघोळी वगैरे करू दिल्या तर मग काय बोलायचं! काहीसा त्यातलाच प्रकार आमच्या राजस्थानभूमीवरच्या दुसऱ्या आणि सालासार मधल्या पहिल्या आंघोळीच्या वेळीही घडला. दोनशे सहा आणि दोनशे सात ना स्वतःची स्नानगृहे असली तरी त्यांना जी कॉमन भिंत होती ती का कोणास ठाऊक पण वरून थोडी मोकळी ठेवली गेली होती. मग त्या मोकळेपनाचा फायदा घेऊन इकडुन तिकडे आणि तिकडून इकडे थंड पाणी टाकून स्वतःला भिजवून घेण्यासाठीच स्नानगृहात गेलेल्या भाईंना एकमेकांकडून भिजवण्याचे फाजील चाळे चालू होते. त्याच धर्तीवर आनंदच्या वांड मेंदूमध्ये किडा वळवळला आणि दोनशे सहाच्या स्नानगृहाची एक बाजू बाहेरून ऍक्सेसिबल असल्याचा जावईशोध त्याला लागला. मग काय, अंगावरच्या फक्त दोन छोट्या कपड्यांमध्ये आनंद शेठ मोबाईल घेऊन बाहेर आले आणि पुरेशी उंची पुरत नसूनही अगदी टुणूक टुणूक उड्या मारून दोनशे सहा मध्ये स्वतः च्या शरीराला अभिषेक घालत असलेल्या वकीलसाहेबांना कॅमेऱ्यामध्ये चलचित्राच्या रूपात कैद करायचा प्रयत्न करू लागले. हे करताना बाकी भाईंनाही आवर्जून त्याने गोर्यापान वकिलांच्या आंघोळीचा जणू आस्वाद घेण्यासाठी बाहेर बोलावले. हास्याचा एकच कल्लोळ झाला आणि वकीलसाहेबांनी हसत हसतच आपल्या डिफेन्स साठी पाण्याने भरलेला एक पूर्ण ताम्ब्या त्या मोकळ्या जागेतून तसाच मोकळा केला. झुर्रर्रकन उडी मारून आंद्या तर त्याच्या दिशेने आलेल्या पाण्याच्या माऱ्यातून वाचला, पण त्याच्या मागून आपल्या रस्त्याने नटून थटून खाली जाणारा प्रदेशचा आम्हाला अपरिचित भाई मात्र थोडाफार भिजला. सभ्य भाषेत अध्यक्षांना त्यांनी दोन शब्द सुनावले, सॉरी सॉरी म्हणत रेकॉर्डिंग बंद करून अध्यक्ष स्वतःच्या आवराआवरीला लागले. ?

सालासार_ब्रेकफास्ट_अन_सेल्फीसेशन

कार्यक्रमाचा पहिल्या दिवशीचा ड्रेसकोड होता व्हाईट शर्ट आणि ब्लू जीन्स! कमरेवरून पांढरे आणि कमरेखालुन निळे होऊन सातारा माहेश्वरी युवा संघटनचे आम्ही साही कार्यकर्ते एक एक करून रूम्स च्या बाहेर पडलो. दोनशे सहा-सात ना व्यवस्थित लॉक करून सारे नाष्टयाला खाली आलो. देशाच्या उत्तर-पश्चिमेत नाष्टा असला तरी बहुतांश पदार्थ हे अपेक्षेप्रमाणे दक्षिणेतलेच होते. डावीकडे काळ्या गरम तव्यावर ढोशाचे पीठ तडतडत होते, तर तिच्याच बाजूला पांढऱ्या शुभ्र इडल्या हिरव्यागार चटणी सोबत वाढल्या जात होत्या. त्यांना नेहमीप्रमाणे युनिव्हर्सल पोह्यांची जोड होतीच. स्वातंत्र्यदिनी मिस केलेली जिलेबी ही स्वीट मध्ये असल्याने आम्हा भाईंची जिलेबी खायचीही हौस फिटली. जेणेकरून सारे पदार्थ कव्हर होतील अशा क्विक नियोजनाने आम्ही भाईंनी आपल्या प्लेट्स सजवून घेतल्या आणि महाराष्ट्च्या विधविविध भागांना रिप्रेझेन्ट करण्यासाठी राजस्थानातील सालासार नामक पवित्रस्थळी एकत्र आलेल्या इतर भाईंसोबत गप्पागोष्टींसहित नाष्टानंद घेण्यासाठी सहभागी झालो. महाराष्ट् प्रदेश माहेश्वरी युवा संघटनचे सहसचिव श्री अमितजी कासट आणि आखिल भारतीय माहेश्वरी युवा संघटनचे सल्लागार श्री गोकुळजी सारडा यांनी आमचा परिचय करून दिला. सारेच एकमेकांच्या कुठून ना कुठून तरी नात्यागोत्यातले असल्याने 'त्याच्या तिचा तो' सारखे रेफरन्सेस लागून ओळखी निघत गेल्या. इडली ढोशाचे तुकडे तुटत गप्पाना चांगली रंगत चढत गेली. त्या झालेल्या गप्पांमधून आम्ही याआधीची तिरुपतीमध्ये झालेली कार्यकारणी बैठक मिस केल्याची दुःखद जाणीव आम्हाला झाली! ?

