Close
In Travel

वेडिंग_ऍनिव्हर्सरीची_हवा_डेस्टिनेशन_गोवा ⯑

परवाच्या एकोणीस पाच एकोणीस या परफेक्त योगायोग जुळून आलेल्या दिवशी विवाह बंधनाचा बरोब्बर पाचवा वाढदिवस झाला.

या दिवशी मला नाव वगैरे घ्यायला कोणी आग्रह धरला असता तर,

"आजच्या तारखेत डावीकडे एकोणीस, उजवीकडे एकोणीस, मध्ये बरोबर पाच
पाच वर्षापूर्वीच मितालीने वाईफ म्हणून लाईफ मध्ये एन्ट्री करण्याचा सुवर्णयोग होता तो हाच!"

असं काहीतरी कडक नाव घ्यायला मिळालं असतं! श्या, पण नाहीच कोणी विचारलं!

पहिल्या ऍनिव्हर्सरीला काही विचित्र कारणामुळे मी एकटाच म्हैसूर मध्ये आणि वाईफ साताऱ्यात होती. दुसऱ्या ऍनिव्हर्सरीला दोघे महाबळेश्वर, तिसऱ्या ऍनिव्हर्सरीला लोणावळा, चौथ्या ऍनिव्हर्सरीला साताऱ्यातला सातारा असा क्रम झाल्यानंतर या लेटेस्ट वाल्या पाचव्या ऍनिव्हर्सरीला मेव्हण्या सोबत गोव्याला जायचा योग आला.

गोव्याला जायचा निर्णय झाला तेव्हा काही माहितगार आप्तेष्टांकडून या दिवसात गोव्याला जाण्यात काय पॉंईंट नाही, पोळून याल, फॅमिली सोबत गोव्याला जाण्यात शहाणपण नाही वगैरे सारखी मते ऐकायला मिळाली होती. पण यॅक्चुअल गोव्याला जाऊन आल्यानंतर त्या गोष्टी मोस्टली अंधश्रद्धाच असल्यासारख्या वाटल्या. गोव्या सारख्या ठिकाणी कधीही जा, कोणासोबतही जा, गोवा गो(वाह!)च आहे! हां खरं होती थोडी गरमी अन पर्यटकांची अल्पसंख्या पण त्यामुळे गोअन भूमीवर असल्याच्या एकसाइटमेन्ट मध्ये कुठेच उणेपणा जाणवला नाही हे नक्की!

जाताना गोवा म्हणजे आपल्या सख्या आत्याचे सख्खे रहाते गाव असलेले आशिषसर गणपुले, आपली हॉटेल मॅनेजमेंट ची आख्खी पदवी गोव्यातून घेतलेले सोमनाथशेठ परदेशी, गोवा आपली सासरवाडी असलेले आमचे मामेबंधु पवनसर मालपाणी आणि वरचेवर गोव्याला भटकंतीला जाणारे फीन आय क्यू चे मॅनेजर वैभवसर न्याती यांचे प्रॉपर मार्गदर्शन घेऊन गेल्यामुळे अखंड टुर कशी आल्हाददायक अन सुखकर झाली.

सतरा तारखेच्या रात्री पुण्याहून आपकी आयटेन घेऊन सातारा मुक्कामी आलेला मेव्हणा सुयोग, त्याची वाईफ मनाली अन दीड वर्षाचा श्लोक आणि उत्सवमूर्ती आम्ही दोघे असे पाच जण अठरा तारखेच्या सकाळी साडे सात च्या दरम्यान गोव्याकडे निघालो. पेठ नाक्यावर माणिकंडनला मस्त साऊथ इंडियन डोसा उताप्प्याचा नाष्टा केला. सरळ हायवेने बेळगाव मार्गे जावे का आजरा आंबोली मार्गे गोवा गाठावे हा कन्फ्युजन चा प्रश्न होता. सकाळी आंबोळी खाल्ली होती म्हणून आंबोलीचा पर्याय योग्य समजून गाडी पुणे बेंगलोर हायवे सोडून सावंतवाडी फाट्यावरून उजवीकडे वळली. तशी ढीगभर स्पीड ब्रेकर असलेल्या वन वे रस्त्यावरून गाडीची गती मंदावली. कुठे आईस्क्रीम खा, कुठे ऊसाचा रस पी, कुठे आंबे घे करत नेव्हिगेशन डेस्टिनेशन वर नॉर्थ गोव्यातील व्हॅग्याटोर बीच लावून आम्ही निवांतपणे गोव्याच्या दिशेने कुच करत होतो. हळू हळू घाट संपला अन गोवा कोकणची लाल माती दिसू लागली तशी दुपारच्या जेवणाचीही वेळ झाली. हायवेला लागताच डावीकडे निवी निक्की नावाचे घरगुती टाइप प्युअर व्हेज हॉटेल नजरेस पडले अन आम्ही लागलीच जेऊन घ्यायचे ठरवले. निवी निक्की च्या मावशींनी सुंदर जेवण दिले अन गोव्यात जाऊन चांगले व्हेज जेवण मिळण्याच्या पहिल्या परीक्षेत पास झाल्यासारखे वाटले.

