Close

Satara District Medical Zonal Tournament

सातारा_मेडिकल_असो_आयोजित_झोनल_चषक_उदघाटन
दि महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या

सातारा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आयोजित वेस्टर्न झोन च्या क्रिकेट मॅचेस आजमाननीय अध्यक्ष श्री प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साताऱ्याच्या सैनिक स्कुल ग्राऊंडवर पार पडल्या. सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर अशा इंटर डिस्त्रीक्त सामने खेळून निवडून वर आलेल्या पाच संघांमध्ये हा थरार रंगला ज्या थरारात दिवसअखेर सोलापूरचा संघ विजयी ठरला!

कडक उन्हाने दिवसभरात उत्तरोत्तर तापत जाऊन ठणठणीत होत गेलेल्या खेळपट्टीवर षटकार चौकारांचा नुसता खच पडलेल्या या थरारक दिवसाची सुरुवात विद्यमान आमदार श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत सातारा विरुद्ध सांगली या शेजारी जिल्ह्यांमध्ये झालेल्या सामन्याने झाली.

सांगली_ठरली_साताऱ्याला_भारी

नाणेफेक जिंकून आयोजक संघास फलंदाजीस पाचारण केल्यानंतर थोडीशी ओल असलेल्या खेळपट्टीवर अंदाज घेत घेत सातारा संघाने दहा षटकात दोन कमी शंभर धावांची मजल मारून साठ चेंडूत नव्व्यांनऊ धावांचे आव्हान सांगलीसमोर उभे केले. आपल्या बॉलिंग समोर दहा ओव्हरमध्ये घंटा शंभर चेस होणार हे आमचे म्हणणे किती पोकळ होते हे सांगलीच्या संघाने आठव्या ओव्हर मधेच शंभरी गाठून दाखवून दिले. झोनल मध्ये यश संपादन करायचे सातारा जिल्ह्याचे स्वप्न या पराभवाने पुन्हा एकदा धुळीस मिळाले.

तडाखा_कोल्हापूरच्या_देवेंद्रचा_तरी_विजय_पुण्याचा

पडलेल्या मूड मधेच कोल्हापूर विरुद्ध पुणे या दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोल्हापूर संघाने पाच ओव्हर्स मध्ये एकोणपन्नास धावा अशी सावध सुरुवात केली. पण इंटरव्हल नंतरच्या उर्वरीत पाच ओव्हर्स मध्ये कोल्हापूरकरांची गाडी अशी काही याक्सीलरेट झाली जी दहा षटकात तब्बल एकशे बेचाळीस धावांचा भलामोठा डोंगर उभारून थांबली. म्हणजे या पाच ओव्हर्स मध्ये थोडथोडक्या नाही तर 30 चेंडूंत 93 वगैरे धावा कोल्हापूरकरांच्या तडाखेबंद फलंदाजांनी कुटल्या, म्हणजे ओव्हरला अठरा पेक्षा जास्तीची सरासरी ठेऊन!! कोल्हापूरच्या एकाने दहा ओव्हरमध्ये स्वतःचेच नव्वद धावांचे योगदान दिले होते!

60 चेंडूंत 143 धावांचे आव्हान कोल्हापूर सारख्या कसलेल्या बॉलिंग याटॅक समोर याचिव्ह करणे म्हणजे चेष्टाच वाटत होती. पण पहिलाच चेंडू कव्हर च्या डोक्यावरून मारून ज्या पद्धतीने धनकवडीकर ओपणरने छकडी वसूल केली ती पाहून लागलीच ही चेष्टेची भावना शक्यतेमध्ये बदलून गेली. त्या सिक्स पाठोपाठ ठराविक अंतराने रपारप छक्के चौके बसत गेले आणि हो हो म्हणत पुणे संघाने पंधराच्या सरासरीने चार षटकात त्रेसष्ट धावफलकावर लावले. एकशे त्रेचाळीस रन्स करून कोल्हापूर हारणार ही गोष्ट अजूनही अशक्यच वाटत होती पण पुण्याची फलंदाजी फक्त छक्क्या चौक्यांचीच भाषा करत आपल्या संघाला विजयाच्या समीप नेत होती. शेवटचे षटक आले तेव्हा माफक सहा चेंडूंत सात धावांचे माफक आव्हान पुण्यासमोर राहिले जे शेवटच्या चेंडूवर राहिलेली एक धाव घेऊन पुण्याने पारही केले. तब्बल एकशे त्रेचाळीस धावांचं आव्हान पुण्याने सर केलं होतं, कोल्हापूरच्या फलंदाजाचं नव्वद धावांचं योगदान वाया गेलं होतं, चौदा पंधराची सरासरी ठेऊन धावा बनवुनही कोल्हापूर त्या डिफेन्ड न करता आल्यामुळं स्पर्धेतून बाहेर पडलं होतं, पुणे वेस्टर्न झोन क्रिकेट चषक च्या फायनल मध्ये पोहोचलं होतं!