नाष्टयानंतर गरमागरम चहाचे घोट रिचवून आम्ही सारे मिटिंग साठी भुवन च्या भल्या मोठ्या हॉल मध्ये येऊन बसलो. अजून सारे इटिंग मधेच व्यस्त असल्याने मिटिंग साठी हॉल मध्ये फारसे कोणी आले नव्हते. मोकळ्या वेळेचा फायदा घेऊन फ्रेश आहे तोपर्यंत फोटोसेशन करून घेऊ म्हणत मी आणि आनंदने आपले मोबाईल बाहेर काढले. तसे राजस्थानात दाखल झाल्यापासून मी तर मोबाईल सेल्फीज काढण्यासाठी तळहाताला जणू चिकटवूनच ठेवला होता. जरा काही वेगळी ऍक्टिव्हिटी झाली की कर हात पुढं आणि दाब बटन, कर हात पुढं आणि दाब बटन असच काहीसं चालू होतं. सेल्फीचा डिफॉल्ट मोड हा मिरर मोड असतो त्यामुळे आपले आत्तापर्यंत तिरळे सेल्फी यायचे हे ज्ञान काही भाईंना नवीन होते. आपण आत्तापर्यंत सेल्फीज मध्ये जितके खराब दिसत होतो तितके प्रत्यक्षात नाही च्या झालेल्या ज्ञानामुळे भाईंचा फोटो काढून घेण्याचा उत्साह दुणावला तिनावला होता. पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये काही कडक फोटोज आम्ही काढले. आपल्या कॅण्डीड फोटोग्राफीचा अभिमान असणाऱ्या आनंदने आपल्या फोटोकाढू कलेचे प्रदर्शन केले. काढलेले काही फोटोज त्याने इकडे ग्रुप वरही सेंड केले. त्यातले बरोब्बर खराब खराब फोटो निवडून पवनजींनी राजस्थानात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे समाजाच्या सोशल पेज वर एफ बी पोस्टिंग केले. साताऱ्यात पवनने मुद्दाम खराब खराब फोटो निवडून एफ बी वर टाकलेत असे वाटून वकिलसाहेब राजस्थानात गोडगोड उचकले! ??

बैठक_कार्यकारणीची_अन_कमाल_धिरजची

राजस्थानचेच सुपुत्र असलेले अखिल भारतीय माहेश्वरी युवा संघटनचे अध्यक्ष आणि महाराष्टर प्रदेश माहेश्वरी युवा संघटनचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारणी बैठकीला सुरुवात झाली. विधविविध भागातून आलेल्या प्रदेश कार्यकर्त्यांच्या कामाचे आढावे घेतले गेले, त्याबरोबरच काही बक्षीस-सत्कारही करण्यात आले. प्रदेश करवी येऊ ठाकलेल्या काही नियोजित प्रोजेक्ट्स ची माहिती सांगितली गेली आणि या सर्व बाबींनंतर प्रश्नोत्तरात्मक संवादाला सुरुवात झाली. विधविविध प्रदेशांच्या कार्यकर्त्यांकडून संमिश्र भावनांचे प्रश्न विचारले गेले. प्रदेश अध्यक्षांनी स्वतःच्या परीने त्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्याचे प्रामाणिक प्रयत्नही केले. काही उत्तरांनी समाधान केले तर काही उत्तरे ऐकून प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या कार्यबुद्धीला चालना देऊन बुद्धयांना नवीन प्रश्नांवर आणून सोडले. या चालू असलेल्या खेळाचा बघ्याच्या भूमिकेत आनंद घेत असताणाच आम्ही आमच्या धीरज ची चुळबुळ नोटीस केली. ती चुळबुळ दुसऱ्या तिसऱ्या कशासाठी नसून ती पुढे जाऊन काहीतरी प्रश्न विचारण्याच्या इच्छेपोटी आहे याची प्रचिती लगेचच आम्हाला आली. आम्हा पाची जणांची जणांची छाती एक एक इंचाने पुढे आली जेव्हा आमच्या धीरज सरांनी शर्ट व्यवस्थित करत, असलेल्या थोड्याफार केसांवर हात फिरवत स्टेज वर एन्ट्री मारली आणि सातारासे सीए धीरज कासट अशी स्वतःची ओळख राजस्थान मध्ये करून दिली! ?