व्हॅगोटॉर_बीच_नॉर्थ_गोवा

आता गोअन भूमी अगदीच समीप यायला लागली होती. ऑफ सिझन असल्यामुळे विकेंड असूनही आम्ही बुकिंग वगैरे करून जाण्याचा फारसा लोड घेतला नव्हता. गोव्यात पोहचल्यानंतर दोन-तीन रिसॉर्ट्स पाहून आम्ही रामातन रेसॉर्ट सारख्या बऱ्यापैकी रेसॉर्ट मध्ये 3500/- रुपीज पर रूम च्या हिशोबाने दुपारी 2 वाजता चेक इन आणि दुसऱ्या दिवशी 12 वाजता चेकआउट अशा कंडिशन्स असलेल्या स्विमिंग पूल व्हीव वाल्या दोन डिलक्स रूम्स बुक केल्या. चेक इन अन चेंज करून आम्ही बरोब्बर सनसेट च्या वेळी वेस्टर्न फील देणाऱ्या व्हॅगोटॉर बीच च्या समुद्रकिनाऱ्यावर पोहचलो.

मावळत्या सूर्याच्या किरणांनी चमकणारं ते अथांग समुद्राच निळं पाणी, त्या पाण्यामध्ये घुसू पाहणारी मगरीच्या आकाराची दगडाची मोठ्ठाली टेकडी, त्या टेकडीवर फोटोसेशन करत विकेंड चा आनंद लुटायला आलेलं रंगबिरंगी क्राऊड, गोवा आणि कोकणच्या समुद्र किनाऱ्यांमधील बहुदा महत्वाचा फरक असलेले अधून मधून नजरेस पडणारे तोकड्या कपड्यातले फॉरेनर्स अन ओव्हरऑलच गोव्यातल्या शनिवारच्या त्या चकचकीत सायंकाळचं सोनेरी झगमगीत रूप पहाताक्षणी मनामध्ये घर करून गेलं.

डिनर_याट_बन्यांन्स

काळाकुट्ट अंधार पडेपर्यंत मस्त दोन अडीच तास समुद्रकिनाऱ्यावर टाईम स्पेंट केल्यानंतर आता डिनरची चाहूल लागली. रुम वरती जाऊन पुन्हा चेंज करून आम्ही त्याच एरियातील फेमस अशा दि बन्यान्स रेस्टो मध्ये जेवायला गेलो. नावाप्रमाणेच भव्य वडाच्या छताखाली स्थित असलेल्या त्या रेस्टोचा ऍम्बियन्स हटकेच होता. नंतर दिलेलं प्युअर व्हेज फूड, खासकरून स्टार्टर्स ही उत्तम होते. जेवण करता करताच रात्रीचे बारा वाजले आणि आमच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाले. जेवण करून रेस्टोच्या गेटवर मिळणाऱ्या क्वालिटी लाईट मध्ये ब्लॅक कलरचा किंग - क्वीन वाल्या ट्रेंड चा कॉम्बिनेशन कॉस्च्युम केलेल्या आम्ही उत्सवमूर्ती जोडीने मस्त फोटोशूट करून घेतले.