विश्वजितची_शतकीखेळी_दहाषटकात_180धावांची_दिवाळी

पुढच्या सामन्यात साताऱ्याला हरवून वर आलेल्या सांगलीची गाठ गतवर्षीचे विजेते राहिल्या कारणाने पहिली बाय मिळालेल्या सोलापूर संघाशी पडली. रवी पवार - विश्वजित पवार या साडू साडुंची भयंकर जोडी नेहमीप्रमाणे याही वर्षी आकर्षण ठरली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या सोलापूर संघाने आठ ओव्हर्स मध्ये एकशे एकवीस रन्स बनवल्या ज्या एकशे एकवीस मध्ये विश्वजित ने स्वतःच्या एकशे एक धावा केल्या. दहा ओव्हरच्या मॅच मध्ये एक खेळाडू सेंच्युरी वगैरे मारतोय ही गोष्टच अजब वाटत होती पण त्या गोष्टीची अजबता तिथेच थांबली नव्हती. सोलापुरच्या डावातील अजून बारा चेंडू बाकी होते आणि समशेर फिरवावी अशी हातातील बॅट फिरवणारे शतकवीर विश्वजित पवार साहेब स्ट्राईक वर होते. थ्री सिक्सटी डिग्री ग्राऊंड वर अशी एकही डिग्री उरली नव्हती ज्या दिशेने विश्वजित ने बॉलची भिंगरी केली नव्हती! नववी ओव्हर सुरु झाली आणि कोल्हापूर ला बॉलरची हाल्फ चेंज ओव्हर करावी लागली कारण अर्थातच विश्वजित ने पहिल्या तिन्हीच्या तिन्ही चेंडूंवर मोठाल्या गोळया करून सिक्सर्सची हॅटट्रिक केली. नवव्या ओव्हरमध्ये अठ्ठावीस धावांची भर पडून सोलापूरची धावसंख्या एक कमी दिडशेवर पोहचली. सोलापूरच्या डावातले शेवटचे षटक तर ऐतिहासिकच ठरले ज्या मध्ये एक, दोन, तीन, चार नाही तर तब्बल पाच सिक्स विश्वजित ने मारले. हे पाचही सिक्स नियमाने षटकार पण अंतराने मात्र दशकारच होते, दहाव्या ओव्हर मध्ये पस्तीस धावांची भर टाकून त्या साठ चेंडूंमध्ये विश्वजित च्या स्वतःच्या कैक षटकारांच्या मदतीने उभारलेल्या एकशे सत्तेचाळीस धावांच्या खेळीने सोलापूरने एकशे त्र्यांयंशी धावा झोडून उपस्थितांच्या डोळ्यांचे अक्षरशः पारणेच फेडले. ओव्हरला अठरा-एकोणीस च्या धावगतीने गरजेचा असलेला हा धावांचा पाठलाग करायचा नादच सांगलीने नाही केला अन सोलापूरचा संघ शंभर एक धावांच्या तुंबळ फरकाने जिंकून दिमाखात फायनलसाठी पात्र ठरला. ज्या दहा षटकांच्या टेनिस क्रिकेट सामन्यात शंभर धावा म्हणजे एक आव्हानात्मक धावसंख्या समजली जाते तिथे विजयातच शंभर धावांचा फरक असणे ही गोष्टच त्या विजयाचा मोठेपणा समजून यायला बस होती!

पुणे-सोलापूर फायनल सुरु होणार इतक्यात काहीतरी विचित्रच नाटक घडले आणि काही नियमावलींचा भंग केल्याप्रकरणी आयोजकांनी सर्वानुमते काही कारणास्तव पुणे संघाला बाद घोषित केले. अर्थातच याचा फायदा कोल्हापूर संघाला झाला आणि पुण्याच्या ऐवजी कोल्हापूर संघ सोलापूर चा फायनल चा प्रतिस्पर्धी म्हणून मैदानात उतरला.