सीए साहेब स्टेजवर निघाले आहेत हि जाणीव होताच मी पहिला सेल बाहेर काढला आणि कॅमेऱ्याचे लाल बटन दाबून त्याला व्हिडिओ रेकॉर्डिंग मोड वर टाकला. "मै ऐसे बिलकुल भी नही कहूँगा की समाज ने मुझे अब तक कुछ भी नही दिया, क्यूकी इसी समाज ने मुझे यहाँ आज खडे रेहने के है काबील बनाया" या धीरजच्या पहिल्याच फेकलेल्या वजनदार मार्मिक वाक्याने अखंड हॉल च्या टाळ्या जिंकल्या. त्या टाळ्यांचा आवाज कमी होतोय तोपर्यंतच "पर मेरा माहेश्वरी संघटन ये भावना ही समाज के लोगोंमें पैदा करणे में असफल हो रहा है कि समाज ने उन्हे कुछ दिया है" या लागून आलेल्या वाक्याने श्रोत्यांना विचार करायला भाग पडून त्यांच्या भुवया ताणावल्या. साताऱ्याच्या या भावी प्रदेश मंत्र्यानी आपल्या प्रश्नांमध्ये पुढे दोन ताकदीच्या विषयांमध्ये हात घातला. पहिला म्हणजे अर्थातच अर्थ क्षेत्राचा जाणकार असल्याने फंडिंग गोळा करताना लागणाऱ्या १२ ए, ८० जी वगैरे सेक्शन अंडर येणाऱ्या समस्यांचा आणि दुसरा म्हणजे समाजासाठी विधविविध ठिकाणी खासकरून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत अन्नछत्रे उभे करण्याचा! विचारलेले प्रश्न आणि ते प्रश्न मांडताना धीरजने दाखवलेली म्यॅट्यूरिटी या दोन्ही गोष्टीची प्रगल्भताच एवढी होती की तिथे बसलेल्या प्रत्येक जनाला त्याच्या मध्ये आपला भावी लीडर दिसून आला नसेल तर नवल! घेतलेल्या चार पाच मिनिटात चार दोन मुद्दे मांडून धीरजशेठ टाळ्यांच्या गजरात खुर्चीवर येऊन बसले. रेकॉर्डिंग संपवून साताऱ्याच्या पदाधिकाऱ्यांच्या ग्रुप वर सेंड करत करत माझ्यासकट बाकी चौघांनी धीरजचे सेंचुरी मारून पॅव्हेलियन मध्ये आल्याच्या थाटात हॅन्डशेक्स वगैरे करून स्वागत केले. ?

धीरजने विचारलेल्या प्रश्नांचे कौतुक आणि एकसाईटमेन्ट एवढी होती की त्याच्या प्रश्नांना उत्तरे काय आली याचे काही फारसे घेणेदेणेच आम्हाला नव्हते! थोड्याच वेळात बैठकीची सांगता झाली आणि सर्वानी भुवनच्या खानकक्षात जेवणासाठी हजेरी लावली. अर्थातच राजस्थानात असल्यामुळे बांधलेल्या अंदाजाप्रमाणे भरपूर साऱ्या आयटम्स मध्ये मेन कोर्स हा डाळबाटीच होता. पुन्हा मस्त ताटे सजवून घेऊन आम्ही जेवायला सुरुवात केली. तेव्हा स्टेज वर जाऊन बोलण्याची किंमत आम्हाला कळाली. सकाळी नाश्टा करताना जिथे सर्वांकडे जाऊन लोकांना ओळख सांगावी आणि विचारावी लागत होती तिथेच जेवणाच्या वेळी लोक आवर्जून धीरजकडे आपली ओळख करून द्यायला येत होते. ?

