Close
In Travel

Tour A Rajasthan

दोन लाहोटी दोन कासट एक सारडा एक करवा,
स्वातंत्र्यदिनी सात वाजता साताऱ्याहून निघाले,

सर्वांचे देवदर्शनाचे योग आले,
सालासार मध्ये कार्यकारणी बैठक हे फक्त निमित्त झाले!

सातारा दादर प्रवास टवेराने सुरु झाला,
प्रवासाचा आरंभ अशिषसोबत जोशींचा चहा घेऊन झाला,
दौऱ्याचा पहिला सेल्फी तेव्हा निघाला,
जेव्हा भाईंनी दत्तला दौऱ्यातील पहिला नाष्टा केला!


नाष्टा करताना चुकून धीरजने चटनी सांडली,
म्हणून शेजारच्या लेडीजनी तोंडे वाकडी केली,
ते पाहून आमच्या वकिलसाहेबांची सटकली,
यांच्या बापाची चटनी थोडीच होती अशी टिपनी वकिलांनी दिली!

सकाळी सकाळी मस्त पोटाला आधार मिळाला,
मग काय गाडीत चर्चांना फुल ऊत आला,
गोकुळने सोदाहरणाने दिले पालकत्वाचे धडे,
धीरजने गायले मातृभाषेतून शिक्षणाच्या महत्वाचे पाढे!

आनंदने गार्डन सिटीच्या प्लॉट्स ची रंजक कथा सांगितली,
जेव्हा दादांनी माताजींच्या एकत्र दर्शनाची आठवण करून दिली,
हे सर्व ऐकतानाच दर्शनने त्याची स्वातंत्र्यदिनाची एफ बी पोस्ट केली,
ती पोस्ट लागलीच सर्वांनी लाईक करून शेअर ही केली!

खरी मजा तेव्हा आली जेव्हा अमितने बॉडीबिल्डिंग पंचगिरीचा अनुभव सांगितला,
गोकुळने मलाही ती बॉडीवर यायला मागे लागली होती म्हणून दुजोरा दिला,
बॉडीवर जाण्यासारखी मजा नाही असं दादा कोंडके स्टाईल कोणीतरी बोलला,
अमित ऑलरेडी बॉडीवर असण्याच्या कल्पनेने एकच हशा पिकला!

बघता बघता हसत हसत कळलेच नाही कधी दादर आले,
गुहेतून वाघ बाहेर यावे तसे टपाटप सगळे गाडीतून उतरले,
पटापट आपापल्या बॅग्ज चा ताबा घेऊन टवेरा साताऱ्याला सोडली,
राजस्थान दौऱ्याची पहिली फेरी अशा रीतीने संपन्न झाली!

बारा नंबर वरती बिकानेर येते या माहितीचे धीरजने प्रदर्शन केले,
तरी फक्त प्लॅटफॉर्म कन्फर्म करून जेवायला जाऊ या मतावर सगळे एक झाले,
माहितगार धीरजने एका पोलिसाशी संभाषण छेडले,
आठ पर्यंतच प्लॅटफॉर्म आहेत म्हणून त्याने सीए चे ज्ञान ढाब्यावर बसवले!

अरे धीरज कुठल्या धर्तीवर बाराचा नारा लावत होतास असे दर्शनने विचारले,
असाच कुठला तरी आठवला आणि मी रेटून सांगितला असे शेठ उत्तरले,
अरे धीऱ्या तुझ्या पेक्षा अनद्या परवडला असे वकील डोक्याला हात लावून म्हणाले,
CST स्टेशन चा नंबर दादर ला सांगणाऱ्या सीए साठी सगळे खळखळून हसले!

चला लवकर म्हणून दादा सगळ्यांना जेवायला घेऊन गेले,
समोरच एका पॉश रेस्टोरन्ट मध्ये सगळे एकत्र घुसले,
काहींनी टेबल काबीज केला तर काहींनी वॉशरूम चा रस्ता धरला,
लाईट खायचे का दणकून खायचे हा प्रश्न सगळ्यांना पडला!

जेवण उरकून कुणी फुलचंद कुणी मसाला खाऊन सगळे प्लॅटफॉर्म वर आले,
दोन राज्यांना जोडणाऱ्या लांबलचक अजगरासारख्या बिकानेरने आमचे स्वागत केले,
तिकीट काढणाऱ्या अध्यक्षाच्या मागे ओळीने सगळे B9 मध्ये घुसले,
नेहमीप्रमाणे अध्यक्षांनी चुकीचे तिकीट रेफर करून चुकीच्या जागी बसवले!

वकीलसाहेबांनी एक टपली आनंदच्या डोक्यात मारली,
तो कॅन्सल केलेले तिकीट पहातोय याची त्याला जाण करून दिली,
B5 ऐवजी B9 मधे घुसलेली मंडळी पुन्हा B9 मधुन B5 मधे गेली,
एक सीट ऍडजस्ट करून शेवटी एका बोगीत सर्व मंडळी सेट झाली!

कपडे बदलून थ्री फॉर्थ्स वगैरे घालून सगळे फ्रेश झाले,
थोड्या पाणचट चर्चेनंतर बदाम सात चा व्हेज खेळ खेळायचे ठरले,
सहा डावात जास्त पॉईंट्स घेणारा पहिले जे येईल ते स्वखर्चातून खायला घेईल,
डावात हरल्याचे दुःख भोगले तरी इतरांचे पोट भरण्याचे पुण्य कमविल!

 

पहाता पहाता डावाला रंग यायला सुरुवात झाली,
पहिलीच लढत जबरदस्त चुरशीची झाली,
अवघ्या एका पॉइंटने स्कोर लिहीणार्या खुद्द अमित दी कोच ची भागली,
लागलीच डब्यात आलेल्या क्वालिटी भेळ आणि सलाड ची ट्रीट त्याने भाईंना दिली!

 

मधेच एकावेळी दोन पाने टाकणे वा पान असताना पास बोलणे,
असे अनद्याचे नेहमीप्रमाणे फाजील चाळे चालूच होते,
खूप वर्षांनी फडात उतरलेल्या दादांचे अतीलक्षपूर्वक खेळणे,
धिरजचे सुटल्यानंतर विजयोत्सव करून डबा डोक्यावर घेणे डावाची रंगत वाढवत होते!

दादांची पाने पाहून आपली पाने सोडणे असले वकिली डाव वकील खेळत होते,
लकी सेव्हन च्या प्रयत्नात कायम सत्या दाबून ठेवत होते,
खरी मजा तेव्हा जेव्हा इंडिया ने लकी सेव्हन साठी किलवर सत्ती दाबली,
अन किलवरला कटपी असलेल्या दर्शनने त्याच्या आधीच पेज शुअर करून बाजी मारली!

नाही नाही म्हणता बदाम सातचे पन्नास एक डाव झाले,
खेळण्याच्या भरात कळलेही नाही कधी अहमदाबाद आले,
धिरजच्या पाहुण्यांनी मस्त पॅकड टिफिन्स आमच्या साठी आणले,
चला एका डिनर चे पैसे वाचवले म्हणून साऱ्यांनी धिरजचे आभार मानले!

आभारप्रदर्शन झाल्यानंतर थोड्याच वेळात धीरजने चुळबुळ चालू केली,
चारपाच तासाच्या बदाम सात नंतर त्याला बहुतेक त्याच्या सेल ची आठवण झाली,
आनंद आणि दर्शन त्यांच्या कॉल्स मध्ये व्यस्त होते,
तर उरलेले प्लॅटफॉर्म वर उतरून हिरवळीचा आनंद घेत होते!

तेवढ्यात धीरजशेठ सरळ बॅग घेऊन ट्रेन मधून उतरायला निघाले,
आनंद आणि दर्शन फुल चक्रावून त्याच्या मागे धावत गेले,
एवढ्याशा वेळेत हा एवढा का सटकला या विचाराने दोघे वेडे झाले,
उद्या फोनकॉल्स रिसिव्ह नाही केले तर माझी सीए ची डिग्री कामाला लागेल असे सिए साहेब उत्तरले!

कसातरी त्याचा तापलेला मेंदू थंड करून त्याला पहिले डब्यामध्ये आणले,
वकिलांनी नेहमीप्रमाणे फोन लपवलाय असे बळेच सांगून त्याला शांत केले,
अमितने वकिलांनी धिराजच्या खिशातून काढलेला सेल हसत हसत धीरजला दिला,
तेव्हा कुठे बीपी पुन्हा एकशे वीस ऐंशी झालेल्या धीरज ला पाहून साऱ्यांचा जीव भांड्यात पडला!

हळूहळू डब्यामध्ये जेवणाचा घमघमाट सुटू लागला,
त्याची जाणीव होऊन आम्हीही आमच्या डिनरचा नारळ फोडला,
धिरजच्या पाहुण्यांनी आपले काम चोख बजावले,
चवीने चाटून पुसून खाऊन सारे तृप्त झाले!

मुबलक क्वांटिटी मुळे एक डबा एक्सट्रा झाला,
'एक्सट्रा है खाना, खाना पसंद करोगे भाई' म्हणून साईड अप्पर वाल्याला प्रश्न केला,
तो ही बिनधास्त हो म्हणून भाईं सोबत जेवायला आला,
'मै ये है मोहब्बते सिरीयल का यासीस्टंट डायरेकटर हूँ' असा स्वसंदर्भ त्याने दिला!

इंडस्ट्री मधला माणूस आपल्या सोबत असलेला पाहून अपेक्षेप्रमाणे दर्शन चेकाळला,
मग त्याने एका मागे एक प्रश्न विचारून त्याचा छोटा इंटरव्हीवच घेतला,
निल नीतीन मुकेश सारखा दिसणारा भुपी दर्शनला इंस्टा एफबी ला कनेक्ट ही झाला,
अल्पावधीत तो जोधपूरचा हिरोभाईंमध्ये मिसळूनही गेला!

सेम डब्यातून प्रवास करणारे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष राहुल बाहेती चर्चेला आले,
सहसचिव श्री अमितजींना त्यांनी उपदेशाचे चार धडेही दिले,
भावी प्रदेशमंत्री श्री धिरजजी त्यांना खूप खूप चावले,
पण अर्ध्या पाऊण तासाचे सर्वांचे एक ओव्हरऑल चांगले इंटरयाक्शन झाले!

झोपण्यापूर्वी पुन्हा पत्ते फिसले गेले,
पुन्हा सत्यांवर पत्ते पडत गेले,
बदाम सातच्या डावात पुन्हा रंग भरू लागले,
पण आता 'प्लिज झोपा आणि आम्हालाही झोपू द्या' म्हणून डब्यातील सहप्रवाशांचे आदेश आले!

खेळ बंद करून भाईंनी आपले बिछाने सेट केले,
भाईंच्या सीट्स चे पांढऱ्याशुभ्र बेड्स मध्ये रूपांतर झाले,
आपापल्या निवडलेल्या सीट्स वर सर्वजण जाऊन पडले,
डब्यात आलेले क्वालिटी अमूल दूध पिऊन एकदाचे झोपी गेले!

सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा ते धावत्या ट्रेन मधे राजस्थानच्या भूमीवर आले,
लवकरच जोधपूरला पोहचण्याचे वेध साऱ्यांना लागले,
आवरून बसून कोण किती घोरला याचा अभ्यास सूरु झाला,
इंडिया रात्री अडीच पर्यंत मोबाईल मधे काय करत होता हा प्रश्न साऱ्यांना पडला!

जोधपूर स्टेशनवर दाखल होता बिकानेर हळू हळू संथ होऊ लागली,
आपापले लगेज घेऊन मंडळी दाराजवळ आली,
ट्रेन स्टेशनवर थांबताच भाईंनी प्लॅटफॉर्म वर टपाटप उड्या मारल्या,
राजस्थानच्या भूमीवर पाय ठेवल्याच्या भावना मनी दाटून आल्या!

उतरल्याबरोबरच सेल्फी काढा सेल्फी काढा चा दंगा उसळून गेला,
दर्शाने आपल्या लांब हाताने सेल्फी साठी सेल सेट केला,
भाईंबरोबर प्रदेश उपाध्यक्षांनीही तो जॉईन केला,
अशा रीतीने राजस्थानच्या भूमीवरचा पहिलावहिला फोटो निघाला!धिरजच्या चोख नियोजनानुसार अनुपसिंघजी इनोव्हा घेऊन स्वागतास आले,
अजून खचाखच तीन चार सेल्फी काढून भाई इनोव्हात बसले,


पहिल्यांदा एकदम कडक जोधपूर स्पेशल चहा पाजा अशी सिंघ ना विनंती केली,
क्षणात भन्नाट राजस्थानी सेटप असलेल्या टपरीवर जाऊन इनोव्हा थांबली!
 झाडाखालची लाकडी बैठक, रचलेले मोठ्ठाले माठ अन उंच निमुळते ग्लास,
एकूण टपरीचे सौंदर्य वाटत होते एकदम झकास,
चहाच्या घमघमाटाचा अस्सा दरवळत होता सुवास,
वाह! गरमागरम घोट जिभेला भाजत पोटात टाकून भाईंनी विझवली चहाची आस!


चहा ढोसून काहीच क्षणात इनोव्हा भाईंना भवन वर घेऊन गेली,
पटकन बिल फाडून भाईंनी तास दोन तासासाठी एक कॉमन रूम बूक केली,
कोणी ब्रश कोणी दाढी करून आवरायला सुरुवात केली,
धीऱ्याने बारा सूर्यनमस्कार घालून आपली व्यायामाची वेळ पाळली!