पब_एलपिके

गोव्यात येऊन गोव्यात आल्यासारखं काहीतरी केलं पाहिजे असा विचार करून रात्री साडे बारा वाजता गोअन नाईट लाईफ अनुभवण्यासाठी आम्ही व्हॅग्याटॉर पासून पाच-सहा किलोमीटर वरच्या गोव्यातील वेल फेमस क्लब एलपीके मध्ये गेलो. 1500 रुपये कपल एन्ट्री अन कपल कंपल्शन असलेल्या त्या नदीकिनारी स्थित लव्ह पॅशन कर्मा चं अंतर्बाह्य सौंदर्य अद्भुतच होतं.

रात्री झोपायला उशीर झाल्यामुळे अर्थातच एकोणीसच्या सकाळी उठायला उशीर झाला. त्यामुळे व्हॅगाटॉरच्या सागरात समुद्रस्नान घेण्याचा स्केड्युल्ड प्रोजेक्ट बारगळला. त्याऐवजी नाष्टा करून तिथेच रिझॉर्टमध्ये स्विमिंग पूल मध्ये टाईमपास करण्याचा निर्णय आम्ही घेतला. तो घेतलेला निर्णय अगदी चोख ठरला. पूल मध्ये फुल्ल मजा आली, इतकी की कळलेही नाही कधी चेकआउट ची वेळ झाली. तिथून निघून पुढे साऊथ गोवाही गाठायचे होते सो फटाफट आवरून रामातन मधून आम्ही बाहेर पडलो. नेव्हिगेशन डेस्टिनेशन आता प्यालोलेम बीच साऊथ गोवा होते, आहे त्या जागेपासून जवळपास 84 किलोमीटर!

प्यालोलेम_बीच_साऊथ_गोवा

अतिशय निसर्गरम्य अशा रस्त्यावरून नॉर्थ गोवा टू साऊथ गोवा प्रवास सुरु झाला. जेवणाव्यतिरिक्त मध्ये कुठेही न थांबत आजूबाजूच्या गोव्याच्या रुपाला नजरेत भरत आम्ही प्यालोलेम च्या दिशेने प्रवास केला. साधारण चार साड़े चारच्या दरम्यान प्यालोलेम बीच वाल्या क्यानाकोना सिटी मध्ये पोहचलो. पोहचल्यानंतर बीचपासून पायी पाच मिनिटाच्या अंतरावर वगैरे असणाऱ्या प्यालोलेम क्लब या क्वालिटी कॉटेजेस मध्ये पंधराशे रुपये पर रूम च्या हिशोबाने आम्ही दोन रूम्स बुक केल्या. नारळाच्या झाडांनी वेढलेल्या कम्प्लिट गोअन फील देणाऱ्या त्या कॉटेज मधल्या भव्य बाथरूम वाल्या एसी रूम्स भारीच वाटल्या. रूम्सचा ताबा घेऊन आम्ही पटकन प्यालोलेमचा मेन बीच गाठला. यावेळी नजरेसमोर साऊथ गोव्यातला अरबी होता. समुद्र तोच पण नॉर्थ च्या तुलनेत याच पाणी कितीतरी अंशी स्वच्छ होतं. जणू त्याने निळी शाई वगैरे पिली आहे असं हनि सिंगच्या गाण्यातल्या पाण्यासारखं पाणी वाटत होतं ते! सॅण्डही चकचकीत सोनेरी, सुळसुळीत, कसलीही कच कच नसेल अशी! या बीच चे वैशिष्ट्य म्हणजे इथे बोटिंग, कायाकिंग सारखे ऑप्शन्स अव्हेलेबल होते. ऑफ सिझन मुळे कायाकिंग बंद होतं पण बोटिंग मात्र चालू होतं. बीच वर पोचता क्षणीच आम्हाला एकाने गाठून २८०० रुपये मध्ये चौघांना एका तासाची बोटची सफर करून आणण्याची ऑफर दिली. त्यामध्ये तो हनिमून बीच वाला आयर्ल्यांड, बटरफ्लाय बीच वाला आयर्ल्यांड अँड मंकी बीच वाला आयर्ल्यांड असे काहीतरी तीन आयर्ल्यांड दाखवणार होता. वेळ जवळपास साड़े सहा ची असल्या कारणाने थोड्याच वेळात अंधार पडायला सुरुवात होणार होती त्यामुळे फारशी घासाघीस करण्यात काही पॉईंट नव्हता. क्षणात त्याला डन सांगून मोठ्या कसरतीने गाडीसाठी पार्किंग मिळवलेला सुयोग आल्यानंतर आम्ही लाईफ जॅकेट्स घालून बोटीमध्ये चढलो.

