Close
In Travel

Shirdi Sai Baba Temple, Shirdi MH.

श्रद्धा_सबुरी
गेल्या आठवड्यात साताऱ्याहुन नेहमीच्या

महाराष्ट्र एक्सप्रेस ने सातशे किलोमीटरवरचे खानदेशातले जळगाव, 

जळगावहुन तिथल्या जळजळीत उन्हात फुल शीट्स कोंबून धावणाऱ्या लोकल वडाप ट्रॅव्हलर ने धूळ धुके वाटावी अशा कामे चालू असलेल्या रस्त्यावरून पन्नास किमीवरचे पाचोऱ्याजवळचे सासरवाडीचे गाव,

पाचोऱ्याहून दुसऱ्या दिवशी सकाळी अलॉंग वुइथ 'बायकोज फुल फॅमिली' चाळीसगाव, नांदगाव मार्गे बलेरोने एकशे साठ सत्तर किमी वरचे भक्तांची खासकरून दाक्षीणात्यांची अपार श्रद्धा असलेले शिर्डीचे देवस्थान, 
शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेऊन, मालपानीज ग्रुप ने वेट अँड जॉय पाठोपाठ केलेला साई तीर्थचा प्रोजेक्ट पाहून शिर्डीहून पुन्हा आहे त्याच मार्गाने पाचोऱ्याकडे प्रस्थान,

तिसऱ्या दिवशी तडक पहाटे उठून भडगाव, पारोळा सारखे छोटे छोटे टप्पे करत बाय कार धुळे, मालेगाव मार्गे नाशिक दोन एकशे किलोमीटर वरचे, 
नाशिकहून पिंपळगाव अन पिंपळगावहुन पुढे पुन्हा काम चालू असलेल्या कच्च्या रस्त्यावरून तीस एक किमी वरचे हळू हळू वणी वणी देवीचे,

वणी हुन पुन्हा सेम मालेगाव, धुळे मार्गे दोनशे किलोमीटर रन करून पाचोरा, 
अन चौथ्या दिवशी पाचोऱ्याहून पुन्हा आहे त्या महाराष्ट्र एक्सप्रेस ने वाईफ अन मुलगी या लाईफ्सना घेऊन बॅक टू आपला सातारा!!

असा ट्रेन, ट्रॅव्हलर, बस, कार, ऑटो अशा सर्व वाहनांनी मिळून दोन अडीच हजार किलोमीटरचा जळगाव, नाशिक जिल्ह्यांचा मस्त गच्चम प्रवासयोग आला!!

या चार दिवसांच्या भरगच्च प्रवासात सर्वात चिरंतर स्मरण राहणारा क्षण कोणता असेल तर अर्थातच ज्यासमयी साईबाबांच्या दरबारात उभे होतो तो! सोन्याच्या सिंहासनावर आसनस्थ असलेली बाबांची मूर्ती समोर दिसत होती आणि मूर्तीसोबतच अखंड समाजाला जगण्याचे सार सांगणारे त्यांचे ते दोन शब्द, श्रद्धा आणि सबुरी, नजरी पडत होते!!

शब्द वाचून आपसूकच मन बाबांच्या डोळ्यांमध्ये दडलेला त्या दोन शब्दांचा आशय उकलायचा प्रयत्न करू लागलं -

श्रद्धा, श्रद्धा म्हणजे विश्वास, श्रद्धा म्हणजे फेथ, श्रद्धा म्हणजे एक अचल, निश्चल असा सकारात्मक भाव!
मग कोणतीही गोष्ट आपल्या हातून घडताना ठेवलेली ती श्रद्धा ईश्वरावर असो,
या निसर्गाचा, या संसाराचा डोलारा नियंत्रित करणाऱ्या त्या अदृश्य शक्तीवर केलेल्या भक्तीच्या रूपातील असो,
त्या शक्तीची एक निर्मिती असणाऱ्या खुद्द आपल्या स्वतःवर आत्मविश्वासाच्या स्वरूपातील असो,
किंवा अगदीच व्यावहारिक पाहायला गेले तर आपले ज्या गोष्टीवाचून अडून बसले आहे त्या गोष्टीचा तोडगा काढणाऱ्या निर्मितीवर असो!

अशी कोणतीही गोष्ट जर निस्सीम श्रद्धाभावाने केली तर त्यातून मिळणारा आनंद,
ती गोष्ट करताना गरजेचे असणारे धैर्य,
ती गोष्ट पूर्ण करावया लागणारी कणखर मानसिकता,
या साऱ्या साऱ्या गोष्टी सदा कमाल पातळीवरच असतील,
तिथे पराभवाच्या, अपयशाच्या, काही अघटित घडण्याच्या भयाचा मागमूसही नसेल,
केलेल्या गोष्टीतून यश मिळालं तर अर्थातच यशप्राप्तीचा निस्सीम आनंद लाभेल, यदाकदाचित नाही मिळालं तरी श्रद्धाभावाने केलेल्या प्रयत्नांचं समाधान तर नक्कीच असेल!

श्रद्धेसोबत अजून एक जोडून लिहिलेला शब्द म्हणजे सबुरी!

सबुरी, सबुरी म्हणजे पेशन्स, सबुरी म्हणजे धीर, सबुरी म्हणजे गडबड, गोंधळ, हावरटपणाचा अभाव,
सबुरी म्हणजे थोडे थांबू हि सुद्धा वेळ जाईल, धीर धरू यातूनही मार्ग निघेल वाली स्वतःला समजून घेण्याची भावना,
करत असलेल्या कर्माची सुरुवात केल्यापासून ते फलास जाईपर्यंत शांतचित्ताने पाहिलेली वाट!

किती महत्वाचे आहेत केवळ हे दोन शब्द! महत्त्वाचेच काय तर संपूर्ण जगण्याचा सार ज्यामध्ये सामावला जावा अशीच ही पाच अक्षरं!

आहेच काय विश्वास आणि धीराशिवाय, करूच काय शकतो माणूस श्रद्धा ठेवून वाट पाहण्याशिवाय!

शब्द वाचत वाचतच पुढे दर्शनासाठी गडबड करणाऱ्या रांगेतल्या भाविकांना 'विनाकारण गडबड करू नका, श्रद्धा ठेवा, सबुरीने घ्या, बाबांचा आशीर्वाद साऱ्यांना मिळणार, साऱ्यांना वेळेत मिळणार' म्हणत रांगेत पुढे सरकलो अन मनामध्ये स्वतःलाच बाबांच्या दारी उभे राहून उपदेश देण्यासाठी या चार ओळी स्वतःशीच मनातल्या मनात गुणगुणलो :

श्रद्धा ठेव सबुरीने घे
मनी निरंतर विश्वासाच्या
भावाला सदा या
घर करून दे!

विश्वास ठेव स्वतःवरती
मग देवावरती श्रद्धा
सब्र कर तरुनी जाशील
जीवनातल्या स्पर्धा!

कालची चिंता आज कशाला
कशाला उद्याची फिकीर
दिवस आजचा प्रकाश समज तू
राहो बाकी सारे तिमीर!

कालचे सारे विसरून जा तू
उद्याचेही उद्याच पहा तू
या समयीच्या क्षणास राजा
सुखानंदाने भरून जग तू!

श्रद्धा ठेव सबुरीने घे
मनी निरंतर विश्वासाच्या
भावाला सदा या
घर करून दे, घर करून दे!

- D For Darshan

 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...