बाथरूमच्या दरवाजाला कडी नाही हे दादांच्या लक्षात आले,
बाहेर दाढी करणाऱ्या नानूच्या भरवशावर दादा अंघोळीला गेले,
दादा वकीलांवर विश्वास ठेवताहेत या कल्पनेनेच दर्शनने आश्चर्य व्यक्त केले,
तोच मागून परिस्थितीशी अनभिज्ञ धीरजने येऊन खाडकन दार उघडले!

हाहा वकील आणि दर्शनने हास्याचा एकच कल्लोळ केला,
नशीब देवदर्शन देता देता लाजेने चुरचुर दादा अगदी थोडक्यात वाचला,
अरे साधी कडी लावायचे कळत नाही का म्हणून धीरज ओरडला,
दाराला कडीच नाही अन वकील राखण करताहेत या कल्पनेने मग धीऱ्याही खळखळून हसला!

टकाटक सजून सेंट बिन्ट मारून सगळे बैल पुढील प्रवासासाठी तयार झाले,
फ्रेश आहे तोपर्यंत एक फोटो काढू म्हणून दादा बाल्कनीत गेले,
मुंगळ्यासारखे एका मागो माग एक दादांभोवती सारे गोळा झाले,
सोलो राहिला लांब ग्रुप सेल्फी मधेही पुढाकार घेतलेले दादा दिसेनासे झाले!भवन मधून एक्झिट घेताना आनंदला त्याचे जोधपुरमधले पाहुणे भेटले,
महाराष्ट्र प्रदेशच्या कार्यकारणी बैठकीला आलो असल्याचे आनंदने सांगितले,
'मै सातारा का प्रेसिडेंट हूँ' असे अध्यक्षांनी चेस्ट फुगवून स्वतःला वर्णिले,
बाकी सब कोण है असे विचारल्यावर शब्द आठवून इतरांना त्याने पदाधिकारी म्हणून संबोधले!

खुललेला आनंद आणि संभाषण ऐकून हसू दाबणारा दर्शन गाडीकडे निघाले,
कुठे अडकला या वकिलांच्या प्रश्नावर दर्शन बोलला आनंदचे पाहुणे भेटले,
मग काय पाचीजन अंद्यावर नाष्ट्याचे हॉटेल येईपर्यंत चढचढ चढले,
कारण फोडणी म्हणून दर्शनने, आनंदने स्वतः प्रेसिडेंट आणि आपण होता खालचे म्हणून ओळख करून दिल्याचे सांगितले!राजस्थानी धाटणीचे क्वालिटी पराठे ऊइथ रायथा भाईंनी नाष्ट्याला खाल्ले,
पोटाला आधार देऊन सारे इनोव्हातून नेव्हिगेशन लावून केरुकडे निघाले,
रस्त्यातील दोन्ही बाजूच्या खाणींविषयी माहितगार दादांनी मार्गदर्शन दिले,
एका मोठ्या खाणीच्या जवळ गाडी थांबवून भाईंनी मॉडेलशुट ही केले!

थोड्याच वेळात रस्ते चुकत शोधत इनोव्हा केरु मध्ये आली,
सहजा सहजी दर्शन देईल ती कुलदेवीनीच कसली,
चौंडा माताच्या पायथ्याशी आल्यावर भाईंचा आनंद गगनाला भीडला,
सहा जणांचा समुदाय गाडीतून उतरून मातेच्या दर्शनाला दौडला!

लाहोटी कुळाची कुलदेवी असल्याने खासकरून दादा आणि दर्शनला ती आपली वाटली,
बाराशे किमी वर येऊन तिचे दर्शन घेताना तिला कुठे ठेऊ अन कुठे नाही अशी दोघांची अवस्था झाली,
अगदी मनापासून या आईचे साऱ्यांनी दर्शन घेतले,
मंदिरातून व्हिडिओ कॉल करून मातेचे दर्शन घरच्यांनाही दिले!


अतिशय जड पावले पण तृप्त मनांनी दोघे लाहोटी गाडीत बसले,
जणू आपल्या घरच्याच कोणाला तरी तिथे मागे सोडून निघालो आहोत असे दोघांना भासले,
अनुपसिंघजी सहा जणांना तिवरीमार्गे ओशियाकडे घेऊन निघाले,
लाहोटिंनंतर, करवा, सारडा अन कासटाना आपल्या कुलदेवीला भेटण्याचे वेध लागले!

या तासा दीडतासाच्या प्रवासात भाईंनी कच्या रस्त्यांचा अनुभव घेतला,
राजस्थानच्या रखरखीत उन्हात बाहेर दिसणाऱ्या तुरळक लोकांनी भाईंचा वेध घेतला,
ते सर्व दृश्य पाहून का कोणास ठाऊक दर्शनला सरफरोशचा मिर्चीशेठ आठवला,
'चंद पैसों की लालचमे अपने देश को बेचने चला था हरामजादा' असे तो मधेच ओरडला!

पहाता पहाता इनोव्हा ओशियाच्या दारात उभी राहिली,
चलो ओशिया आयो च्या अनुपसिंगच्या हाकेने भाईंची झोप मोडली,
चौंडाच्या तुलनेत ओशियाला खूपच गर्दी दिसली,
गर्दीमधे विखुरलेल्या भाईंनी देवीकडे आपापली वाट धरली!

गर्दी असूनही अतिशय छान दर्शन झाले,
मातेचे ते रूप भाईंनी डोळ्यात भरून घेतले,
आवारात बसून थोडा वेळ ध्यान मग झाले,
सेल्फी काढून दर्शनाचे ते क्षण दर्शनने सेलमध्ये कैदही केले!ओशियाच्या बाजारी भाईंची थोडीफार खरेदीही झाली,
थंडगार सोडासरबत पिऊन त्यांनी आपली तहान भागवली,
मंदिरापासून गाडीकडे जाताना भिक्षुकांनी भाईंना घेरले,
तऱ्हेतऱ्हेचे डायलॉग मारून अक्षरशः हैरान करून सोडले!

भीक्षुकांतील एका छोट्या मुलीचे डायलॉग ऐकून दादांचे मन द्रवले,
कित्ती मांगरी, कदासू मांगरी सारखे शब्द शंभर एक मीटर दादांच्या कानी पडले,
अखेर दहा रुपये काढून दादांनी त्या मुलीला दिले,
ते दातृत्व पाहून अजून दहा भिकारी दादांच्या पाठी आले!

कशीबशी सुटका करून घेऊन सारे भाई गाडीपाशी पोहचले,
शेजारच्या हॉटेल मध्ये तळली जात असलेली मुंगभजी खाण्याचे साऱ्यांचेच मन झाले,
भजी सोबत अजून एक दोन आयटम भाईंनी ऑर्डर केले,
राजस्थानी स्पेशल कॉटवर बसून ते चवीने फस्त केले!दर्शन होईपर्यंत तीन साडे तीनची वेळ झाली,
वेळेप्रमाणे साऱ्यांनाच कचकटून भूक लागली,
ओशियापासून काही अंतरावरच एका मस्त राजस्थानी धाब्यावर इनोव्हा थांबली,
जेवन करतानाच वाजपेयी दिवंगत झाल्याची बातमी ऐकून भाईंची मने पानावली!

त्यायोगे धीरजने अटलजींच्या आठवणींना उजाळा दिला,
कापसासम मऊ हस्तस्पर्श त्यांचा त्याला आठवला,
प्रधानमंत्री अटलजी की चतुर्भुज परियोजना-फोर लेन महामार्ग का निर्माण वाले शब्द दर्शनला आठवले,
देशात राजकारन्यांवरचे प्रेम दाखवायला दुर्दैवाने व्यक्ती गेल्यानंतरच ऊत येतो हे त्याला पुन्हा जाणवले!

जेवण उरकुन अनुपजींची इनु पुन्हा मार्गी लागली,
ओशियापासून रामदेवराची वाट तिने धरली,
कुठेही आडवळने नसलेल्या एकदम सरळ रस्त्यावर गाडीने गती पकडली,
रस्त्यामध्ये गुडघ्यावर बाबाकडे रांगत जाणारे काही भक्त पाहून भाईंची मने द्रवली!

सरळ रस्त्याला आनंद ला गाडीत पत्ते खेळायचे सुचले,
दादा, आनंद अन दर्शन अशा तिघांनी तीन पत्तीचे डाव वाटले,
गाडीतल्या गाडीत एकमेकांवरून उड्या मारून बैठक कशीतरी मॅनेज केली,
काय ती पत्त्यांची जादू साला हळूहळू तिघात खेळायलाही फुल रंगत आली!

खेळता खेळता गाडीला कचकन एक हिसका बसला,
आनद्या मागच्याशीट वरून टुणकन मधल्या सीटवर येता येता राहिला,
हाहा काही नाही एक हट्टी गाय अनुपजीना नडली,
तिला चुकवायला इनु झुपकन तिरकी होऊन सपकन सरळ झाली!

झोपलेला इंडिया बोलला गाडीने चहा प्यायचा कौल दिला,
त्याला दुजोरा देऊन पत्याचा डाव तिथेच थांबला,
पुन्हा एका आलिशान धाब्यावर गाडी थांबली,
कडक स्पेशल चहाची ऑर्डर देऊन काहींनी चूळ भरली!


सुतळीने विणलेल्या ओळीने मांडलेल्या त्या कॉट्स वर दर्शन अन दादांनी आपापले देह आडवे केले,
त्या राजस्थानी बैठकींवर मॉडेल शूट करण्याचे मोह दर्शनला झाले,
थोडीशी कोरिओग्राफी करून त्याने भाईंचे एक दोन कडक फोटो काढले,
'क्या ठाकूर तुझे कितनी बार बुलाया तू आताही नही' वाल्या सरफरोश च्या डायलॉग चे पुन्हा स्मरण झाले!थोड्याच वेळात अनुजींची इनु तिथून दिवसातल्या तिसऱ्या देवस्थानी पोहचली,
सातारकर मंडळी रामदेवराच्या त्या भव्य देवस्थानी आली,
अनवाणी पायांनी 'जय बाबारी' म्हणत सूर्यास्ताच्या त्या प्रहरी स्वारी मंदिरात निघाली,
बाबांच्या दर्शनाने ती साही मने अवघी पावन झाली!

मंदिराबाहेर येताना माहितगार धीरजने बाबांचा त्याच्या माहितीतला इतिहास कथन केला,
बाबांच्या दारात भाईंनी एक छानसा सेल्फीही काढला,
बाहेर येऊन थंडगार लिंबू सरबताचा घोट घेतला,
शेवटच्या नियोजित स्थळाने दिवसभराच्या पर्यटनाचा इति झाला!शांत पवित्र झालेल्या मनांची मालक असलेली ती सहा शरीरे पुन्हा गाडीत बसली,
डिनर वाल्या रेस्टोपर्यंतच्या प्रवासापुरती तरी ती अंतर्मुग्ध झाली,
डिनर ला राजस्थानी स्पेशल पापड चुरीने सुरुवात झाली,
कडक स्पेशल केशर चहाने डिनरची सांगता केली!

भरली पोटे आणि दिवसभरच्या पवित्र स्थळांच्या आठवणींनीना घेऊन भाई सालासारकडे निघाले,
विनाथांब्याच्या त्या चार तासाच्या प्रवासामुळे गप्पांमध्ये रंग भरले,
आयुष्यात घेतलेल्या निरनिराळ्या अनुभवांचे पाढे भाईंनी अक्षरशः ओकले!
कोणाचे विषय सेंटी होते तर कोणाचे विषय रानटी ही होते,
पण त्या साऱ्या विषयांचे आशय रोम्यांटिकच होते,
शाळा कॉलेजच्या आठवणींनी ती पवित्र झालेली मने पुन्हा काहीशी दूषित झाली,
गप्पांच्या ओघात कळलेच नाही कधी सालासार नगरी आली!

आपापल्या ब्याग्ज घेऊन भाई एक एक करून खाली उतरले,
रात्री सव्वा दोन वाजताही आयोजकांनी उत्साहात भाईंचे स्वागत केले,
वेळेचे भान ठेवून वेळ न दवडता भाईंनी दोन एसी रूम्सचा ताबा घेतला,
राजस्थान टुर चा दुसरा दिवस भाईंच्या गाढ झोपेबरोबर इथेच संपला!
राजस्थान टुर चा दुसरा दिवस भाईंच्या गाढ झोपेबरोबर इथेच संपला!!

 

#सकाळ_सालासारमधली

सतरा तारखेला जेव्हा सालासारच्या मुक्कामी भुवन मध्ये जाग आली तेव्हा कार्यकर्त्यांची लगबग चालू झाली होती. समाजातील अशा कार्यक्रमांचे नियोजन आणि लग्नातील एखाद्या वर्हाडाचे नियोजन यामध्ये काही विशेष फरकच नसतो. तेच सकाळी सकाळी लवकर उठून आवरण्याचा आग्रह करणं, तो आग्रह करताना नाश्टा संपेल असा विनंतीवजा दम देणं, उठल्या उठल्या मस्त चहा, कॉफी, खारी, बिस्किट्स ची पाहुण्यांना रूमपोच सेवा देणं, अर्थातच हे सारं होतंच. ?

