Close

स्वराज्य रक्षक संभाजी

स्वराज्य शब्दातल्या 'स्व' अक्षर लागायच्या शक्यतेचंच कारण असलेल्या राजा शिवछत्रपतींना गतप्राण होऊन एक मास लोटत नाही तोवर त्यांचे जेष्ठ पुत्र, स्वराज्याचे युवराज, स्वयं शंभुराजेंना त्यांच्याच दरबारातल्या अष्टप्रधान मंडळातील सुरनीस अण्णाजी दत्तोसारखे कारभारी आपल्या कपटनीतीने रायगडाच्या आदेशाच्या नावाखाली अन स्वराज्याच्या सरनौबतांच्या गनिमी काव्याला अनुमोदन समजून आंधळ्या फाजील विश्वासाने जेरबंद करायला येतात आणि कपटीपणाचा कळस वाटावा अशा या स्वयंविणीत जाळ्यात स्वतःच बंदी होतात!

स्वराज्याच्या राजमातेचे सक्खे बंधू, 
स्वराज्याच्या गादीवर बसण्यासाठी मंचकारोहण झालेल्या राजाराम राजांचे सक्खे मामा, 
प्रतापराव गुजरांनंतर स्वराज्याच्या सरसेनापती पदाची धुरा सांभाळणारे सातारा जिल्ह्यातील तळबीड च्या मोहितेंचे हंबीरराव,
कोणत्याही रक्ताच्या नात्यागोत्यांची तमा न बाळगता फक्त स्वराज्याचा सरनौबत या कर्तृत्वाच्या एकाच नात्याचा मान अन ध्यान ठेऊन जेव्हा शंभूराजेंच्या बाजूने खंबीरपणे उभे राहतात,
तेव्हा या महाराजांच्या सानीवर धार लावून तयार झालेल्या आपल्या हंबीरमामांचा खंबीर स्वाभिमान अन स्वराज्याप्रती निष्ठा पाहून पाहणाऱ्यांचे डोळे पाणावतात!

आजमितीला अवघ्या महाराष्ट्रातील अबालवृद्ध रसिक ज्या सिरीयलच्या पुढच्या एपिसोड ची हररोज उत्कंठतेने वाट पहात असावा ती सिरीयल म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे सरांची झी मराठी वरती सुरु असलेली स्वराज्य रक्षक संभाजी आणि लोकांच्या काळजात निरंतर घर करून राहील, 
लहानपणापासून कानांवर पडलेल्या कंसमामा, शकुणीमामा या मामाच्या नात्याला कलंक असलेल्या मामालोकांच्या पलीकडे जाऊन हंबीरमामा साठी आठवला जाईल, 
असा परवा सादर झालेला या सिरीयल चा स्वराज्याचे जणू भवितव्य ठरलेल्या पन्हाळ्यावर घडलेल्या ऐतिहासिक घटनेवर आधारित असलेला हा हृदयस्पर्शी एपिसोड!

खासकरून आपल्या दाट मिशांच्या आड लपलेल्या मुखातून "तुला काय ढेकळं कळलं?" असं विचारणारे सरनोबत हंबीरराव,
आपल्या फडफडणाऱ्या नाकाचा सापाच्या फण्यासारखा आकार करत "हंबीरराव फाजीलपणा करू नका" म्हणत संताप व्यक्त करणारे सुरणीस अण्णाजी, 
घारेसारख्या रोखून पाहणाऱ्या नजरेने गोल गोल फिरत डझनभर जातींची लागोपाठ नावे घेत अठरा पगड जातींच्या रयतेचे स्वराज्य चिंतीणारे शंभूराजे, 

या साऱ्यांसाठी लिहिलेले दमदार संवाद लेखन, आपल्या निष्णात अभिनय आणि संवादफेकीने पात्रांनी त्या लेखनाला दिलेला न्याय, सारंच काही भन्नाट जुळून आलं आणि जवळपास संपूर्ण इतिहास माहित असूनही उत्कंठा शिगेला पोहचवणारं, पुनःपुन्हा पाहू वाटावं असं एक उत्कृष्ट सादरीकरण पहायला मिळालं!

साधारण दहा वर्षांपूर्वी मी विश्वास पाटलांचं संभाजी वाचायला घेतलं होतं, शेवट डोळे ओले करूनच ते संपलं होतं. 
पुस्तक वाचायच्या आधी शिवरायांसोबत आग्र्याला गेलेला आणि ऐन तरुणाईत औरंगजेबाकडून निघृण पणे हत्या झालेला शिवाजींचा मोठा मुलगा संभाजी एवढाच काय तो संभाजीराजेंचा इतिहास माहिती होता. 
शिवरायांच्या मागे हा शंभुबाळ त्या काळात स्वतः गड बनून लढला नसता तर त्या जहाल औरंग्याने आपल्या बलाढ्य फौजेच्या मदतीने कदाचित अखंड महाराष्ट्र अजगरासारखा गिळला असता, हा राजकारणांच्या चाली सोडवत आपला मेरू दौडत पुढे नेणाऱ्या संभाजीराजेंच्या कर्तृत्वावर प्रकाशझोत टाकणारा धडा त्या पुस्तकातून मिळाला होता.

तिसरी चौथीच्याच पुस्तकांतून आमचा आदर्श ठरलेला शिवाजी तर आम्हाला तोंडपाठ झाला, 
पण त्याच्या इतकेच महान कार्य असलेला संभाजी मात्र अनोळखीच राहिला, 
या स्वराज्य रक्षक संभाजीच्या टीमने त्याचा परीचय करून देण्याचा विडा उचलला,
अन त्यायोगे थोर शिवाजीचा हा थोर संभाजी जनतेसमोर उलगडला!

अभिनंदन अन धन्यवाद त्या स्वराज्य रक्षक संभाजी टीमला!
लागले पुढचे वेध आता चला घेऊन आम्हाला रायगडाला!! आता चला घेऊन आम्हाला रायगडाला!! 

- D For Darshan

 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...