शुभेच्छा_आनंदच्या_भावाच्या

तुडुंब जेवण झाल्यानंतर थोडी वामकुक्षी घ्यावी आणि पुन्हा दुपारच्या सेशन मध्ये असलेले इंटरनॅशनल स्पीकर चे मोटिव्हेशनल लेक्चर ऐकायला हजेरी लावावी असा विचार करून आम्ही साही जण दोनशे सहा-सात मध्ये आलो. माझ्या वामकुक्षीची गोड कल्पना धुळीस मिळाली जेव्हा आनंदने मला त्याच्या भावाच्या वाढदिवसाला पाठवायला कविता करण्याची रिक्वेस्ट केली. आनंद उर्फ अध्यक्षांचा मावस भाऊ म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून सातारा माहेश्वरी सभेचे कार्यरत अध्यक्ष श्री मुकुंदजी लोयाच होते. तीन चार दिवसांपूर्वीच त्यांचाच मुलगा अर्थात राजू बोलला होता की पप्पांची एकसष्टी आहे, त्यामुळे एक छोटा प्रोग्रॅम नियोजित आहे म्हणून. थोड्याच वेळात भाईंशी चर्चा करत करत मुकुंद भाऊंसाठी एक मस्त रचना तयार झाली,

"सातारा शहर माहेश्वरी सभाध्यक्ष के नाते सातारा शहर माहेश्वरी समाज के प्रथम नागरिक श्री मुकुंदजी लोया,
हमारे परिवार के हर बडे छोटे कार्य में राह दिखानेवाले तथा आगे बढ के हाथ बटानेवाले हमारे आधारस्तंभ श्री मुकुंदजी लोया,
दिल में ढेर सारे प्यार के साथ साथ जरुरत पडे तो कठोर रेहके सामनेवालों को अपनी सोच पे सोचने के लिये मजबूर करने वाले श्री मुकुंदजी लोया,
अपने हर विषय का विस्तार से अभ्यास करके सही रास्ता चुनने का कौशल्य, गलती से रास्ता गलत भी चुना हो तो चुनी दिशा को सही साबीत करणे का अनुभव रखनेवाले श्री मुकुंदजी लोया,
अपने स्मार्ट सेन्स ऑफ ह्यूमर से अपने सहयोगी की हलकी फुलकी नटखट चुटकीयां लेनेवाले श्री मुकुंदजी लोया,
अपने नेतृत्वगुण से अपने व्यापार को प्रभावित करके उसका विस्तार करनेवाले बिझनेसमन श्री मुकुंदजी लोया,

भैय्या आज आपके जनमदिन के बहाने आप पुरे कर रहे जीवन के लगभग साठ साल,
अनुभव किये होगे आपने इस सफर में जिंदगी के कई सारे हाल!
निश्चितः आपने लिये होगे कष्ट तथा दिये होगे ढेर सारे जवाब,
जब पूंछे होगे जिंदगी ने आपसे कई तरह के सवाल!
आपका जवाब देने का यही अनुभव बना हुआ है हमारा आधार,
बस युंही बना रहे आप का इसी तरह का लाड, प्यार तथा आशीर्वाद हमपर जब हमारे साथ पुरे करेंगे आप आपके जीवन के पुरे सौ साल,
भैय्या, बस युंही बना रहे आप का इसी तरह का लाड, प्यार तथा आशीर्वाद हमपर जब हमारे साथ पुरे करेंगे आप आपके जीवन के पुरे सौ साल!

जनमदिन की ढेर सारी शुभकामनाये मुकुंदभाऊ!! ?

भावना - आनंद करवा
शुभेच्छुक - सातारा माहेश्वरी युवा संघटन
शब्द - D for Darshan"

आता या शुभेच्छा लिहिताना "हमारे परिवार के हर बडे छोटे कार्य में राह दिखानेवाले" मधल्या "राह" या शब्दाच्या जागी टाईप करताना चुकून एक उकार जास्त पडला आणि "राह" चा "राहू" होऊन संपूर्ण वाक्याचा अर्थच बदलून गेला. ? पुढे पाठवायच्या आधी वाचताना वकीलसाहेबांना ती चूक जेव्हा लक्षात आली तेव्हा ती चुकभुलीने झालेली घोडचूक एक हशा पिकवून गेली. त्या चुकेबरोबर अजून एक दोन करेक्शन्स करून शुभेच्छा वकील साहेबांकडून अप्रूव्ह झाल्या. अँप्रूव्ह झालेले व्हर्जन, राजू कडून एक मस्त फोटो घेऊन मी पुढे पाठवायला आनंदला फॉरवर्ड केले. आनंदने त्या शुभेच्छा पुढे पाठवताना शेवटची शब्द वाली लाईन खोडायचा केलेला प्रयत्न हेरून मी तो खोडून काढला."अरे, ती मी वरची सौ साल वाली दोनदा झालेली लाईन डिलीट करत होतो असे म्हणून आंद्याने आपला बचाव करायचा प्रयत्न केला. तू किती हुशार आहेस ते आम्हाला माहित नाही का म्हणून वकीलसाहेबांनी आंद्याची कोपरखळी काढली, मग काय लागलीच बाकीही भाई मंडळी त्यामध्ये सामील झाली. ? असो, या नादाने वामकुक्षीच्या ऐवजी काहीतरी समाधानकारक क्रिएटिव्हिटी झाली. मग पाच मिनिटात लटकवलेले शर्ट्स चढवून आम्ही पुन्हा खाली जाऊन मोटिव्हेशनल लेक्चर ला हजेरी लावली.