त्या दिवशी आम्ही उठलो तेव्हा नानू, आनंद आणि अमित तिघे दोनशे सहा मध्ये उठले तर धीरज, दादा आणि मी दोनशे सात मधे, अर्थात झोपलोही तिथेच होतो! ? चिल्ड एसी मध्ये थंडगार पडलेल्या त्या झोपल्या नंतर काही इंच खाली जाणाऱ्या गुबगुबित मऊमऊ बेड्स वरती झोपेतून उठणे यासारखे दुसरे कठीन काम नव्हते. नुसतं झोपायला हजार दिड हजार किलोमीटरचा पल्ला गाठून एवढ्या लांब राजस्थानपर्यंत आलोय का सारख्या झालेल्या आत्मसाक्षात्काराने एकामागोमाग एक करत सगळ्यांनी त्या स्वर्गसुखाला तिलांजली दिली.

असे बाहेर गेल्यानंतर खोड्या न काढता एकमेकांना सुखाने अंघोळी वगैरे करू दिल्या तर मग काय बोलायचं! काहीसा त्यातलाच प्रकार आमच्या राजस्थानभूमीवरच्या दुसऱ्या आणि सालासार मधल्या पहिल्या आंघोळीच्या वेळीही घडला. दोनशे सहा आणि दोनशे सात ना स्वतःची स्नानगृहे असली तरी त्यांना जी कॉमन भिंत होती ती का कोणास ठाऊक पण वरून थोडी मोकळी ठेवली गेली होती. मग त्या मोकळेपनाचा फायदा घेऊन इकडुन तिकडे आणि तिकडून इकडे थंड पाणी टाकून स्वतःला भिजवून घेण्यासाठीच स्नानगृहात गेलेल्या भाईंना एकमेकांकडून भिजवण्याचे फाजील चाळे चालू होते. त्याच धर्तीवर आनंदच्या वांड मेंदूमध्ये किडा वळवळला आणि दोनशे सहाच्या स्नानगृहाची एक बाजू बाहेरून ऍक्सेसिबल असल्याचा जावईशोध त्याला लागला. मग काय, अंगावरच्या फक्त दोन छोट्या कपड्यांमध्ये आनंद शेठ मोबाईल घेऊन बाहेर आले आणि पुरेशी उंची पुरत नसूनही अगदी टुणूक टुणूक उड्या मारून दोनशे सहा मध्ये स्वतः च्या शरीराला अभिषेक घालत असलेल्या वकीलसाहेबांना कॅमेऱ्यामध्ये चलचित्राच्या रूपात कैद करायचा प्रयत्न करू लागले. हे करताना बाकी भाईंनाही आवर्जून त्याने गोर्यापान वकिलांच्या आंघोळीचा जणू आस्वाद घेण्यासाठी बाहेर बोलावले. हास्याचा एकच कल्लोळ झाला आणि वकीलसाहेबांनी हसत हसतच आपल्या डिफेन्स साठी पाण्याने भरलेला एक पूर्ण ताम्ब्या त्या मोकळ्या जागेतून तसाच मोकळा केला. झुर्रर्रकन उडी मारून आंद्या तर त्याच्या दिशेने आलेल्या पाण्याच्या माऱ्यातून वाचला, पण त्याच्या मागून आपल्या रस्त्याने नटून थटून खाली जाणारा प्रदेशचा आम्हाला अपरिचित भाई मात्र थोडाफार भिजला. सभ्य भाषेत अध्यक्षांना त्यांनी दोन शब्द सुनावले, सॉरी सॉरी म्हणत रेकॉर्डिंग बंद करून अध्यक्ष स्वतःच्या आवराआवरीला लागले. ?

#सालासार_ब्रेकफास्ट_अन_सेल्फीसेशन

कार्यक्रमाचा पहिल्या दिवशीचा ड्रेसकोड होता व्हाईट शर्ट आणि ब्लू जीन्स! कमरेवरून पांढरे आणि कमरेखालुन निळे होऊन सातारा माहेश्वरी युवा संघटनचे आम्ही साही कार्यकर्ते एक एक करून रूम्स च्या बाहेर पडलो. दोनशे सहा-सात ना व्यवस्थित लॉक करून सारे नाष्टयाला खाली आलो. देशाच्या उत्तर-पश्चिमेत नाष्टा असला तरी बहुतांश पदार्थ हे अपेक्षेप्रमाणे दक्षिणेतलेच होते. डावीकडे काळ्या गरम तव्यावर ढोशाचे पीठ तडतडत होते, तर तिच्याच बाजूला पांढऱ्या शुभ्र इडल्या हिरव्यागार चटणी सोबत वाढल्या जात होत्या. त्यांना नेहमीप्रमाणे युनिव्हर्सल पोह्यांची जोड होतीच. स्वातंत्र्यदिनी मिस केलेली जिलेबी ही स्वीट मध्ये असल्याने आम्हा भाईंची जिलेबी खायचीही हौस फिटली. जेणेकरून सारे पदार्थ कव्हर होतील अशा क्विक नियोजनाने आम्ही भाईंनी आपल्या प्लेट्स सजवून घेतल्या आणि महाराष्ट्च्या विधविविध भागांना रिप्रेझेन्ट करण्यासाठी राजस्थानातील सालासार नामक पवित्रस्थळी एकत्र आलेल्या इतर भाईंसोबत गप्पागोष्टींसहित नाष्टानंद घेण्यासाठी सहभागी झालो. महाराष्ट् प्रदेश माहेश्वरी युवा संघटनचे सहसचिव श्री अमितजी कासट आणि आखिल भारतीय माहेश्वरी युवा संघटनचे सल्लागार श्री गोकुळजी सारडा यांनी आमचा परिचय करून दिला. सारेच एकमेकांच्या कुठून ना कुठून तरी नात्यागोत्यातले असल्याने 'त्याच्या तिचा तो' सारखे रेफरन्सेस लागून ओळखी निघत गेल्या. इडली ढोशाचे तुकडे तुटत गप्पाना चांगली रंगत चढत गेली. त्या झालेल्या गप्पांमधून आम्ही याआधीची तिरुपतीमध्ये झालेली कार्यकारणी बैठक मिस केल्याची दुःखद जाणीव आम्हाला झाली! ?नाष्टयानंतर गरमागरम चहाचे घोट रिचवून आम्ही सारे मिटिंग साठी भुवन च्या भल्या मोठ्या हॉल मध्ये येऊन बसलो. अजून सारे इटिंग मधेच व्यस्त असल्याने मिटिंग साठी हॉल मध्ये फारसे कोणी आले नव्हते. मोकळ्या वेळेचा फायदा घेऊन फ्रेश आहे तोपर्यंत फोटोसेशन करून घेऊ म्हणत मी आणि आनंदने आपले मोबाईल बाहेर काढले. तसे राजस्थानात दाखल झाल्यापासून मी तर मोबाईल सेल्फीज काढण्यासाठी तळहाताला जणू चिकटवूनच ठेवला होता. जरा काही वेगळी ऍक्टिव्हिटी झाली की कर हात पुढं आणि दाब बटन, कर हात पुढं आणि दाब बटन असच काहीसं चालू होतं. सेल्फीचा डिफॉल्ट मोड हा मिरर मोड असतो त्यामुळे आपले आत्तापर्यंत तिरळे सेल्फी यायचे हे ज्ञान काही भाईंना नवीन होते.

आपण आत्तापर्यंत सेल्फीज मध्ये जितके खराब दिसत होतो तितके प्रत्यक्षात नाही च्या झालेल्या ज्ञानामुळे भाईंचा फोटो काढून घेण्याचा उत्साह दुणावला तिनावला होता. पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये काही कडक फोटोज आम्ही काढले. आपल्या कॅण्डीड फोटोग्राफीचा अभिमान असणाऱ्या आनंदने आपल्या फोटोकाढू कलेचे प्रदर्शन केले. काढलेले काही फोटोज त्याने इकडे ग्रुप वरही सेंड केले. त्यातले बरोब्बर खराब खराब फोटो निवडून पवनजींनी राजस्थानात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे समाजाच्या सोशल पेज वर एफ बी पोस्टिंग केले. साताऱ्यात पवनने मुद्दाम खराब खराब फोटो निवडून एफ बी वर टाकलेत असे वाटून वकिलसाहेब राजस्थानात गोडगोड उचकले! ??#बैठक_कार्यकारणीची_अन_कमाल_धिरजची

राजस्थानचेच सुपुत्र असलेले अखिल भारतीय माहेश्वरी युवा संघटनचे अध्यक्ष आणि महाराष्टर प्रदेश माहेश्वरी युवा संघटनचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारणी बैठकीला सुरुवात झाली. विधविविध भागातून आलेल्या प्रदेश कार्यकर्त्यांच्या कामाचे आढावे घेतले गेले, त्याबरोबरच काही बक्षीस-सत्कारही करण्यात आले. प्रदेश करवी येऊ ठाकलेल्या काही नियोजित प्रोजेक्ट्स ची माहिती सांगितली गेली आणि या सर्व बाबींनंतर प्रश्नोत्तरात्मक संवादाला सुरुवात झाली. विधविविध प्रदेशांच्या कार्यकर्त्यांकडून संमिश्र भावनांचे प्रश्न विचारले गेले. प्रदेश अध्यक्षांनी स्वतःच्या परीने त्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्याचे प्रामाणिक प्रयत्नही केले. काही उत्तरांनी समाधान केले तर काही उत्तरे ऐकून प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या कार्यबुद्धीला चालना देऊन बुद्धयांना नवीन प्रश्नांवर आणून सोडले. या चालू असलेल्या खेळाचा बघ्याच्या भूमिकेत आनंद घेत असताणाच आम्ही आमच्या धीरज ची चुळबुळ नोटीस केली. ती चुळबुळ दुसऱ्या तिसऱ्या कशासाठी नसून ती पुढे जाऊन काहीतरी प्रश्न विचारण्याच्या इच्छेपोटी आहे याची प्रचिती लगेचच आम्हाला आली. आम्हा पाची जणांची जणांची छाती एक एक इंचाने पुढे आली जेव्हा आमच्या धीरज सरांनी शर्ट व्यवस्थित करत, असलेल्या थोड्याफार केसांवर हात फिरवत स्टेज वर एन्ट्री मारली आणि सातारासे सीए धीरज कासट अशी स्वतःची ओळख राजस्थान मध्ये करून दिली! ?

सीए साहेब स्टेजवर निघाले आहेत हि जाणीव होताच मी पहिला सेल बाहेर काढला आणि कॅमेऱ्याचे लाल बटन दाबून त्याला व्हिडिओ रेकॉर्डिंग मोड वर टाकला. "मै ऐसे बिलकुल भी नही कहूँगा की समाज ने मुझे अब तक कुछ भी नही दिया, क्यूकी इसी समाज ने मुझे यहाँ आज खडे रेहने के है काबील बनाया" या धीरजच्या पहिल्याच फेकलेल्या वजनदार मार्मिक वाक्याने अखंड हॉल च्या टाळ्या जिंकल्या. त्या टाळ्यांचा आवाज कमी होतोय तोपर्यंतच "पर मेरा माहेश्वरी संघटन ये भावना ही समाज के लोगोंमें पैदा करणे में असफल हो रहा है कि समाज ने उन्हे कुछ दिया है" या लागून आलेल्या वाक्याने श्रोत्यांना विचार करायला भाग पडून त्यांच्या भुवया ताणावल्या. साताऱ्याच्या या भावी प्रदेश मंत्र्यानी आपल्या प्रश्नांमध्ये पुढे दोन ताकदीच्या विषयांमध्ये हात घातला. पहिला म्हणजे अर्थातच अर्थ क्षेत्राचा जाणकार असल्याने फंडिंग गोळा करताना लागणाऱ्या १२ ए, ८० जी वगैरे सेक्शन अंडर येणाऱ्या समस्यांचा आणि दुसरा म्हणजे समाजासाठी विधविविध ठिकाणी खासकरून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत अन्नछत्रे उभे करण्याचा! विचारलेले प्रश्न आणि ते प्रश्न मांडताना धीरजने दाखवलेली म्यॅट्यूरिटी या दोन्ही गोष्टीची प्रगल्भताच एवढी होती की तिथे बसलेल्या प्रत्येक जनाला त्याच्या मध्ये आपला भावी लीडर दिसून आला नसेल तर नवल! घेतलेल्या चार पाच मिनिटात चार दोन मुद्दे मांडून धीरजशेठ टाळ्यांच्या गजरात खुर्चीवर येऊन बसले. रेकॉर्डिंग संपवून साताऱ्याच्या पदाधिकाऱ्यांच्या ग्रुप वर सेंड करत करत माझ्यासकट बाकी चौघांनी धीरजचे सेंचुरी मारून पॅव्हेलियन मध्ये आल्याच्या थाटात हॅन्डशेक्स वगैरे करून स्वागत केले. ?

धीरजने विचारलेल्या प्रश्नांचे कौतुक आणि एकसाईटमेन्ट एवढी होती की त्याच्या प्रश्नांना उत्तरे काय आली याचे काही फारसे घेणेदेणेच आम्हाला नव्हते! थोड्याच वेळात बैठकीची सांगता झाली आणि सर्वानी भुवनच्या खानकक्षात जेवणासाठी हजेरी लावली. अर्थातच राजस्थानात असल्यामुळे बांधलेल्या अंदाजाप्रमाणे भरपूर साऱ्या आयटम्स मध्ये मेन कोर्स हा डाळबाटीच होता. पुन्हा मस्त ताटे सजवून घेऊन आम्ही जेवायला सुरुवात केली. तेव्हा स्टेज वर जाऊन बोलण्याची किंमत आम्हाला कळाली. सकाळी नाश्टा करताना जिथे सर्वांकडे जाऊन लोकांना ओळख सांगावी आणि विचारावी लागत होती तिथेच जेवणाच्या वेळी लोक आवर्जून धीरजकडे आपली ओळख करून द्यायला येत होते. ?

