Close

होळीच्या शुभेच्छा

सकाळी पेठेत प्रत्येक घरासमोर होणाऱ्या छोट छोट्या होळीसमोर त्यांच्या त्यांच्या घरातल्यांच्या समवेत मोठमोठ्याने बोंबलायचो.

सकाळचा हा कार्यक्रम झाला की दुपारपासून संध्याकाळच्या नियोजित सामूहिक होळीची तयारी सुरु व्हायची.

भीमसेन च्या पारापासून ते खाली थेट पवेकरांच्या हॉटेलपर्यंतच्या पट्ट्यामध्ये जेवढी घरे आहेत त्या घरांच्या दारात आठ दहा पंधरा अशा जेवढी असतील तेवढ्या घोळक्याने गलका केला जायचा.

कोणी मजा घ्यायला जेवढे मोठ्ठ्याने येईल तेवढ्या मोठयाने बोंब ठोकायला सांगायचे तर कोणी दारात जाऊन बोंबलायला बॉ करणार तेवढ्यात ओरडून नरडे आवळायला भाग पाडायचे.

प्रत्येक घरातून तीन गोष्टींपैकी एका कोणती तरी गोष्ट मिळण्याची अपेक्षा असायची. शेणी, लाकूड किंवा किरकोळ रोख पैसे.

गोळा झालेली शेणी अन लाकूड पारावरच्या मारुती मंदिरात एक जणाची राखण ठेऊन गोळा करून ठेवले जायचे.
जमा झालेल्या रोख रकमेचा वापर अतिरिक्त लाकडे, मीठ, रॉकेल, नारळ वगैरे गोष्टी आणायला केला जायचा.

संध्याकाळच्या वेळी अर्धी पोरं पारेने खड्डा खंदायचे काम करायची तर अर्धी पोरं झाडाएवढी मोठ्ठाली एरंडाच्या झाडाची फांदी घेऊन यायची.

आणलेले झाड खणलेल्या खड्ड्यात वरच्या लाईटच्या वायरचा अंदाज घेऊन व्यवस्थित उभे केले जायचे.

गोळा केलेल्या जळणाची झाडाच्या बुंद्या भोवती शेणी, लाकूड, शेणी, लाकूड अशा विशिष्ट पद्धतीने शंकूच्या आकाराची रचना केली जायची.

रचना करताना दिवाळीतल्या किल्याला गुहा करावी तशी एका बाजूने नैवद्य ठेवायला व्यवस्थित जागा केली जायची.

होळीचा सांगाडा उभा राहिल्यानंतर वाढत्या अंधारासोबत उपस्थितांच्या साक्षीने कोणा एका वडीलधाऱ्या व्यक्तीकडून नारळ फोडून होळी पेटवली जायची.

जेवढा असेल तेवढ्या पोरांचा गलका त्या पेटत्या होळी भोवती बो बो असे मोठमोठ्याने बोंबलत गोलाकार चकरा मारायचा.

हळूहळू घराघरातून नैवेद्य आणले जायचे, नैवेद्य दाखवणारा नैवेद्य दाखवून बोंब ठोकून निघून जायचा.

थोड्या वेळाने पूर्ण जाळलेले झाड विरघळून गेल्यासारखे जमीनदोस्त व्हायचे आणि अशा रितीने होळी संपन्न व्हायची.

दुसऱ्या दिवशी सकाळी जळालेल्या राखेचे आम्हा बालगोपालांकडून परीक्षण व्हायचे, जमा झालेली चार दोन रुपयांची चिल्लर होळी फंडात जमा केली जायची अन पुढे धुळवडीच्या सुट्टीचे दिवसभराचे नियोजन केले जायचे.

तिथून पुढे वर्षभर मन पुढच्या होळीच्या दिवसाची आतुरतेने वाट पहायचे, कारण एरव्ही प्रोहीबिटेड असलेल्या बोंबलण्याच्या ऍक्टिव्हिटीचे फक्त त्याच दिवशी वन डे एक्सपायरीचे लायसन्स असायचे.

सॉलिड निरागस असायची त्या वयातली होळी! आणायचीय मला तीच निरागसता याही वयात तशीच होळी करताना!!

- D For Darshan

 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...