परतानिंचा_सेमिनार

मोटिव्हेशनल कोचिंग प्रेमी आळशी दादा सोडून आम्ही सारे खाली आलो तेव्हा इंटरनॅशनल लेव्हलचे निलेश परतानी सेमिनार साठी स्टेज वरती रेडी होते. त्यांनी सेमिनार ला सुरुवात तर केली पण इकडे काही वेळापूर्वीच डाळ बाटी सारखे जड जेवण जेवलेल्या श्रोते मंडळींना त्या बाटीचा स्वतःवर होणारा अंमल टाळणे जड जात होते. दोन पापण्या एकमेकांना भेटण्यासाठी आतुर तर झाल्या होत्या पण आजूबाजूचं वातावरण त्यांच्या त्या मिलनाला परवानगी देण्यासारखं नव्हतं. पण आसपासच्या वातावरणाला जुमानतील ते वकीलसाहेबचं कसले! माझ्या शेजारी बसलेल्या वकिलांनी सरळ आलेल्या निद्रेला वाट करून दिली आणि मस्त खुर्चीवर बसल्या बसल्या सेमिनार मधेच ताणून दिली. सारडांच्या वकीलसाहेबाना असे कार्यक्रमात मस्त झोपताना पाहून मला दोन वर्षांपूर्वी सारडांच्याच प्रीतमशेठ सोबत ठाण्यामध्ये अटेंड केलेल्या शायनिंग स्टार्स या प्रोग्रॅमची आठवण झाली. मोठाल्या हॉल मधल्या फुल्ल साउंड म्युझिकल कन्सर्ट मध्ये मस्त पैकी अर्धा पाऊण तास झोपून उठलेल्या प्रीतम शेठ नि पाच मिनिट प्रोग्रॅमचा जागेपणी अनुभव घेऊन, "दर्शन तुला सांगतो साले जे आले नाहीत ना साताऱ्यातून, त्यांनी आयुष्यातला एक खूप चांगला कार्यक्रम मिस केला आहे" अशी रंजक टिपणी केली होती. ?? त्या टिपणीचे स्मरण होऊन माझे मीच गालातल्या गालात हसलो आणि धीरजला सांगून वकीलसाहेबांना जागे करा म्हटलो. त्या चुळबुळीने वकिलांचा चार-पाच मिनिटांचा डुलका भंग झाला, झोपेचा सारा राग बाटीवर काढून वकील चेहऱ्यावरून हात फिरवून परतानिंच्या श्रवणास सेट झाला.

'जहाँ ना जाये गाडी वहा जाये मारवाडी' सारख्या जवळपास डझनभर म्हणींच्या आधारावर त्यांचे सोदाहरणाने रोमांचक विश्लेषण करत परताणींनी आपल्या समाजबांधवांना मार्गदर्शन केले. व्यवसाय क्षेत्रात आपण आघाडीवर असल्याचा समाजातील लोकांचा भ्रम कसा चुकीचा आहे हे विस्तृत करून त्यांनी श्रोत्यांचे जणू डोळे उघडले. सेमिनारच्या त्या दोन अडीच तासात एक चांगली ज्ञानसंपदा झाली. चार चांगल्या गोष्टींची शिकवन त्यायोगे आम्ही भाईंनी घेतली. सेमिनार मिस केलेले दादा मस्त झोप काढून, पिवळा टी-शर्ट पुन्हा चढवून, आम्हाला सेमिनार संपताना जॉईन झाले. आपल्याला एकतरी असा मोठा मोटीव्हेशनल सेमिनार साताऱ्यात घ्यायचाय असे दादांचे स्वप्न त्यांनी त्याक्षणी आम्हाला बोलून दाखवले.

सालासार_बालाजी_मंदिर_दर्शन

सेमिनार संपल्यानंतर चहा कॉफी घेऊन आम्ही त्या पवित्र शहराचे मुख्य आकर्षण असलेल्या सालासार बालाजी मंदिरात दर्शनाला जायचे ठरवले. पिवळे दादा आणि निळे अध्यक्ष सोडले तर आम्ही बाकी सारे पांढरे होतो. भुवन पासून साधारण अर्धा पाऊण किलोमीटर वरती सालासार च्या त्या अवघ्या भारतभूमीमध्ये प्रसिद्ध असलेल्या सालासार हनुमान म्हणजेच बालाजी चे मंदिर होते. काही मिनिटांच्या त्या पायी प्रवासात आम्हाला आमच्या धीरज कडून थोडाफार सालासारच्या बालाजीचा रंजक इतिहास ऐकायला मिळत होता.