#शुभेच्छा_आनंदच्या_भावाच्या

तुडुंब जेवण झाल्यानंतर थोडी वामकुक्षी घ्यावी आणि पुन्हा दुपारच्या सेशन मध्ये असलेले इंटरनॅशनल स्पीकर चे मोटिव्हेशनल लेक्चर ऐकायला हजेरी लावावी असा विचार करून आम्ही साही जण दोनशे सहा-सात मध्ये आलो. माझ्या वामकुक्षीची गोड कल्पना धुळीस मिळाली जेव्हा आनंदने मला त्याच्या भावाच्या वाढदिवसाला पाठवायला कविता करण्याची रिक्वेस्ट केली. आनंद उर्फ अध्यक्षांचा मावस भाऊ म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून सातारा माहेश्वरी सभेचे कार्यरत अध्यक्ष श्री मुकुंदजी लोयाच होते. तीन चार दिवसांपूर्वीच त्यांचाच मुलगा अर्थात राजू बोलला होता की पप्पांची एकसष्टी आहे, त्यामुळे एक छोटा प्रोग्रॅम नियोजित आहे म्हणून. थोड्याच वेळात भाईंशी चर्चा करत करत मुकुंद भाऊंसाठी एक मस्त रचना तयार झाली,

"सातारा शहर माहेश्वरी सभाध्यक्ष के नाते सातारा शहर माहेश्वरी समाज के प्रथम नागरिक श्री मुकुंदजी लोया,
हमारे परिवार के हर बडे छोटे कार्य में राह दिखानेवाले तथा आगे बढ के हाथ बटानेवाले हमारे आधारस्तंभ श्री मुकुंदजी लोया,
दिल में ढेर सारे प्यार के साथ साथ जरुरत पडे तो कठोर रेहके सामनेवालों को अपनी सोच पे सोचने के लिये मजबूर करने वाले श्री मुकुंदजी लोया,
अपने हर विषय का विस्तार से अभ्यास करके सही रास्ता चुनने का कौशल्य, गलती से रास्ता गलत भी चुना हो तो चुनी दिशा को सही साबीत करणे का अनुभव रखनेवाले श्री मुकुंदजी लोया,
अपने स्मार्ट सेन्स ऑफ ह्यूमर से अपने सहयोगी की हलकी फुलकी नटखट चुटकीयां लेनेवाले श्री मुकुंदजी लोया,
अपने नेतृत्वगुण से अपने व्यापार को प्रभावित करके उसका विस्तार करनेवाले बिझनेसमन श्री मुकुंदजी लोया,

भैय्या आज आपके जनमदिन के बहाने आप पुरे कर रहे जीवन के लगभग साठ साल,
अनुभव किये होगे आपने इस सफर में जिंदगी के कई सारे हाल!
निश्चितः आपने लिये होगे कष्ट तथा दिये होगे ढेर सारे जवाब,
जब पूंछे होगे जिंदगी ने आपसे कई तरह के सवाल!
आपका जवाब देने का यही अनुभव बना हुआ है हमारा आधार,
बस युंही बना रहे आप का इसी तरह का लाड, प्यार तथा आशीर्वाद हमपर जब हमारे साथ पुरे करेंगे आप आपके जीवन के पुरे सौ साल,
भैय्या, बस युंही बना रहे आप का इसी तरह का लाड, प्यार तथा आशीर्वाद हमपर जब हमारे साथ पुरे करेंगे आप आपके जीवन के पुरे सौ साल!

जनमदिन की ढेर सारी शुभकामनाये मुकुंदभाऊ!! ?

भावना - आनंद करवा
शुभेच्छुक - सातारा माहेश्वरी युवा संघटन
शब्द - D for Darshan"

आता या शुभेच्छा लिहिताना "हमारे परिवार के हर बडे छोटे कार्य में राह दिखानेवाले" मधल्या "राह" या शब्दाच्या जागी टाईप करताना चुकून एक उकार जास्त पडला आणि "राह" चा "राहू" होऊन संपूर्ण वाक्याचा अर्थच बदलून गेला. ? पुढे पाठवायच्या आधी वाचताना वकीलसाहेबांना ती चूक जेव्हा लक्षात आली तेव्हा ती चुकभुलीने झालेली घोडचूक एक हशा पिकवून गेली. त्या चुकेबरोबर अजून एक दोन करेक्शन्स करून शुभेच्छा वकील साहेबांकडून अप्रूव्ह झाल्या. अँप्रूव्ह झालेले व्हर्जन, राजू कडून एक मस्त फोटो घेऊन मी पुढे पाठवायला आनंदला फॉरवर्ड केले. आनंदने त्या शुभेच्छा पुढे पाठवताना शेवटची शब्द वाली लाईन खोडायचा केलेला प्रयत्न हेरून मी तो खोडून काढला."अरे, ती मी वरची सौ साल वाली दोनदा झालेली लाईन डिलीट करत होतो असे म्हणून आंद्याने आपला बचाव करायचा प्रयत्न केला. तू किती हुशार आहेस ते आम्हाला माहित नाही का म्हणून वकीलसाहेबांनी आंद्याची कोपरखळी काढली, मग काय लागलीच बाकीही भाई मंडळी त्यामध्ये सामील झाली. ? असो, या नादाने वामकुक्षीच्या ऐवजी काहीतरी समाधानकारक क्रिएटिव्हिटी झाली. मग पाच मिनिटात लटकवलेले शर्ट्स चढवून आम्ही पुन्हा खाली जाऊन मोटिव्हेशनल लेक्चर ला हजेरी लावली.

#परतानिंचा_सेमिनार

मोटिव्हेशनल कोचिंग प्रेमी आळशी दादा सोडून आम्ही सारे खाली आलो तेव्हा इंटरनॅशनल लेव्हलचे निलेश परतानी सेमिनार साठी स्टेज वरती रेडी होते. त्यांनी सेमिनार ला सुरुवात तर केली पण इकडे काही वेळापूर्वीच डाळ बाटी सारखे जड जेवण जेवलेल्या श्रोते मंडळींना त्या बाटीचा स्वतःवर होणारा अंमल टाळणे जड जात होते. दोन पापण्या एकमेकांना भेटण्यासाठी आतुर तर झाल्या होत्या पण आजूबाजूचं वातावरण त्यांच्या त्या मिलनाला परवानगी देण्यासारखं नव्हतं. पण आसपासच्या वातावरणाला जुमानतील ते वकीलसाहेबचं कसले! माझ्या शेजारी बसलेल्या वकिलांनी सरळ आलेल्या निद्रेला वाट करून दिली आणि मस्त खुर्चीवर बसल्या बसल्या सेमिनार मधेच ताणून दिली. सारडांच्या वकीलसाहेबाना असे कार्यक्रमात मस्त झोपताना पाहून मला दोन वर्षांपूर्वी सारडांच्याच प्रीतमशेठ सोबत ठाण्यामध्ये अटेंड केलेल्या शायनिंग स्टार्स या प्रोग्रॅमची आठवण झाली. मोठाल्या हॉल मधल्या फुल्ल साउंड म्युझिकल कन्सर्ट मध्ये मस्त पैकी अर्धा पाऊण तास झोपून उठलेल्या प्रीतम शेठ नि पाच मिनिट प्रोग्रॅमचा जागेपणी अनुभव घेऊन, "दर्शन तुला सांगतो साले जे आले नाहीत ना साताऱ्यातून, त्यांनी आयुष्यातला एक खूप चांगला कार्यक्रम मिस केला आहे" अशी रंजक टिपणी केली होती. ?? त्या टिपणीचे स्मरण होऊन माझे मीच गालातल्या गालात हसलो आणि धीरजला सांगून वकीलसाहेबांना जागे करा म्हटलो. त्या चुळबुळीने वकिलांचा चार-पाच मिनिटांचा डुलका भंग झाला, झोपेचा सारा राग बाटीवर काढून वकील चेहऱ्यावरून हात फिरवून परतानिंच्या श्रवणास सेट झाला.

'जहाँ ना जाये गाडी वहा जाये मारवाडी' सारख्या जवळपास डझनभर म्हणींच्या आधारावर त्यांचे सोदाहरणाने रोमांचक विश्लेषण करत परताणींनी आपल्या समाजबांधवांना मार्गदर्शन केले. व्यवसाय क्षेत्रात आपण आघाडीवर असल्याचा समाजातील लोकांचा भ्रम कसा चुकीचा आहे हे विस्तृत करून त्यांनी श्रोत्यांचे जणू डोळे उघडले. सेमिनारच्या त्या दोन अडीच तासात एक चांगली ज्ञानसंपदा झाली. चार चांगल्या गोष्टींची शिकवन त्यायोगे आम्ही भाईंनी घेतली. सेमिनार मिस केलेले दादा मस्त झोप काढून, पिवळा टी-शर्ट पुन्हा चढवून, आम्हाला सेमिनार संपताना जॉईन झाले. आपल्याला एकतरी असा मोठा मोटीव्हेशनल सेमिनार साताऱ्यात घ्यायचाय असे दादांचे स्वप्न त्यांनी त्याक्षणी आम्हाला बोलून दाखवले.

#सालासार_बालाजी_मंदिर_दर्शन

सेमिनार संपल्यानंतर चहा कॉफी घेऊन आम्ही त्या पवित्र शहराचे मुख्य आकर्षण असलेल्या सालासार बालाजी मंदिरात दर्शनाला जायचे ठरवले. पिवळे दादा आणि निळे अध्यक्ष सोडले तर आम्ही बाकी सारे पांढरे होतो. भुवन पासून साधारण अर्धा पाऊण किलोमीटर वरती सालासार च्या त्या अवघ्या भारतभूमीमध्ये प्रसिद्ध असलेल्या सालासार हनुमान म्हणजेच बालाजी चे मंदिर होते. काही मिनिटांच्या त्या पायी प्रवासात आम्हाला आमच्या धीरज कडून थोडाफार सालासारच्या बालाजीचा रंजक इतिहास ऐकायला मिळत होता.धीरजच्या सांगण्याप्रमाणे आपल्या मोहनदास नामक भक्ताला दिलेल्या वचनाप्रमाणे नागौर जिल्ह्यातील आसोटा गावामध्ये एका शेतामध्ये बालाजी मूर्तिरूपात प्रकट झाले होते. जाट शेतकऱ्याच्या बायकोने त्या दिवशी डब्यात आणलेल्या चुरम्याचा नैवेद्य लागलीच त्या मूर्तीला दाखवला आणि तिथून आजपर्यंत बालाजीला चुरम्याचा नैवेद्य दाखवला जातो. ज्या दिवशी ही मूर्ती प्रकट झाली त्याच दिवशी मोहनदास ना स्वप्नात दृष्टांत झाला कि ज्या बैलगाडीने माझी मूर्ती सालासार मध्ये नेली जात आहे, ती बैलगाडी जेव्हा सालासार मध्ये पोहचेल तेव्हा तिला कुणी चालवणार नाही, ती जाऊन ज्या जागी स्वतःच्या मनाने थांबेल तिथे माझी मूर्ती स्थापन करून टाका. त्या झालेल्या दृष्टांताप्रमाणेच आजची मूर्ती आणि मंदिराची जागा आहे. अजून एक वैशिष्टय म्हणजे हे एकमेव हनुमानाचे मंदिर असे आहे कि जिथे हनुमानाच्या मूर्तीला ला दाढी मिशा आहेत. याचे कारणही मोहनदासच होते, त्यांना जेव्हा दृष्टांत झाला तेव्हा दाढी मिशांच्या वेषातच बालाजीने दर्शन दिले होते. याहून महत्वाची गोष्ट म्हणजे बालाजी मंदिराचे कारागीर हे मुस्लिम कारागीर होते. ते ऐकून मला मनातल्या मनात वाटले की वाह काय योगायोग आहे, आपल्या घराचे कारागीर, इंटेरियर वगैरे पण मुस्लिमच आहेत! ?