हनिमून_बीच

आम्ही पाच जण आणि अजून एक दिल्लीचे कपल अशा सात जणांना घेऊन ती मोटरबोट समुद्राच्या लाटा कापत वेगाने आत घुसू लागली. मधेच एखादी मोठी लाट आली तर ती वरती उडत होती अन आमच्या काळजाचा ठोका चुकवीत होती. थोड्या थोड्या वेळाने पाण्याचे तुषार आमच्या अंगावर उडत होते, उडलेले समुद्राचे ते खारे पाणी अंगाला थोडीफार खाजही आणत होते. थोड्याच वेळात कहो ना प्यार है ची आठवण करून देणारे डेस्टिनेशन म्हणजेच हनिमून बीच वाले आयर्लंड नजरकक्षेत येऊ लागले अन दुरूनच तिथे पोहचण्याची एकसाइटमेंट वाढवू लागले. सर्व बाजूंनी समुद्र अन मधेच मोठमोठाले खडक असलेले ते बेट म्हणजे निसर्गाविष्कारच होता. उतरल्या उतरल्या कोणती पोज देऊ, कोणाचा अन कसा फोटो काढू असं होऊ लागलं. ते अवघ निसर्गसौंदर्य पाहून खरोखर डोळ्यांचं पारणं फिटलं. ऍनिव्हर्सरी दिवशी अशा अँटिक जागी असण्याच्या भावनेनं आतल्या आत क्वालिटीच वाटलं!

मोटरबोट आयर्लन्ड वर दहा पंधरा मिनीट थांबली. पहाता पहाता अंधार पडू लागला आणि बोटवाल्यांनी बोट भरायची गडबड सुरु केली. थोड्याशा मिसिंग वाल्या भावनेने नाईलाजानेच आम्ही बोट मध्ये चढलो. परतीच्या अंधारातल्या प्रवासात बोटाच्या नाविकांशी थोड्या गप्पा टप्पा झाल्या. त्यांच्या कडून समजले की आत्ता दर्या थोडा शांत आहे म्हणून असे बोटिंग वगैरे शक्य आहे. आता इथून बोटींग सिझन बंद होणार तो ऑक्टोबर च्या एक तारखेलाच सुरु होणार. पावसाळ्यामध्ये मच्छी वाल्या बोटींनाही दोन एक महिने सुट्टी असते. साधारण दहा ऑगस्ट च्या आसपास मच्छी वाल्या बोटी पुर्वतत सुरु होतात. यांदरम्यान जर कोणी स्वतःच्या हिमतीवर बोट वगैरे घेऊन समुद्रात गेलं आणि दुर्दैवाने काही अपघात वगैरे झाला तर त्याची जबाबदारी सरकार घेत नाही. त्याच्या बोलण्यातून साऊथ गोवा विषयी त्याचा असलेला सार्थ अभिमान झळकत होता. नॉर्थ गोवाच्या तुलनेत कमी क्राऊडी असल्याकारणाने साऊथ गोव्याच्या समुद्राचे पाणी, समुद्रकिनारे आणि ओव्हरॉल वातावरण कमालीचे स्वच्छ अन फ्रेश होते. गप्पांच्या ओघात पुन्हा प्यालोलेम चा किनारा आला. दिल्ली वाल्या कपलने आम्हाला आमचा एक छान ग्रुप फोटो क्लिक करून दिला. छोटीशी समुंदर सफर करून आलेल्या फ्रेश मुड्स नी आम्ही लोकांनी बोटवाल्याचे आभारप्रदर्शन करून बोटीतून पायउतार केला.