कहर_पूरकरांचा_आला_पूर_धावांचा_थरार_सुपरओव्हरचा

सोलापूर-कोल्हापूर या तुल्यबळ संघामधील सामन्याने वेस्टर्न झोन चा विजेता संघ फायनल करणाऱ्या फायनल लढतीस सुरुवात झाली, झोनल चषकवर आपले नाव कोण कोरणार या प्रश्नाने उपस्थितांची उत्कंठा वाढवली!
प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोल्हापूरने आपल्या आक्रमक अंदाजात दिमाखात सुरुवात केली, आम्हीही तोडीस तोड तुडवातुडवी करू शकतो या अंदाजातच षटकार चौकारांची बरसात केली!
देवेंद्रने करून दिलेल्या चांगल्या सुरुवातीला रवीने आपल्या बहारदार फलंदाजीने योग्य न्याय दिला, संघनायक बंडा कदम यांनी शेवटपर्यंत किल्ला लढवत संघाचा मेरू दीडशे पर्यंत नेला!
आदल्या सामन्यात एकशे ऐंशी पार मजल मारणाऱ्या सोलापूर संघास अर्थातच हे आव्हान पार करणे अशक्य नव्हते, मात्र फायनल मध्ये चेस करण्याच्या दबावाखाली पंधराच्या सरासरीने धावा करणे तितके सोप्पेही नव्हते!
आदल्या सामन्यात शतकी खेळी केल्यामुळे विश्वजीत दमला वगैरे असेल असली काही भानगडच त्याच्या ठायी नव्हती,
रवीच्या साथीने त्याने केलेली पाठलागाची सुरुवात त्याच्या नजरेला चेंडू फुटबॉल दिसत असल्याचीच साक्ष होती!
कोणीही चांगला बॉलर समोर आला तरी त्याची खैर होत नव्हती, प्रत्येक ओव्हरला षटकार-चौकाराच्या वसुलीने तेरा-पंधरा धावांची जुळवणी संतत गतीने चालू होती!
विश्वजीतच्या उपस्थितीत एखाद दुसऱ्या विकेटच्या पडझडीने 2 ओव्हर 26, 3 ओव्हर 43, 4 ओव्हर 54, 5 ओव्हर 68 असे टप्पे गाठत सोलापूरचा संघ पुढे सरकत होता,
सत्तावीस चेंडूंत पंच्याहत्तर धावांची गरज असताना सलग तीन सिक्स मारून सोलापूरने 24 चेंडूंत 57 पर्यंत फरक कमी केला होता!
पुढची ओव्हर कोल्हापूरला टाईट ठेवायला यश आलं, आठ धावा कमी होऊन 18 चेंडूंत 49 धावांचं आव्हान राहिलं!
पुढच्या षटकात कोल्हापूरचा पुन्हा घात झाला, विश्वजितने सोळा धावा वसूल करून फरक 12 बॉल मध्ये 33 पर्यंत आणला!
नवव्या ओव्हर मध्ये 14 धावा निघाल्या आणि विजयासाठी एक ओव्हर मध्ये एकोणीस धावा राहिल्या!
सोलापूरसाठी जमेची बाजू ही होती की त्यांची विश्वजित नामक धगधगती तोफ स्ट्राईक वर राहिली,
पहिल्याच चेंडूवर तुटून पडून त्या तोफेनेही सहा धावांची सलामी दिली!
पहिल्याच चेंडूवर षटकार बसल्याने बॉलर कमालीचा दबावात आला, पुढच्या चेंडूवर विश्वजित ने कव्हर मधून अजून एक उत्तुंग षटकार खेचला!
या षटकारासोबतच विश्वजीतचे एकाच दिवसातले दुसरे शतक पूर्ण झाले होते, एकाच दिवसात दोन भन्नाट शतकी खेळ्या डोळ्यांदेखत पाहिला मिळाल्याने आम्हालाच आमचे नशीब मोठे वाटले होते!
सोलापूरच्या विजयाची औपचारिकताच आता उरली आहे असे वाटत असतानाच सामन्याने नाट्यमय वळण घेतले,
एक दोन बॉल वाया गेल्याने एक बॉल मध्ये दोन धावा असे इक्वेशन होऊन बसले!
दोन धावांची गरज असल्याने विश्वजित चेंडू जोरातच टोलवणार असा आमचा विश्वास विश्वजित ने फोल ठरवला,
जेव्हा शेवटचा चेंडू त्याने पॉईंटला ढकलून तो एक रन घेण्यासाठी धावला!
त्या एक धावेने सामना नाट्यमयरित्या टाय झाला, अन निकाला साठी तो सुपरओव्हर मध्ये गेला!
सहा चेंडू फेस करायला सायंकाळच्या अंधुक होत निघालेल्या प्रकाशात पुन्हा रवी विश्वजित ची जोडी फलंदाजीस आली,
विश्वजितला दुसऱ्या चेंडूवरच त्रिफळाचीत केल्याने कोल्हापूरकरात नई जान आली!
पण त्यांच्या सुखावर लागलीच पांघरून घालण्याचे काम मुलानीने केले, मिड ऑन ला एक उत्तुंग षटकार खेचून त्याने सोलापूरला सेफ केले!
शेवटच्या चेंडूवर रवीनेही अजून एक षटकार खेचला, अन सोळा धावांचे आव्हान घेऊन कोल्हापूर संघ फलंदाजीस उतरला!
डावखुऱ्या रवीने तिखट मारा करून कोल्हापूरकरांना काही फार हलू नाही दिले, सुपर ओव्हर मध्ये अकरा धावांच्या फरकाने सोलापूर कोल्हापूर वर सरस ठरले!
धावांचा अक्षरशः पूर आलेल्या या सोलापूर-कोल्हापूर मधल्या कमालीच्या उत्कंठावर्धक सामन्यात सोलापूरने बाजी मारली, दोन शतकी खेळी केलेल्या मालिकावीर विश्वजीतने उपस्थितांची मने जिंकली!!

विश्वजित, तुझी बॅट अठ्ठावीस तारखेला पुण्यामध्ये होणाऱ्या इंटर झोनल्स टुर्नामेंट मधेही अशीच तळपू देत, अन त्यायोगे वेस्टर्न झोन चा झेंडा अवघ्या महाराष्ट्रात लहरु देत!!

Congratulations Team Solapur!! All the very best guys for inter zonals!!

जय क्रिकेट! जय केमिस्ट!!

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...