धीरजमुखातून त्या रंजक गोष्टी ऐकत ऐकत अपार श्रद्धाभावाने आम्ही बालाजी मंदिराच्या दारी पोहचलो. अलाऊड असेल तिथे फोटो काढत, हनुमान चालीसा गुणगुणत आम्ही दर्शनासाठी मंदिरात गेलो. धीरजने दिलेल्या माहितीप्रमाणे मंदिरातून फिरताना बालाजीचा आसोटा ते सालासार पर्यंतचा प्रवास नजरेसमोरून फिरत होता. श्रुष्टीकर्ता आपल्या भक्तांकडून स्वतःचे वैभव स्वतःच कसा तयार करून घेतो हा विचार आम्हाला विचार करायला भाग पाडत होता. अर्थातच बालाजीच्या त्या राज्याही विरोधाभास कमी नव्हते. इथे पैसे मोजून व्ही आय पी दर्शन दिले/घेतले जात होते. सहा पुड्यातल्या चार पुड्या खिशात टाकून दोन पुड्या आमच्या समोरच तोंडात मोकळ्या करून आमच्या हाताला मोळी बांधायला तयार होणारे पुजारीही होते. त्या सर्व गोष्टी जाणून बुजून इग्नोअर करत, दिसणारी प्रत्येक गोष्ट देऊळ, ओ माय गॉड, पिके वगैरे सारख्या चित्रपटांची आठवण करून देणार नाही याची स्वतःलाच समजूत घालत निस्सीम भावनेने आम्ही दर्शन घेण्याचा प्रयत्न करत होतो. बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे जवळपास तीनशे वर्षांपासून सतत तेवत असलेली धुनी दिसली. हनुमानजींचे निस्सीम भक्त त्या धुनीचा अंगारा रोगांपासून मुक्ती मिळविण्यासाठी वापरतात अशीही माहिती आम्हाला मिळाली.धुनीचा अंगारा लावल्यानंतर आम्ही पुढे अंजनी मातेच्या मंदिरी गेलो. अंजनी माता आणि बालाजी हनुमान यांचे मंदिर असे वेगवेगळे असण्या मागची रंजक कथाही आम्हाला धीरजने सांगितली. बालाजीनेच अंजनी मातेला बोलावून घेतले होते कारण हनुमान ब्रह्मचारी असल्याने त्यांनी मातेला सांगितले होते की यौन किंवा संतान संबंधी समस्या घेऊन येणाऱ्या स्त्री भक्तांच्या समस्यांचे निराकरण करणे मला अवघड जातेय त्यामुळे तू हि ये. माता आल्या नंतर दोघांची एका जागी स्थापना झाली तर पहिली पूजा कोणाची हा वाद नको म्हणून मातेचे मंदिर थोडे लांब स्थापन केले गेले. हनुमान बालाजीला आपल्या गोदी मध्ये घेतलेल्या अंजनी मातेच्या मूर्तीचे आम्ही मनोभावे दर्शन घेतले आणि बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर जवळच झालेल्या भागवत कार्यक्रमाच्या भव्य जागेला भेट देऊन दोन चार फोटो काढून भुवन च्या दिशेने परतीच्या मार्गाला लागलो. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा संपूर्ण संघटन बरोबर बालाजी दर्शनासाठीच नियोजित प्रभातफेरी असल्यामुळे जाताना दुसऱ्या दर्शनासाठी बालाजीच्या भेटीला पुन्हा येण्याचे वेध होतेच.

#बदाम_सातची_हास्यरात्र

भुवन मध्ये पोहचल्यानंतर डिनर चे बुफे टेबल लागलेलेच होते. सकाळच्या हेवी जेवणामुळे आम्ही सर्वांनी डिनर लाइटच केले. वरती जाताना सारे स्टेप्स वरून आणि आनंद तेवढा लिफ्ट मधून निघाला. अचानक वकीलसाहेबांमधला खोडकर नानू जागा झाला आणि त्यांनी मधेच वेगात सरसर जीना सर केला. जीना सर करून नानू लिफ्टच्या बरोबर दारावर जाऊन उभा राहिला. जमीनीला भेग पडावी तसा लिफ्टचा दरवाजा दोन्ही बाजूला सरकत जायला आणि नानुने परफेक्ट टायमिंगला मोठ्याने भॉ करायला एकच वेळ झाली. त्या अनपेक्षित भॉ ने पोटात सेकंदभर मोठ्ठाला गोळा येऊन आनंदची पुंगी टाईट केली. तिथून जी भाईंच्या त्या हास्यरात्रीला सुरुवात झाली ती मध्यरात्री अडीचला भाईंच्या झोपेनेच थांबली! ?

रुम्समध्ये पोहचताच अंगावरची काही वस्त्रे कमी करून आम्ही हलके झालो. दोनशे सात ला कुलूप लावून दोनशे सहा मध्ये गोळा झालो. सकाळ पासून ज्या गोष्टीची ओढ लागली होती ती आता होणार होती. फार विशेष असे काही नाही तर फक्त बदाम सात साठी पुन्हा पाने फिसली जाणार होती. मोठा असूनही सहा जणांच्या गोलासाठी तोकड्या असलेल्या बेडवर कसेतरी आम्ही सहा जण सेट झालो. भिंतीला टेकून वकिलसाहेब बसले, त्यांच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात दादा तर उजव्या बाजूला कोच उर्फ इंडिया उर्फ सहसचिव म्हणजेच अमितजी स्कोर चा कागद घेऊन सेट झाले. वकील साहेबांच्या बरोब्बर समोर बेडच्या बरोबर बॉर्डर वर मी विष्णूसारखा आडवा बसलो, माझ्या डोक्याच्या बाजूला आनंद होता तर पायाच्या बाजूला धीरज! ☺?

डावाला सुरुवात होणार तोच वकिलांना त्यांचा सेल डिस्चार्ज असल्याची आठवण झाली. दोनशे सात मधली सगळी सॉकेट्स ऍलोकेटेड असल्याने वकिलांनी सीएसाहेबांना दोनशे सहा मध्ये सेल चार्जिंगला लावायची विनंती केली. सीएसाहेब उर्फ धिरजशेठ सेल चार्जिंगला लावायला तर घेऊन गेले पण चार्जिंग होत नाही तुझ्या फोनचं पिन आत घालायचं खराब झालय ते बदलावं लागेल म्हणून वकिलांना नवीनच टेन्शन घेऊन आले. सगळ्या भाईंनी सामूहिक रित्या सीएला कव्हर काढून चार्जिंग ची पिन लावायची कल्पना सुचवली. सर्वांवर हसून हसून लोळायची वेळ आली जेव्हा वकिलांनी कव्हर ला चड्डीची उपमा देऊन "अरे धीऱ्या तू मोबाईलची चड्डी न काढताच पिन घालतोय आणि जात नाही म्हणतोय" सारखी सहज सुंदर कोटी केली. ??? खेळाला सुरुवात झाल्यानंतर वेळ मिळेल तसा आनंद, दादा अन अमितने तीन तीन दा त्याच वाक्याचे पारायण करून आगीत तेल ओतले. पण त्या आगीतून ज्वाला नाही तर हास्याचेच चिळकांडे उडत गेले.

असच हसता हसता मधेच बेडच्या कडेला झोपलेलो मी तसाच बेडवरून खाली पडलो. झालं आधीच कसेतरी हे हसू थांबावं यासाठी जणू प्रे करणाऱ्या आम्हा भाईंना हसायला मी अजून एक कारण देऊन गेलो. ? पुन्हा हसून हसून सारे डोळे पुसत खेळ पुढे सरकवत राहिले. आदल्या दिवशी दुपारी फुल फॉर्म मध्ये असलेले धीरज चे पत्ते फिरले होते तर इकडे नवीन दादा खेळात चांगलाच अनुभव दाखवत होते. गेमाड अनद्यावर मात्र सगळेच अविश्वासाची नजर ठेवून होते. हसायला पुन्हा कारण मिळालं जेव्हा आदल्या दिवशी प्रमाणेच लकी सेव्हन च्या प्रयत्नात कोच ने दाबून ठेवलेली सत्ती त्याच्या चोचीतच राहिली कारण पुन्हा मी त्याच्या आधी पाने संपवून बाजी मारली. झाले, कोच साहेबांचा पडलेला चेहरा पाहून, त्यामागून पुन्हा मोबाईलच्या चड्डी अन माझ्या पडण्याची आठवण होऊन पुन्हा एकदा हास्यकल्लोळ झाला. ?

मध्ये थोडा ब्रेक घेऊन आम्ही हॉल मध्ये सुरु असलेले भजन ऐकायला गेलो. तुने मुझे बुलाया शेरावालीये सारख्या गाण्यावर थोडं थिरकूनही आलो. पुन्हा नव्या दमाने खेळाला सुरुवात झाली पण आता हसण्यासाठी कारणेच इतकी होती की जरा कुठे काय झालं की हसू आवरत नव्हतं. असं करत करत रात्रीचे दीड वगैरे वाजले. त्या टायमिंग ला वकिलांना त्यांचे नुसते पत्ते पाहूनच हसू यायला लागले. गेमच्या पहिल्याच डावात साठ पॉईंट ला वकील सापडला, आता रिकव्हरी अशक्य आहे या सत्याने वकिलांनी लहानपणीचा चिडका नानू जागवला. बास बास म्हणून नानुने सगळे पत्ये गोळा केले आणि साऱ्यांचे जे एकच हसणे सुरु झाले कि बास! कोणी हसत हसत अक्षरशः लोळत होते, कोणी एकमेकांवर पडत होते, धिर्याला लहानपणीचा नान्या आठवत होता, आठवून आठवून त्याच्याही हासण्याला पार उरत नव्हता. हसून हसून सगळेच एक श्वास झाले, आता हसता हसता एखादा श्वास न घेता जागेवरच जातोय का असेच जणू वाटायला लागले. हसण्याचा आलेला तो एक प्रकारचा ऑर्ग्याजमच होता. आमच्यातला प्रत्येक जण हसून हसून अक्षरशः रडला होता. प्रत्येकाला माहित होतं की आयुष्यातील एक परमोच्च आनंद तो त्याक्षणी अनुभवत होता. त्या परमसुखातच हरएक जण झोपी गेला, राजस्थान भूमीवरच्या दुसऱ्या मुक्कामाचा इती झाला, , राजस्थान भूमीवरच्या दुसऱ्या मुक्कामाचा इती झाला! ☺

#तयारी_प्रभातफेरीची

आदल्या दिवशी रात्री मरेपर्यंत हसून हसून झोपताना अडीच तीन च्या मध्ये कुठेतरी दिसणाऱ्या घड्याळाच्या काट्याकडे पाहून असे वाटत नव्हते कि आम्ही सकाळी लवकर उठू आणि महाराष्ट प्रदेश माहेश्वरी युवा संघटन नियोजित सालासार मधील प्रभात फेरीमध्ये सहभागी होऊ! परंतु सालासारच्या बालाजीने ती जबाबदारी जणू स्वतःवर घेतली आणि एवढ्या उशिरा झोपूनही आम्हाला सकाळी वेळेत जाग आली. वेळेचे बंधन असल्यामुळे अजिबात कोणी कोणाची छेड न काढता या सकाळी साऱ्यांच्या राजस्थान भूमीवरच्या तिसऱ्या आणि दौऱ्यातल्या शेवटच्या आंघोळी सुखाने पार पडल्या. स्नान सेशन नंतर स्वतःला प्रभात फेरीसाठी नटविण्याचा महान सेशन सुरु झाला!

प्रभात फेरीसाठी ड्रेसकोड ठेवला गेला होता, मस्त पांढरा शुभ्र सलवार कुरता! अशा कार्यक्रमांमध्ये ट्रॅडिशनल वेशभूषा करणे याची मजा काही औरच! मी परिधान केलेल्या सलवार कुरत्यावर रुटीन प्रमाणे परफ्युम घेऊन त्याची नेहमीच्या स्टाईल ने फूस-फूस करून फवारणी करायला लागलो तोच मला पाठीमागून आवाज आला, "ये दर्शा थांब, हे काय करतोय? आज मी तुला परफ्युम कसा मारायचा ते शिकवतो." पॉश कुर्ता घालून तयार झालेल्या धीरजने माझ्या हातून परफ्युम ची बॉटल घेतली आणि मला अक्रॉस उभं राहून त्याच्या समोरून काही पावले आडवे चालत जायला सांगितले. मी चालायला सुरुवात केली तोच त्याने परफ्युम माझ्या चेहऱ्याच्या उंची पासून अगदी गुडघ्याच्या खाली पर्यंत फूस फूस करत नेला. म्हणजे जेणेकरून मी कार्यालयाच्या दारात लावलेली अत्तरदानी असते तिच्या समोरून अत्तरस्नान करून पुढं गेल्यासारखं झालं ते! धीरजशेठ म्हणाले सारडांच्या भरतनी दिलेलं शिक्षण आहे हे आम्हाला. नंतर तोच प्रयोग त्याने सारडांच्याच वकीलसाहेबांवरही केला.

सहसचिव भाई अमितजी सोडून आम्ही सार्यांनी ड्रेसकोड फॉलो केला होता. रात्री झोपेमुळे सुजलेले डोळे जरा बरे दिसावेत यासाठी थोडासा नट्टापट्टा करून त्या मस्त पांढऱ्या शुभ्र युनिफॉर्म मध्ये परफ्युम चाही युनिफॉर्म सुगंध बरोबर घेऊन आम्ही दोनशे सात ला लॉक करून भुवनचे जीने उतरलो आणि लागलीच चहा खारी वर ताव मारणाऱ्या फेरी साठी रेडी झालेल्या क्राऊड मध्ये चहा कॉफीचे कप घेऊन मिसळून गेलो. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतून आलेले जवळपास साठ-सत्तर भाई भुवन पासून सालासार बालाजी मंदिरापर्यंतच्या दिड दोन किलोमीटर च्या प्रभातफेरीसाठी सेट झाले होते. पवित्र सालासार नगरीच्या त्या पवित्र मार्गावरून आम्ही फेरीबरोबर बालाजीच्या आमच्या दुसऱ्या दर्शनासाठी मार्गक्रमण करू लागलो. अर्थातच जाताना फोटोज निघत होते, व्हिडीओज रेकॉर्ड होत होते, बजरंग बली चा जयजयकार होत होता,एकमेकांच्या नवनवीन ओळखी काढत समूहाचा रस्ता कटत होता.