धीरजच्या सांगण्याप्रमाणे आपल्या मोहनदास नामक भक्ताला दिलेल्या वचनाप्रमाणे नागौर जिल्ह्यातील आसोटा गावामध्ये एका शेतामध्ये बालाजी मूर्तिरूपात प्रकट झाले होते. जाट शेतकऱ्याच्या बायकोने त्या दिवशी डब्यात आणलेल्या चुरम्याचा नैवेद्य लागलीच त्या मूर्तीला दाखवला आणि तिथून आजपर्यंत बालाजीला चुरम्याचा नैवेद्य दाखवला जातो. ज्या दिवशी ही मूर्ती प्रकट झाली त्याच दिवशी मोहनदास ना स्वप्नात दृष्टांत झाला कि ज्या बैलगाडीने माझी मूर्ती सालासार मध्ये नेली जात आहे, ती बैलगाडी जेव्हा सालासार मध्ये पोहचेल तेव्हा तिला कुणी चालवणार नाही, ती जाऊन ज्या जागी स्वतःच्या मनाने थांबेल तिथे माझी मूर्ती स्थापन करून टाका. त्या झालेल्या दृष्टांताप्रमाणेच आजची मूर्ती आणि मंदिराची जागा आहे. अजून एक वैशिष्टय म्हणजे हे एकमेव हनुमानाचे मंदिर असे आहे कि जिथे हनुमानाच्या मूर्तीला ला दाढी मिशा आहेत. याचे कारणही मोहनदासच होते, त्यांना जेव्हा दृष्टांत झाला तेव्हा दाढी मिशांच्या वेषातच बालाजीने दर्शन दिले होते. याहून महत्वाची गोष्ट म्हणजे बालाजी मंदिराचे कारागीर हे मुस्लिम कारागीर होते. ते ऐकून मला मनातल्या मनात वाटले की वाह काय योगायोग आहे, आपल्या घराचे कारागीर, इंटेरियर वगैरे पण मुस्लिमच आहेत! ?

धीरजमुखातून त्या रंजक गोष्टी ऐकत ऐकत अपार श्रद्धाभावाने आम्ही बालाजी मंदिराच्या दारी पोहचलो. अलाऊड असेल तिथे फोटो काढत, हनुमान चालीसा गुणगुणत आम्ही दर्शनासाठी मंदिरात गेलो. धीरजने दिलेल्या माहितीप्रमाणे मंदिरातून फिरताना बालाजीचा आसोटा ते सालासार पर्यंतचा प्रवास नजरेसमोरून फिरत होता. श्रुष्टीकर्ता आपल्या भक्तांकडून स्वतःचे वैभव स्वतःच कसा तयार करून घेतो हा विचार आम्हाला विचार करायला भाग पाडत होता. अर्थातच बालाजीच्या त्या राज्याही विरोधाभास कमी नव्हते. इथे पैसे मोजून व्ही आय पी दर्शन दिले/घेतले जात होते. सहा पुड्यातल्या चार पुड्या खिशात टाकून दोन पुड्या आमच्या समोरच तोंडात मोकळ्या करून आमच्या हाताला मोळी बांधायला तयार होणारे पुजारीही होते. त्या सर्व गोष्टी जाणून बुजून इग्नोअर करत, दिसणारी प्रत्येक गोष्ट देऊळ, ओ माय गॉड, पिके वगैरे सारख्या चित्रपटांची आठवण करून देणार नाही याची स्वतःलाच समजूत घालत निस्सीम भावनेने आम्ही दर्शन घेण्याचा प्रयत्न करत होतो. बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे जवळपास तीनशे वर्षांपासून सतत तेवत असलेली धुनी दिसली. हनुमानजींचे निस्सीम भक्त त्या धुनीचा अंगारा रोगांपासून मुक्ती मिळविण्यासाठी वापरतात अशीही माहिती आम्हाला मिळाली.