त्या रात्रीचे बीच च्या जवळील हॉटेल मध्ये केलेले जेवण मात्र आमचे कहर गंडले. एक तर आयर्लंड वरच्या त्या मोठमोठाल्या दगडांवरून इकडून तिकडून उड्या मारून भूक लागलेली असल्यामुळे आत गेल्या गेल्या हावरट सारखी आम्ही संपूर्ण जेवणाची एकत्र ऑर्डर देऊन बसलो. स्टार्टर मध्ये आलेला चिंचेच्या पाण्यासारखा लागणारा मंच्याव सूप अन टेस्ट केल्यानंतर चेहराही पाहायची इच्छा न व्हावी अशा मेव्हण्याच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन्स पाहून मी टेस्टही न केलेला टॉम्याटो सूप यावरूनच एकंदर काय जेवण मिळणार आहे याची आम्हाला प्रचिती येऊन गेली. अपेक्षेप्रमाणे नंतर आलेल्या डिशेस ही गंडलेल्याच होत्या. इथून पुढे आधी एखादी डिश टेस्ट केल्याशिवाय पुढची ऑर्डर द्यायची नाही असा कानाला खडा आम्ही लावला. बाहेर येऊन कॉरन्याटो, कसाटा, आईस्क्रीम्स वगैरे खाऊन थोड्या रिकाम्या राहिलेल्या पोटाचा खळगा भरला.

तिथून कॉटेज वर आल्यानंतर आम्ही मस्त रात्री दीड एक वाजेपर्यंत दमशेराज खेळलो. दमशेराज सारखा दमदार खेळ कधीही कोठेही कोणासोबतही खेळा, निखळ मनोरंजन होतच होतं! त्यात अरविंद देसाई की अजीब दास्तान, सांस बहू और सेन्सेक्स सारखे अँटिक नावाचे पिच्चर ऍक्टिंग करून दाखवायचे अन ओळखायचे असतील तर बसच!

क्रीम_सेशन

अखंड गोवा ट्रिप चा क्रीम सेशन कोणता राहिला असेल तर वीस तारखेच्या सकाळी उठून टोस्ट ब्रेड चा नाष्टा वगैरे करून कॉटेज पासून पायी पाच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या बीच वर स्पेन्ड केलेले पुढचे चार तास! इन मीन पंचवीस तीस जण असलेल्या त्या बीच वर फुल ऑन प्रायव्हसी होती. जाताना मोबाईल, कॅमेरा वगैरे ऍब्सोल्युट काही न नेल्यामुळे ना कशाचा फोटो काढायचा होता ना काही शूट करायचे होते. फक्त अन फक्त समुद्राचा तो गोल्डन सॅन्ड वाला किनारा, तापत चाललेल्या सूर्यदेवामुळे ताप भरलेल्या त्या किनाऱ्याची आपल्या बाहेर येणाऱ्या अनंत लाटांनी तहान भागवणारं अन किनाऱ्याला एक विशिष्ट पद्धतीचा उतार असल्यामुळे आत जाताना शरीराला घड्याळाच्या काट्याप्रमाणे गोलाकार फिरवणारं ते समुद्राचं निळशार खारं पाणी हे सारं अप्रूप मनमुराद अनुभवायचं होते.

का कोणास ठाऊक, अशा अथांग समुद्राकडे कधीही पाहिले की त्याला आपल्याला काहीतरी सांगायचे आहे, त्याला आपल्याशी काहीतरी संवाद सादायचा आहे, असेच वाटून जाते. अनगीनत सजीव जलचर जीवांना आजन्म आसरा देणारा, एक सारखी संतत हालचाल करणारा, सिंहाने डरकाळ्या फोडाव्या तसे मोठमोठाले आवाज काढणारा, लहरीनुसार कालानुरूप आपला स्वभाव बदलणारा, कदाचित फक्त प्रजनन करू न शकत असल्याने निर्जीव समजला जाणारा तो समुद्र अन त्याचे ते एकंदर विराट रूप पाहून आपला जीव अन त्या जिवाच्या यातना वगैरे अगदीच चिल्लर असल्यासारखे वाटू लागते.