#सालासार_बालाजी_दर्शन

पाहता पाहता मंदिर आले, समूहाने आलेल्या भाईंनी सामूहिक पद्धतीनेच अगदी शिस्तीने दर्शन घेतले. साऱ्यांचे दर्शन झाल्यानंतर अस्सल एनर्जी तेव्हा मिळाली जेव्हा आम्ही मंदिराच्या आवारात सामूहिक रीत्या तुलसीदास लिखित हनुमान चालीसा गायली. दोन दोह्यांच्या मध्ये चाळीस चौपाईया असलेली ती हनुमान चालीसा त्या मंदिरात एका सुरात गाताना शरीरामध्ये तयार झालेली ती व्हायब्रेशन्स, ती विलक्षण प्रेरणादायी मानसिकता, निरंतर आपल्या सोबत असावी, फक्त आठवायचा अवकाश आणि तीने येऊन आपल्याला त्या सामूहिक पठणानंतरच्या मानसिक स्थितीमध्ये घेऊन जावे, अशी मनोमन प्रार्थना करून आम्ही मंदिरातून बाहेर पडलो.

मंदिराच्या बाहेर संपूर्ण समूहाचा देवाच्या दारातील त्या आठवणीची साठवण म्हणून एक छान मोठ्ठाला ग्रुप फोटो काढला गेला. त्या ग्रुप फोटो पाठोपाठ आपापल्या विभागातून ग्रुप ग्रुप ने आलेल्या भाईंनी आपापले वेगवेगळे ग्रुप फोटोज काढण्याचा सपाटा सुरु केला आणि त्या सेशन बरोबरच भाईंचा तो मोठ्ठा गठ्ठा पुन्हा छोट्या छोट्या समूहांमध्ये विभागला गेला. सकाळच्या प्रहरीही विलक्षण गरमी असलेल्या तापमानात पोटात काहीतरी थंडगार ढकलून आपली तहान शमविण्याचा निर्णय आम्ही घेतला. निर्णय होतो ना होतोच तोवर समोरच्या लस्सी वाल्याचा आमच्या नजरेने वेध घेतला. देवदर्शन झाले आता चला स्वतःला लस्सीचा नैवेद्य दाखवू असे वकीलसाहेब म्हणाले अन लागलीच आम्ही उर्वरित पाचही जणांनी त्यांना अनुमोदन दिले. लस्सी वाल्याने प्युअर राजस्थानी स्टाईल मधली मातीच्या वाडग्यात फ्रिज करून ठेवलेली थंडगार लस्सी आमच्या समोर पेश केली, त्या गरमीत ती थंडगार लस्सी आम्ही साही भाईंनी एका घोटात टॉप टू बॉटम मारत पोटात ढकलली.

आदल्या दिवशी येऊन गेल्याचे कारण आणि राजस्थान भूमीवरच्या शेवटच्या दिवसाचे टाईट स्केड्युल लक्षात घेऊन फारसा वेळ न दवडता आम्ही परतीचा प्रवास सुरु करण्याच्या हिशोबाने भवन चा रस्ता धरला. या बालाजी मंदिरापासून भवनच्या दिड दोन किलोमीटरच्या पायी प्रवासात आमच्या अखंड प्रवासातील 'एपिक' किस्सा घडला.

#कॅमेऱ्याने_जोड्या_जुळ(व)ल्या

कोणत्याही मोठ्या देवस्थानचे आवार हे भीक मागून पोट भरणाऱ्यांसाठी आजघडीला क्रीम पॉईंट असतो. सालासारचे हे मंदिर याला अपवाद कसे असेल? या टप्प्यामध्ये भीक मागणाऱ्यांमध्येही आम्हाला इनोव्हेशन पाहायला मिळालं. त्या टप्प्यामध्ये विशिष्ट सेक्शन्स करून ते सेक्शन महिला भिकाऱ्यांच्या गटांनी वाटून घेतले होते. म्हणजे प्रत्येक ग्रुप ची एक मर्यादित रेंज होती. त्या ठराविक रेंज मधेच त्यांनी काय तो आपला बिझनेस करायचा. त्या पट्ट्यात ती त्याच्या क्लायंट ला पटवू शकली तर तो तिचा, रेंज च्या पलीकडे गेला की ती त्याच्याकडून भीक स्वीकारू शकत नसे. आपल्या रेंज मध्ये आलेल्या क्लायंट चा रेंज मधे आल्यापासून बाहेर जाईपर्यंत जो त्याचा पाठलाग होई तो कौतुकास्पद होता. कन्व्हिन्स, कन्फ्युज, करप्त असे मार्केटिंग चे तिन्ही पेनतरे त्या भीक मागणाऱ्या वापरत होत्या. एक विशिष्ट प्रोफेशनलपण होत त्यांच्या त्याही कामामधे!

"इत्तो गोरो छोरो तू तो बड्डा सेठ ज्यान दिखे हे" सारखे आमची छाती फुगवणारे वाक्यप्रयोग करून त्या आम्हाला त्यांना भीक देण्यासाठी प्रवृत्त करण्याचा पराकोटीचा प्रयत्न करत होत्या. बर एकाला दिले पैसे तर लगेच ज्याने दिले त्याला दुसरी येऊन चिकटत होती. चालताना डायलॉगबाजी करत पाठलाग तर अशा करत होत्या कि वाटावं जणू लग्न झालेले जोडपेच जोडीने चालले आहे. त्यात आमची वेषभूषाही फ्रेश नवरदेवांसारखीच होती. सफेद पांढऱ्या कुर्त्यावर चढवलेला भगव्या रंगाचा मंडळाने दिलेला दुपट्टा उपरण्यासारखाच वाटत होता. हा आयता समोर दिसत असलेला नजारा कॅमेऱ्यामध्ये फोटोरूपात कैद करण्याची हाव मग पाहणाऱ्याला कशी होऊ नये? मी दादांना दोन तीन अशाच जोडी लागलेल्या फ्रेम्स मध्ये टिपले आणि इकडे बिलंदर आनंदने मलाही एक जणीबरोबर तशीच जोडी दिसावी अशा फ्रेम मध्ये शूट केले.

कसे बसे त्या भिक्षुक महिला संघटनेपासून सुटका करून घेऊन आम्ही हसत खेळत भवन वर पोहचलो. रस्त्यात लागणारे खाटू शामजींचे देवस्थान करून रिटर्न फ्लाईट साठी जयपूर एअरपोर्ट गाठायचा क्रम होता. भवनवर पोहचल्या नंतर आम्ही कार्यक्रमाची सलवार कुर्त्याची वेशभूषा उतरवून पुन्हा कॅज्युअल्स अंगवस्त्रे परिधान केली. तोपर्यंत खाली आमच्या अनुपसिंगनी इंनोव्हा पार्किंग मधून बाहेर काढून निघण्यासाठी सेट केली. दोनशे सात च्या हास्याठवणी मनात ठेऊन तिला चेक आऊट चे कुलूप लाऊन, चावी काऊंटर वर जमा करून, भेटेल त्याला चला, भेटू, या साताऱ्याला म्हणत इनोव्हामधे स्थानापन्न झालो अन अनुपजींच्या सारथ्याचा लाभ घेत खाटू श्यामजीकडे मार्गस्थ झालो.

दूरपर्यंत कुठेही आडवळन दिसत नसणाऱ्या रुंदच्या रुंद डांबरी सडकेवरून आमची इनोव्हा झोकात मार्ग कापत होती. मी आणि दादा मागच्या सीट वर, सीएसाहेब, वकीलसाहेब आणि जिल्हाध्यक्ष मधल्या सीटवर तर सहसचिव ड्रॉयव्हर अनुपजींच्या डाव्या बाजूच्या फ्रंट सीट वर बसले होते. पोट धरून हसत हसतच काढलेले फोटो मोबाईल ग्यालरीज मध्ये सर्फ करायचा सेशन सुरु झाला.

वकीलसाहेबांनी आनंदने माझा त्या महिला भिक्षुकी शेजारी असताना काढलेला फोटो "दर्शनरी नवीन जोडी, भगवान रा दर्शन लेऱ वापस आवताना" अशा कॅप्शन सहीत आमच्या युवा संघटनच्या व्हाट्सऍप मंत्रिमंडळ ग्रुप वरती शेअर केला आणि एकच कल्ला उडाला.

काहीच मिनिटात मला पर्सनल व्हॅट्सऍप वरती वाईफ मितालीकडून माझा तोच जोडीवाला फोटो 'ये क्या है? कौन है आपके साथ?" अशा कॅप्शन सहित आला. मंत्रीमंडळ ग्रुप वर असलेल्या माझ्या मोठ्या भावाने, आशिषने, मजेने तो पुढे मितालीला फॉरवर्ड केला होता.

मी ही मग मज्जेत अजून मज्जा करायला बायकोच्या मेसेजचा स्क्रीनशॉट काढला आणि "वकील साहेब, 'संधिरो सोनो करो' असं काल तुम्ही मोटिव्हेशनल स्पीच मध्ये आमच्या सोबतच ऐकलं हे मान्य, पण म्हणून लगेच क्लायंट मिळवायला असले उद्योग करणं हे बरोबर नाही. हे पहा, तुमच्या असल्या पानचटपणामुळे इकडे आमचा संसार घटस्फोटाकडे जायची वेळ येऊन ठेपली आहे" अशा कॅप्शन सोबत ग्रुप वर शेअर केला. झालं, साताऱ्यातील मंत्र्यांना हसायला एकच कारण मिळालं आणि त्याचबरोबर माझ्यावर सहानुभूतीच सांत्वनही सुरु झालं.

त्यापाठोपाठ वकीलसाहेबांनी लगेच दादांचा दुसऱ्या महिला भिक्षुकीसोबत टिपलेला फोटो "सिनियर लाहोटीची जुनियर लाहोटीला खुन्नस" अशा कॅप्शन ने शेअर केला, इतका परफेक्ट टिपला गेलेल्या त्या फोटोने ग्रुप वर अजून जास्ती धिंगाणा घातला.

या सर्व क्रमावर कळस चढवणारा अजून एक फोटो वकीलसाहेबांनी शेअर केला, ज्यामध्ये दादांची नवी जुळलेली जोडी, त्या महिला भिक्षूकेच्या हातात प्रसादाचा डबा, दादांच्या आणि मागून चालणाऱ्या माझ्या चेहऱ्यावर तरल हास्य होतं. "जोडीसु प्रसाद खावताना ओरु लारे छोटो देवर, तिन्या रा चेहरामाते आनंद हे" हे कॅप्शन वरून त्या फोटोला वकिलांनी जोडलं अन आम्हा साऱ्यांचं ते योगायोगे परफ़ेकत जुळून आलेलं रसायन पाहून हसून हसून पोट दुखायला लागलं.

काल रात्रीच्या हास्यकहरानंतर हा फोटो शेअरिंग चा गाडीतच रंगलेला जवळपास अर्ध्या पाऊण तासाचा हसाहाशीचा कार्यक्रम म्हणजे लिटरली कळसच होता. एवढा कहर कि इथून पुढे अर्धा तास तरी कुणी काहीही हसू येईल असं बोलायचं नाही असं आम्हाला ठरवावं लागलं!

#वाढदिवस_वाडीकर_सरांचा

इनोव्हा खाटू शामजी देवस्थानाकडे कूच करत होती. सहसचिवांना विंडो सीट देऊन मी अनुपसिंग नी लावलेल्या राजस्थानी लोकगीतांच्या तालावर ठेका धरत फ्रंट सीट वर बसलो. आदल्या दिवशीच्या जागरणामुळे बहुतेकांनी डोळे मिटून डोक्यांना सीट्स वर रेस्ट दिली होती. मोकळया मिळालेल्या वेळाचा फायदा घेऊन मी सेल काढून वाढदिनाच्या योगे त्या दिवशीचे उत्सवमूर्ती असलेले माझे गुरुवर्य श्री संजीव वाडीकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा लिहायला घेतल्या. त्या लिहिताना फेसबुक ला मनोमन भरपूर वेळा थँक्स म्हणू वाटलं कारण त्या माध्यमा मुळेच आज ज्यांच्या मुखी नुसते आपले नाव ऐकायला जीव तरसायचा त्यांच्याशी आज मनमोकळा संवाद साधायची संधी प्राप्त झाली होती. काही वेळात ओळीला ओळ जोडत माझी रचना तयार झाली, ती पोस्ट करायच्या आधी झोपलेल्यांना उठवून त्यांना वाचूनही दाखवली. वाचून दाखवलेलं लिखाण साऱ्यांना मनापासून भावलं अन हर्षभरित अंतःकरणाने मी ते लागलीच फेसबुक वर सरांना टॅग करून पोस्टही करून टाकलं.

 
सर, समुद्र आहे मजकडे तुमच्याबद्दल लिहायला,
मला अथांग भासलंय तुमचं उभं आयुष्य त्या नजरेत न मावणाऱ्या सागरासम नाही सीमा ज्याला!

तुम्ही जगत असलेलं प्रत्येक कलांग ओहोटीच्या लाटेसम खेचून घेतं आपल्याकडे तुमच्या फॉलोवर ला,
जणू मोहिनी घालते तुमची ती वाणी अन ती लेखणी त्या भाग्यवंताला तुमचा सहवास लाभला ज्याला!

मागे वळून पहायला गेल्यास फारफार तर सहा महिन्यांसाठी लाभलं होत त्या सहवासाच भाग्य मला,
पण तेवढासाही काळ 'मोअर द्यान इनफ' होता तुमच्यातल्या कलाकारांची भुरळ दर्शन सारख्याला पडायला!

काही दिवसांपूर्वीच त्या आठवणींच स्मरण माझ्या अशाच पोस्ट च्या माध्यमातून मी केलं होतं,
त्या प्रत्येक प्रसंगाने माझ्या बारावीत जणू माझं मन कोरलं होतं!