धुनीचा अंगारा लावल्यानंतर आम्ही पुढे अंजनी मातेच्या मंदिरी गेलो. अंजनी माता आणि बालाजी हनुमान यांचे मंदिर असे वेगवेगळे असण्या मागची रंजक कथाही आम्हाला धीरजने सांगितली. बालाजीनेच अंजनी मातेला बोलावून घेतले होते कारण हनुमान ब्रह्मचारी असल्याने त्यांनी मातेला सांगितले होते की यौन किंवा संतान संबंधी समस्या घेऊन येणाऱ्या स्त्री भक्तांच्या समस्यांचे निराकरण करणे मला अवघड जातेय त्यामुळे तू हि ये. माता आल्या नंतर दोघांची एका जागी स्थापना झाली तर पहिली पूजा कोणाची हा वाद नको म्हणून मातेचे मंदिर थोडे लांब स्थापन केले गेले. हनुमान बालाजीला आपल्या गोदी मध्ये घेतलेल्या अंजनी मातेच्या मूर्तीचे आम्ही मनोभावे दर्शन घेतले आणि बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर जवळच झालेल्या भागवत कार्यक्रमाच्या भव्य जागेला भेट देऊन दोन चार फोटो काढून भुवन च्या दिशेने परतीच्या मार्गाला लागलो. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा संपूर्ण संघटन बरोबर बालाजी दर्शनासाठीच नियोजित प्रभातफेरी असल्यामुळे जाताना दुसऱ्या दर्शनासाठी बालाजीच्या भेटीला पुन्हा येण्याचे वेध होतेच.

बदाम_सातची_हास्यरात्र

भुवन मध्ये पोहचल्यानंतर डिनर चे बुफे टेबल लागलेलेच होते. सकाळच्या हेवी जेवणामुळे आम्ही सर्वांनी डिनर लाइटच केले. वरती जाताना सारे स्टेप्स वरून आणि आनंद तेवढा लिफ्ट मधून निघाला. अचानक वकीलसाहेबांमधला खोडकर नानू जागा झाला आणि त्यांनी मधेच वेगात सरसर जीना सर केला. जीना सर करून नानू लिफ्टच्या बरोबर दारावर जाऊन उभा राहिला. जमीनीला भेग पडावी तसा लिफ्टचा दरवाजा दोन्ही बाजूला सरकत जायला आणि नानुने परफेक्ट टायमिंगला मोठ्याने भॉ करायला एकच वेळ झाली. त्या अनपेक्षित भॉ ने पोटात सेकंदभर मोठ्ठाला गोळा येऊन आनंदची पुंगी टाईट केली. तिथून जी भाईंच्या त्या हास्यरात्रीला सुरुवात झाली ती मध्यरात्री अडीचला भाईंच्या झोपेनेच थांबली! ?

रुम्समध्ये पोहचताच अंगावरची काही वस्त्रे कमी करून आम्ही हलके झालो. दोनशे सात ला कुलूप लावून दोनशे सहा मध्ये गोळा झालो. सकाळ पासून ज्या गोष्टीची ओढ लागली होती ती आता होणार होती. फार विशेष असे काही नाही तर फक्त बदाम सात साठी पुन्हा पाने फिसली जाणार होती. मोठा असूनही सहा जणांच्या गोलासाठी तोकड्या असलेल्या बेडवर कसेतरी आम्ही सहा जण सेट झालो. भिंतीला टेकून वकिलसाहेब बसले, त्यांच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात दादा तर उजव्या बाजूला कोच उर्फ इंडिया उर्फ सहसचिव म्हणजेच अमितजी स्कोर चा कागद घेऊन सेट झाले. वकील साहेबांच्या बरोब्बर समोर बेडच्या बरोबर बॉर्डर वर मी विष्णूसारखा आडवा बसलो, माझ्या डोक्याच्या बाजूला आनंद होता तर पायाच्या बाजूला धीरज! ☺?

डावाला सुरुवात होणार तोच वकिलांना त्यांचा सेल डिस्चार्ज असल्याची आठवण झाली. दोनशे सात मधली सगळी सॉकेट्स ऍलोकेटेड असल्याने वकिलांनी सीएसाहेबांना दोनशे सहा मध्ये सेल चार्जिंगला लावायची विनंती केली. सीएसाहेब उर्फ धिरजशेठ सेल चार्जिंगला लावायला तर घेऊन गेले पण चार्जिंग होत नाही तुझ्या फोनचं पिन आत घालायचं खराब झालय ते बदलावं लागेल म्हणून वकिलांना नवीनच टेन्शन घेऊन आले. सगळ्या भाईंनी सामूहिक रित्या सीएला कव्हर काढून चार्जिंग ची पिन लावायची कल्पना सुचवली. सर्वांवर हसून हसून लोळायची वेळ आली जेव्हा वकिलांनी कव्हर ला चड्डीची उपमा देऊन "अरे धीऱ्या तू मोबाईलची चड्डी न काढताच पिन घालतोय आणि जात नाही म्हणतोय" सारखी सहज सुंदर कोटी केली. ??? खेळाला सुरुवात झाल्यानंतर वेळ मिळेल तसा आनंद, दादा अन अमितने तीन तीन दा त्याच वाक्याचे पारायण करून आगीत तेल ओतले. पण त्या आगीतून ज्वाला नाही तर हास्याचेच चिळकांडे उडत गेले.