मग ती तेव्हाची तुमची जीव तोडून शिकवायची पद्धत असो, 

तुमचा हरएक शब्दाला व्यवस्थित मान देऊन केलेला सुस्पष्ट उच्चार असो, 

तुमचे मानेवर रुळणारे दाट केस असोत, 
तुमची खिशाच्या डाव्या बाजूला पेन खोचायची सेल्फ इनोव्हेटेड स्टाईल असो,

बायो च्या विधविविध ह्यूमन सिस्टिम्स ना आपल्या आकृत्यांच्या माध्यमातून अक्षरशः सजीव करून दाखवणारी चित्रकला असो,

ती क्लासमध्ये डुलके देताना रेड ह्यांड सापडलेल्या प्रिन्सवर 'त्या पापण्या एकतर मीटा नाहीतर उघड्या ठेवा, देव ना करो जर त्या पापन्यांचा डायव्होर्स झाला तर कायमचा निद्रानाश सहन करावा लागेल' वगैरे सारख्या वाक्याचा खोचक प्रहार करून पाणउतारा करण्यास समर्थ असलेली भाषेवरची विलक्षण पकड असो,

क्लास च्या वेळेत भारताची बॅटिंग येऊ नये म्हणून 'उद्या भारताने चेसच करावं' अशी सर्वाना मनापासून प्रार्थना करायला लाऊन इच्छाशक्ती ची ताकद पटवून देणारा तुमच्यातला तत्वज्ञ असो,

ब्लड सर्क्युलेशन रिलेटेड स्टफ शिकवतानाच डास मारताना सापडलेल्या महाजणींच्या अभिषेकला ( आजचे Dr. Abhishek Mahajan) शरीरातील रक्त आणि डासाने शोषून घेतलेलं रक्त यामधील गुणोत्तर सांगताना क्लासमध्ये पिकविलेला हशा असो, 

 Ashish-Hitendraच्या फार्मा शिक्षित जोडीला 'अभ्यास करून बुद्धीला न्याय दिला असता तर डॉक्टर झाला असता आज कंपाऊंडर झालात' सारखा मारलेला खोचक टोमणा असो,

किंवा 'एस एम वाडीकर' असं स्वतःच्या नावाचं संबोधन करतानाचा सर तुमचा तो 'रुबाबदार आत्मविश्वास' असो!

अशा तुमच्याविषयीच्या कित्येक आठवणी आजही मला आणि अर्थातच माझ्यासारख्या कित्येकांच्या मनांत आपले घर करून असतील! मला कल्पना आहे मी इथं थोडं जास्त लिहिलं आहे पण मला याचीही कल्पना आहे की तुमच्याविषयी सांगायच झालं तर लिहिल एवढं कमीच आहे!! 

मला अशा आठवणींचा खजिना दिलेले, शिक्षण सेवेत कार्यरत असलेले, या सेवेच्या माध्यमातून मेडिकल क्षेत्रात कार्यरत असलेल्या असंख्य डॉक्टर्स अन फार्माहोल्डर्स शी आपली नाळ जोडलेले, सातारा पोलीटेक्निक चे आधारस्तंभ, हजरजबाबी, हरहुन्नरी शिक्षक आदरणीय श्री. संजीव वाडीकर रुपी राजासम व्यक्तिमत्वाला राजांच्या भूमीवरून वाढदिवसाच्या अरबो खरबो शुभेच्छा!

#खाटू_श्यामजी_दर्शन

पाहता पाहता शंभर एक किलोमीटर रन करून इनोव्हा खाटुश्यामजी ज्या द्वारी येऊन स्थिरावली. 'चालो श्यामजी आयग्या ' म्हणत साऱ्यांनी आळस मोडला आणि राजस्थान भूमीवरच्या शेवटच्या देवदर्शनासाठी गाडीतून पायउतार केला.

बाकी देवस्थानांच्या तुलनेत राजस्थानातील सिकार जिल्ह्यातील या खाटू गावी विराजित श्यामजींच्या देवस्थानी प्रचंड गर्दी होती. तीन ते चार मोठमोठी वळणे घेतलेली भक्तांची भलीमोठी लाईन आम्हाला दुरूनच नजरेस पडत होती. दर्शनाच्या लाईन मध्ये उभे राहायला आम्ही जवळच सोय असलेल्या पाण्याने हात धुवून घेतले. जो जास्त वेळ शांत राहील तो आनंद कसला. पाण्याने हात धुवून झाल्यानंतर अध्यक्षांनी उगाचच दोन्ही हात आभाळी उडवले अन त्यांच्या या कृतीने विरुद्ध बाजूला जाणाऱ्या महिलेच्या अंगावर पाण्याचे चार थेंब पडले. अचानक कुठून भर उन्हात पाऊस पडायला लागला म्हणून त्या महिलेने भोळ्या आश्चर्यचकित नजरेने आकाशात पाहिले अन इकडे आपण काहीच केले नाहीच्या थाटात अध्यक्ष लाईन मध्ये उभे राहायला पोहचले.

लाईन मध्ये उभे राहिल्यानंतर धीरजने खाटू शामजींची थोडी माहिती आम्हास दिली. घटोत्कचाचा पुत्र बार्बारीक याने महाभारतातील युद्धात भाग घेऊ नये म्हणून ब्राह्मण वेशात येऊन स्वयं श्रीकृष्णाने त्याचे मस्तक मागितले आणि बार्बारिकाने स्वतःचे मस्तक छाटून श्रीकृष्णाला अर्पण केले. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला त्याची 'श्याम' या नावाने पूजाअर्चा केली जाईल आणि तो भक्तांच्या इच्छाअकांक्षा पूर्ण करेल असे वरदान दिले. नंतर कलयुगामध्ये एक गाय जेव्हा या जागी उभी राहिली तेव्हा तिला फुटलेला दुधाचा पाझर काही केल्या थांबत नव्हता. पाहणाऱ्यांना अचंबा होऊन ती जागा खोदली गेली आणि तिथे बार्बारीक म्हणजेच खातूश्याम च्या पुरलेल्या मस्तकाचे अवशेष सापडले. तदनंतर तत्कालीन खाटू राजाला झालेल्या स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे त्या जागेवर हे खाटूश्यामजीचे मंदिर उभारले गेले ज्याचे आज आपण दर्शन घेणार आहोत. जय खाटूशामजिरी म्हणून धीरजने आपली अशी छोटीसी रंजक कथा संपवली अन मंदिरात पोहचण्याची आस आम्हाला लागली.

नेहमीप्रमाणे याचा असा फोटो काढ, त्याचा तसा फोटो काढ असले फाजील चाळे करत करत आम्ही लाईन मध्ये पुढे पुढे सरकत होतो. थोड्याच वेळाच्या प्रतिक्षेने आम्ही मंदिरात पोहचलो अन श्यामजींच्या मूर्तीसमोर दर्शन घेण्या उभे ठाकलो. एकामागून एक असे साही भाईंचे दर्शन झाले, मोठमोठ्ठाले खोबऱ्याचे तुकडे अन बत्तासे आम्हाला प्रसाद म्हणून मिळाले.

बाहेर येऊन एक दोन थंडगार पेये रिचवून थोडीफार खरेदी आम्ही केली. अन थोडाफार आधार मिळालेल्या पोटांना घेऊन इनोव्हा गुलाबी शहराकडे मार्गस्थ झाली.

#मजा_जेवणाची

जाता जाता रस्त्यामध्ये एका हॉटेल वर अनुपसिंगनी इनोव्हा थांबवली. दणकून भूक लागलेली असूनही ओव्हरऑल हॉटेल चा सेटप पाहून, इथे नको पुढे जरा मस्त राजस्थानी ढाच्याच्या कॉटवाल्या ढाब्यावर जेवायला थांबवा अशी विनंती अनुपसिंगना आम्ही केली अन त्यांनी ओके म्हणून अनुमतीही दिली. पण अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, तसा रस्त्यात तसा ढाबा काही दिसेना. नंतर तसा ढाबाच काय तर जेवायला हॉटेल, रेस्टो असा काहीच सोअर्स मिळेना. ढाब्यावर जेवायची हौस मोठी, चांगले जेवलो असतो का नाही थांबलो होतो तिथेच असं एकमेकांवर खापर फोडत भाईंची गाडी शेवटी जयपुरातही दाखल झाली.

आता जवळजवळ चहापाणाच्या वेळी आम्हाला जेवायला कोण देणार हा मोठा प्रश्न होता त्यामुळे जिथे दिसेल तिथे थांबू अन मिळेल ते खाऊ असा निर्णय आम्ही घेतला. सुप्रसिद्ध ऐतिहासिक अशा राजमंदिर सिनेमागृहाशेजारी आम्ही थांबलो. तिथेच बाहेर पावभाजी अन साऊथ इंडियन पदार्थांचा गाडा आमच्या नजरेस पडला. जास्त मागे पुढे न पाहता आम्ही चार पाच वेगवेगळ्या डिशेस ची ऑर्डर देऊन मोकळे झालो. ऑर्डर तयार होईपर्यंत साताऱ्याच्या उर्वरित मंत्र्यांना आम्ही पिक्चरही बघितला म्हणून सांगायला आम्ही थिएटर च्या बाहेर दोन तीन सेल्फी काढायची हौस करून घेतली. ऑर्डर प्रमाणे आलेल्या इडलीचा पहिला घास तोंडात टाकता क्षणीच आपण सपशेल गंडलो आहोत याची प्रचिती आम्हाला आली. अपेक्षेप्रमाणे इडलीप्रमाणे बाकीही आयटम्स खाणे म्हणजे जीभ आणि महत्वाचे पोटावर अत्याचार करण्यासारखेच होते. प्रारब्धाच्या संकल्पनेनुसार एखाद्या दिवशी जर उपवासच नशिबात असेल तर तुम्ही कुणीही असा, कितीही आटापिटा करा, तुम्हाला व्यवस्थित जेवण मिळतच नाही असे तत्वज्ञान कुणीतरी सांगितले आणि रिकाम्या पोटी आम्हीही खरे आहे, खरे आहे म्हणत त्याच्या संमतीत माना डोलावल्या, त्या माना डुलता डुलता मागे वळल्या अन वाळवंटात पाणी दिसल्यासारखे 'अरे हे बघ मागे केवढे मोठे हॉटेल' म्हणणाऱ्या आशयाचा ओळी त्या मान मालकांच्या तोंडून एक साथ बाहेर पडल्या!

 

 

'आपल्यापैकी कोणालाच कसे दिसले नाही' या केवळ एकाच प्रश्नाचे उत्तर स्वतःला विचारात आम्ही सारे भाई गाडा वाल्याचे बिल भागवून त्या हॉटेल कडे निघालो. खरंतर ते त्याच्या एक्सटेरिअर वरून कोणत्याच बाजूने हॉटेल वाटत नव्हते. एखाद्या लेडीज शॉपी सारखा सेटअप असलेल्या त्या हॉटेल चे इंटेरियर अल्टिमेटच होते. कहर म्हणजे तिथे केवळ हॉटेलचं नव्हते तर त्या बिल्डिंगच्याच बॅक साईड ला म्यक्डोनाल्ड्स ही होते. स्वतःला वायझेड म्हणत दादा, मी आणि इंडिया मॅक डीमधे घुसलो आणि अध्यक्ष, वकीलसाहेब आणि सीएसाहेब त्या हॉटेल मध्ये घुसले. थोड्याच वेळात साही जण मनसोक्त ढेकर्स वगैरे देत सोप चे दाणे खात खात कोणाचे किती बिल झाले म्हणत बाहेर आलो आणि आपल्या प्रारब्धात जेवण लिहले होते फक्त जरा हौस भागवून उशिरा लिहले होते म्हणत पुन्हा इनोव्हा मध्ये बसलो.

#खरेदी_कपड्यांची_अन_सातशे_रुपयांच्या_पानांची

फ्लाईटचे टायमिंग होईपर्यंत हाती काही वेळ शिल्लक होता. तो व्यतीत करायला सगळ्यात चांगला उपाय कोणता असेल या प्रश्नाच्या उत्तरादाखल कुठेतरी जाऊन थोडीफार शॉपिंग करू या उत्तरावर सारे एकमत झाले आणि एका भव्य बिल्डिंग मधल्या भव्य कापड दुकानासमोर अनुपजींनी इनोव्हाला ब्रेक मारले. योगायोगाने चहाची वेळ झालीच होती आणि बिल्डिंग समोर मस्त राजस्थानी स्टाईल चहाची टपरीही होती.

दुकानात घुसायच्या आधी चहा ढोसायचे ठरले आणि टपरीवर गोळा होऊन अध्यक्षांनी लीड घेतले. चहाची ऑर्डर देताना अध्यक्षांनी स्वतः मालक असल्यासारखे टपरीमालकाला सल्ल्यावर सल्ले द्यायला सुरुवात केली. मग त्यामध्ये दूध जादा डालो, साखर कम डालो, अद्रक का वापर करना, जरा जादा उकळना सारख्या सल्ल्यांचे अध्यक्षांनी अस्खलित हिंदीतुन पारायण चालू केले. टपरी मालकाने वैतागून, "हा भाई, सब करुंगा, बस आप वहा जाके खडे हो जाये तो बडी मेहेरबानी होगी" असा अध्यक्षांना विनंतीवजा आदेश दिला आणि पाणउतारा झालेल्या अध्यक्षांचा पडलेला चेहरा आम्ही भाईंनी हसत हसत कॅमेऱ्यात टिपून "राजस्थानच्या भूमीवर साताऱ्याच्या जिल्हाध्यक्षांचा घोर अपमान" अशा कॅप्शन ने मंत्रीमंडळाच्या ग्रुप वर झळकावला.

चहा घेऊन आम्ही समोरच्या कापड दुकानात एन्ट्री मारली. सरलेल्या आयुष्यात जवळपास सगळेच या ना त्या काळात कापडदुकानदार राहिलेले साही भाई आज एकत्र कपडे खरेदी करत होते. सर्वप्रथम अध्यक्षांनी भाभींसाठी ड्रेस पाहायला सुरुवात केली. काही वेळ खरेदीचा रंग जणू असा होता की जणू अध्यक्षांच्या लग्नाचा बस्ताच सुरु आहे.

अध्यक्षांपाठोपाठ आम्ही बाकी भाईंनीही त्यांच्या पायावर पाय टाकत थोडीफार खरेदी केली अन साऱ्यांच्या मिळून आठ दहा हजाराच्या किरकोळ खरेदीचा मान ठेऊन त्या दुकानदाराने क्वालिटी कॉफी आम्हाला पाजली. बिले भागवून पिशव्या घेऊन आम्ही बाहेर पडतो ना पडतो तोवर असा धो धो पाऊस सुरु झाला कि बोलायची सोय नाही. दुकानात घुसलो होतो तेव्हा ना आभाळ होत ना पावसाचं कसलंही नामोनिशाण! हो हो म्हणता काही वेळातच इनोव्हाचे वीस टक्के वगैरे टायर्स पाण्याखाली जातील एवढे मोठ्ठाले पाण्याचे तळे तयार झाले. उगाच आपण राहतो तिथं सोयी नाहीत, सोयी नाहीत म्हणून ओरडत असतो, इथंही काही वेगळी परिस्थिती नाही म्हणून त्या हि परिस्थितीत मनोमन खुश झालो.

संधी मिळवून आम्ही शेजारी असलेल्या एका पान शॉप मध्ये घुसलो. भन्नाट इंटेरियर, आर्टिफिशियल पाने फुले वापरून केलेला लायटिंगचा झगमगाट, कॉर्नर मध्ये केलेला बुक्स चा क्रिएटिव्ह सेटअप, ती पुस्तके वाचायला तिथेच दिलेली मस्त छोटीशी बैठक, हे सारं त्या पान शॉपचं वैभव पाहूनही आम्ही किमती न विचारता रुबाबात फोटो बिटो काढत मस्ताय मस्ताय म्हणत पाने खाऊन मोकळे झालो अन जरा चुकलोच. कारण सहा जनांच्या सात-आठ पानांचं बिल त्या भाईने थोडं थोडकं नाही तर तब्बल सातशे सहा रुपये केलं!

झालेल्या बिलावरून वाद घालायला आलेल्या अध्यक्ष आणि वकीलसाहेबांना त्या भाईने मेनू कार्ड दाखवून शांत केलं. तुझ्या एवढ्या महागड्या पानांचं मेनू कार्ड लपवून काय ठेवलंय, लाव ना त्या भिंतीवर, लेका सातशे रुपयेत आम्ही महिनाभराची पाने खातो म्हणत शॉप बाहेर पडणाऱ्या जीभ रंगवलेल्या वकीलसाहेबांपाठोपाठ आम्ही मात्र शंभर रुपयाचं पान खाल्याच्या अभिमानाने बाहेर पडलो.

 

#प्रवास_परतीचा

जेवढ्या लवकर तळ साचलं होतं तेवढ्याच लवकर ते ओसरुनही गेलं. इकडं तिकडं कुठंही न बघता आता थेट एअरपोर्ट वर घेऊन चला म्हणत इनोव्हाच्या शेवटच्या स्वारीसाठी आम्ही इनोव्हामध्ये बसलो अन काहीच मिनिटात प्यासेंजर्सच्या संख्येच्या हिशोबाने जगात भारी असलेल्या जयपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट वर दाखलही झालो. धिरजने अनुपसिंगजींचा हिशोब मिटवून त्यांच्या दिल्या सेवेबद्दल त्यांचे आभार मानले तर इकडे दादा आणि अमितजी बॅग्ज साठी ट्रॉल्या घेऊन आले. मी इकडे फेसबुक वर ट्रॅव्हलिंग ब्याक टू ग्रीन सिटी फ्रॉम पिंक सिटी चा स्टेटस तीन चार सेल्फीनची जोड देऊन अपलोड केला अन तिकडे आनंदशेठ अन वकिलांनी चेक इन च्या फॉर्म्यालिटीज पूर्ण करून आमचा मार्ग मोकळा केला.

फावल्या वेळात आनंदने जुगाड करून एअरपोर्ट लॉन्ज वरती फुकट वाले सॅन्डविच आम्हाला खाऊ घातले. होहो म्हणत फ्लाईट ची वेळ झाली आणि ट्रॅव्हल व्हॅन मध्ये बसून धिंगाणा घालत आम्ही आमच्या मुंबईच्या दिशेने झेप घेणाऱ्या हवाईजहाजाकडे कूच केली.

असे विमानात घुसळल्यानंतर जर एन्ट्री मारल्या मारल्याच आपल्या ओळखीचे कोणी दिसले तर कसले भारी वाटते याची प्रचिती आम्हाला आत गेल्या गेल्या कार्यकारणी मिटिंग साठीच आलेल्या मुंबईच्या काही भाईंचे चेहरे पाहिल्यानंतर आली. त्यांना हाय अन लगेच 'चला सोबतच उडू' म्हणून लागलीच बाय म्हणत आमच्या सीट्स शोधत पुढे आलो. डाव्या लेन मधल्या तीन पैकी अलीकडच्या दोन सीट्स वर वकीलसाहेब आणि अध्यक्ष बसले. त्यांच्या पुढे एक सीट सोडून पुढच्या सीट च्या विंडो सीट वर एका मस्त उंचपुर्या फॉरेनर कपल शेजारी त्यांनी इंडियाला बसवले. उजव्या लेन मध्ये आनंद अन वकिलांच्या सीट ला बऱ्यापैकी पॅरलल असलेल्या सीट च्या विंडो सीट चा ताबा दादांनी घेतला अन दादांच्या डावीकडे मधल्या सीट वर माझा नंबर लागला. सहावे राहिलेले सीए साहेब बरोब्बर माझ्या पुढच्या सीट वर लेफ्टमोस्ट साईड ला परदेशी हनिमून च्या हिशोबाने आखलेल्या पहिल्या टप्प्याचा प्रवास करणाऱ्या हरियाणाच्या एका नवविवाहित जोडप्याच्या शेजारी आसनस्थ झाले.

आमच्यापैकी कोणाचाच पहिला वहिला विमान प्रवास वगैरे काही नसल्यामुळे कोणाला थोड्याच वेळात सुरु झालेले एअरहॉस्टेस चे कॅसेट ऐकण्यात फारसा रस नव्हता अन त्यांना पाहून माणूस त्यांचं ऐकायला प्रवृत्तच होण्यासारखा त्यांच्या रुपामध्येही फारसा काही दम नव्हता. त्यापेक्षा आम्ही शेजाऱ्यांशी संवाद साधण्यास प्राधान्य दिले.

सालाबादप्रमाणे अजमेर ट्रिप करून आलेले माझ्या शेजारी बसलेले मुंबईचे रहिवासी असलेले साधारण चाळिशीतले गृहस्थ लोखंडाचे मोठे व्यावसायिक होते अन सपत्नीक अजमेर टूर करून आपल्या घरी परतत होते. त्यांच्याशी मी गुजगोष्टी करत होतो तोवर मागून आनंद हातातली कापसाची पुडी दाखवत मला कानात घालायला हवा असेल तर कापूस मागून घे म्हणून खुणावू लागला. मीही लगेच शेजारून गुजरणाऱ्या हॉस्टेस ला, कुड यू प्लिज ऍरेंज मी अ कॉटन प्लिज म्हणून विनंती केली आणि तिनेही शुअर लेट मी चेक म्हणून तिथून तात्पुरती एक्झिट घेतली.

माझा प्रश्न ऐकून माझ्या शेजारी बसलेल्या त्या भाईंनी मुझे नहीं लगता ओ देगी, यहां नही अलाऊ करेंगे वगैरे वाक्ये माझ्या कानात हळू आवाजात पुटपुटायला सुरुवात केली. मला काही कळायला मार्गच नव्हता की ते असं का म्हणत आहेत अन कापसाचे बोळे अलाव करायला विमान यंत्रणेचे काय जाणार आहे! तेवढ्यात हॉस्टेस छोटीशी कॉटनची बडीशोप च्या पुडी सारखी पुडी मला सुपुर्द करून गेली आणि ती पाहून भाईंनी "अच्छा कॉटन, मुझे लगा क्वॉटर!!!" अशी भन्नाट रियाक्शन दिली! मला पडलेल्या प्रशनाचे उत्तर मला मिळाले अन तो किस्सा समजलेल्या आसपासच्याना हसूच आवरेनासे झाले जेव्हा माझे कॉटन मागणे भाईंना क्वॉटर मागण्यासारखे वाटले.

इकडे तोपर्यंत फ्लाईट ने टेक ऑफ करून स्वतःला व्यवस्थित सेट केलं होतं. हॉस्टेस नी सर्व्ह केलेले कसलीही चव नसलेले मेल फुकटच असल्यामुळे आम्ही चवीने खाऊन घेतले. त्यानंतर सियेसाहेब त्यांच्या शेजारी बसलेल्या नवविवाहित जोडप्याशी हितगुज करू लागले. हरियाणाच्या चंदिगढचा मुंडा असलेला तो लेटेस्ट नवरदेव एका प्रायव्हेट स्कुलचा मालक होता. दोन पाच मिनिटाच्या संभाषणात सियेसाहेबांनी त्याला बिझनेस विषयी पाच पन्नास सल्ले दिले. हे एक्झेम्पशन, ते एक्झेम्पशन म्हणत त्याला व्यवस्थित बाटलीत उतरवून आपले कार्डही देऊन मोकळे झाले.

हसत खेळत कळलेही नाही कधी तास सरला आणि कधी फ्लाईट लँड व्हायला सुरुवात झाली. दादांना विंडो सीट च्या विंडो तुन रात्रीच्या अंधारात रोशनाईने सजलेली मुंबई नजरेस पडू लागली. महाराष्ट्राच्या राजधानीचे ते राजस रूप कसे आणि कुठे साठवू असे जणू होत होते, तीन दिवसांच्या अंतरानंतर आपल्या भूमीवर पुन्हा पाय ठेवण्याचे वेध आम्हाला लागले होते. एकच आबदार दणका देऊन सुईईईईईन करत फ्लाईट आम्हाला घेऊन जमिनीवर धावताना जाणवली अन आमची सहा जणांची टोळी हा स्वप्नवत दौरा संपवून मुंबापुरीत पोहचली!

अध्यक्षांच्या प्रायॉर म्यानेजमेंट नुसार टवेरा आम्हाला मुंबईच्या भव्य एअरपोर्ट वर रिसिव्ह करायला आलीच होती. मुंबईच्या एअरपोर्ट चा सहलीच्या शेवटच्या टप्प्याप्रमाणे आनंद घेऊन आम्ही टवेरा गाठली. फुल्ल पाऊस अन रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात आमची मुंबई टु सातारा प्रवासाला सुरुवात झाली. रात्रीत चहाचे एक दोन ब्रेक आणि पुण्यात वकिल साहेबांना ड्रॉप करण्याचे सेशन सोडले तर एका दोरीत झालेल्या प्रवासानंतर आम्ही पहाटे पहाटे साताऱ्यात पोहचलो. उतरताना दर्शा आपल्या ट्रिप वर एखादी छोटी कविता लिही म्हणून भाईंनी माझ्या डोक्यात साप सोडला आणि त्या सोडलेल्या सापाच्या कृपेने तयार झालेल्या "टुअर ए राजस्थान" या छोट्याशा प्रवासवर्णनाचा इथेच इती झाला!

- D For Darshan

Dont miss to watch and hear video version of the same below, preferably on speakers or headsets! )

Tour_A_Rajasthan(Part I)

  Facebook: https://m.facebook.com/story.php?story_fbid=10209966929089938&id=1836426167         

  YouTube : https://www.youtube.com/watch?v=fvATOaYy1qQ)

 Tour_A_Rajasthan(Part II)

  Facebook:https://m.facebook.com/story.php?story_fbid=10209966929089938&id=1836426167       

  YouTube :  https://www.youtube.com/watch?v=9rvAF4MUAA0

[

काव्यातील पात्रांची ( कार्यकारणी मध्ये ज्यांना भाई असे संबोधले जाते ) ओळख :

Amit Kasat - सतरंगी लेडीज शॉपी पोवई नाका, महाराष्ट्र राज्य बॉडीबिल्डिंग पंच, महाराष्ट्र प्रदेश सहसचिव
( इंडिया, द कोच )

Dhiraj Kasat - CA धीरज कासट असोसिएट्स ( धीरज, धीऱ्या, सीए साहेब )

Gokul Sarda - Advocate Satara Court, अखिल भारतीय सल्लागार समिती ( वकील, नानू, गोकुळ )

Anand Karva - Computer World Satara, सातारा जिल्हा समाज अध्यक्ष ( आनंद, अध्यक्ष, आनद्या )

Pankaj Lahoti - Pankaj Crations ( दादा )

Darshan Lahoti - iDealocean Technologies ( दर्शन, दर्शा )

]

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...