असच हसता हसता मधेच बेडच्या कडेला झोपलेलो मी तसाच बेडवरून खाली पडलो. झालं आधीच कसेतरी हे हसू थांबावं यासाठी जणू प्रे करणाऱ्या आम्हा भाईंना हसायला मी अजून एक कारण देऊन गेलो. ? पुन्हा हसून हसून सारे डोळे पुसत खेळ पुढे सरकवत राहिले. आदल्या दिवशी दुपारी फुल फॉर्म मध्ये असलेले धीरज चे पत्ते फिरले होते तर इकडे नवीन दादा खेळात चांगलाच अनुभव दाखवत होते. गेमाड अनद्यावर मात्र सगळेच अविश्वासाची नजर ठेवून होते. हसायला पुन्हा कारण मिळालं जेव्हा आदल्या दिवशी प्रमाणेच लकी सेव्हन च्या प्रयत्नात कोच ने दाबून ठेवलेली सत्ती त्याच्या चोचीतच राहिली कारण पुन्हा मी त्याच्या आधी पाने संपवून बाजी मारली. झाले, कोच साहेबांचा पडलेला चेहरा पाहून, त्यामागून पुन्हा मोबाईलच्या चड्डी अन माझ्या पडण्याची आठवण होऊन पुन्हा एकदा हास्यकल्लोळ झाला. ?

मध्ये थोडा ब्रेक घेऊन आम्ही हॉल मध्ये सुरु असलेले भजन ऐकायला गेलो. तुने मुझे बुलाया शेरावालीये सारख्या गाण्यावर थोडं थिरकूनही आलो. पुन्हा नव्या दमाने खेळाला सुरुवात झाली पण आता हसण्यासाठी कारणेच इतकी होती की जरा कुठे काय झालं की हसू आवरत नव्हतं. असं करत करत रात्रीचे दीड वगैरे वाजले. त्या टायमिंग ला वकिलांना त्यांचे नुसते पत्ते पाहूनच हसू यायला लागले. गेमच्या पहिल्याच डावात साठ पॉईंट ला वकील सापडला, आता रिकव्हरी अशक्य आहे या सत्याने वकिलांनी लहानपणीचा चिडका नानू जागवला. बास बास म्हणून नानुने सगळे पत्ये गोळा केले आणि साऱ्यांचे जे एकच हसणे सुरु झाले कि बास! कोणी हसत हसत अक्षरशः लोळत होते, कोणी एकमेकांवर पडत होते, धिर्याला लहानपणीचा नान्या आठवत होता, आठवून आठवून त्याच्याही हासण्याला पार उरत नव्हता. हसून हसून सगळेच एक श्वास झाले, आता हसता हसता एखादा श्वास न घेता जागेवरच जातोय का असेच जणू वाटायला लागले. हसण्याचा आलेला तो एक प्रकारचा ऑर्ग्याजमच होता. आमच्यातला प्रत्येक जण हसून हसून अक्षरशः रडला होता. प्रत्येकाला माहित होतं की आयुष्यातील एक परमोच्च आनंद तो त्याक्षणी अनुभवत होता. त्या परमसुखातच हरएक जण झोपी गेला, राजस्थान भूमीवरच्या दुसऱ्या मुक्कामाचा इती झाला, , राजस्थान भूमीवरच्या दुसऱ्या मुक्कामाचा इती झाला! ☺

To be continued....

- D For Darshan

( Dont miss to watch and hear video version of the same below, preferably on speakers or headsets! )

[

काव्यातील पात्रांची ( कार्यकारणी मध्ये ज्यांना भाई असे संबोधले जाते ) ओळख :

Amit Kasat - सतरंगी लेडीज शॉपी पोवई नाका, महाराष्ट्र राज्य बॉडीबिल्डिंग पंच, महाराष्ट्र प्रदेश सहसचिव
( इंडिया, द कोच )

Dhiraj Kasat - CA धीरज कासट असोसिएट्स ( धीरज, धीऱ्या, सीए साहेब )

Gokul Sarda - Advocate Satara Court, अखिल भारतीय सल्लागार समिती ( वकील, नानू, गोकुळ )

Anand Karva - Computer World Satara, सातारा जिल्हा समाज अध्यक्ष ( आनंद, अध्यक्ष, आनद्या )

Pankaj Lahoti - Pankaj Crations ( दादा )

Darshan Lahoti - iDealocean Technologies ( दर्शन, दर्शा )

]

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...