समुद्रात लाटांवर खेळताना ठराविक अंतराने येणाऱ्या कमी जास्त उंचीच्या लाटा या रुटीन आयुष्यात येणाऱ्या आव्हानांचं तत्वज्ञान सांगत असल्यासारख्याच भासतात. आपण व्यवस्थित अंदाज घेतला तर बहुतांशी वेळा दुरूनच ओळखू शकतो की येणारी लाट किती उंचीची आहे आणी ती सहज विनाकष्टे पास व्हावी यासाठी काय पूर्वतयारी गरजेची आहे. व्यवस्थित अंदाज घेऊन तयारी केली तर त्या आलेल्या लाटेतून सुद्धा भरपूर आनंद मिळवता येतो, अन बेफिकीर राहून काहीच हातपाय हलविले नाहीत तर ती लाट आपल्याला बुचकळ्यात आणायची ताकद सोबत घेऊन येते. आव्हानांचंही अगदी तसंच असतं!

समुद्राच्या बाहेर जिथपर्यंत आपल्या पायाला पाणी सुद्धा लागणार नाही एवढ्या अंतरावर उभं राहून समुद्र पाहणं म्हणजे काहीच कर्तृत्व न करण्यासारखा आहे. माणूस काही करतच नसेल तर त्याच्यासमोर कसलं आव्हान उभं राहणार?

समुद्रात गेल्यानंतर एका ठराविक अंतरावर आपल्या उंचीनुसार अशी जागा असते जिथे समुद्राच्या लाटा आपल्याला रपारप फटके मारतात. आयुष्यात बऱ्याच वेळा आपले सेम असे होऊन जाते जिथे पोहचून आपण बाहेर किंवा मागे यायचे स्वतःला पटवू शकत नाही पण त्या लेव्हल च्या पुढं जाण्याचंही डेरिंग दाखवत नाही. मग बसतो असेच लाटांसारखे फटके खात! असे फटके खाताना मजाही येत असते अन करून घेतला तर त्रासही होत असतो!

आता समुद्रात त्या ठराविक अंतराच्या पुढे काही ठराविक अंतरावर असाही टप्पा येतो जिथे जाऊन उभे राहिले तर आलेली लाट अगदी आबदार पुढे जाते. तिथे जाऊन उभे राहण्यासाठी आपल्याकडे थोडे जास्त डेरिंग असावे लागते अन गरज पडली तर वेळीच ऍडजस्टमेंट करण्याचा अंदाज! पुन्हा आयुष्यातल्या आव्हानांचही असच! थोडे जास्त प्रयत्न, थोडी जास्त ज्ञानसाधना आणि थोडी जास्त रिस्क घेण्याची तयारी दाखवली तर आपण अशा सतत फटके खायला भाग पाडणाऱ्या आव्हानांच्या परे जाऊ शकतो. अर्थातच त्या जागीही मोठी, कदाचित जास्त ताकदीची आव्हाने येत राहतात पण त्यांची फ्रिक्वेन्सी नक्कीच कमी असते अन तसे केले तर सो कॉल्ड आपली कर्तृत्वाचा आलेख चढा!

त्या समुद्रात आम्ही अगदी मनसोक्त खेळलो, किनाऱ्यावर उलटे पालटे झोपलो, पाण्याबरोबर भुईचक्रासारखे फिरलो, रेतीच्या चिखलाने नखशिखान्त भरलो, समुद्राच्या पाण्यातून किनाऱ्याला प्यारलाल दूर पर्यंत बीच वाक म्हणून पायी रपेट मारून पुन्हा आहे त्या ठिकाणी आलो! ऊन वाढत होते तसे वर्षभरात बहुतांश कालावधी साठी सुर्यप्रकाशापासून वंचीत राहणाऱ्या फॉरेनर्सची टॅन होण्यासाठी सनबाथ घ्यायला बीचवर येण्याची संख्या हळू हळू वाढू लागली होती. समुद्राच्या पाण्याने ओल्या झालेल्या रेतीतून जेव्हा सुर्यासमोर उघड्या पडलेल्या कोरड्या रेतीवर पाय पडला तेव्हा कुठे वेळ आणि उन्हाचा अंदाज आला. तसंच ओल्या शरीरांनी आम्ही रूमवर आलो, बाहेरच गार्डन मध्ये सोय करून ठेवलेल्या शॉवर खाली न्हालो. आवरून चेकआउट करून प्यालॉलेम मधल्याच मोल्लूज क्लासिक या रेस्टोरन्ट मध्ये यावेळी क्वालिटी व्हेज जेवण जेवलो. नेव्हिगेशन वरती बेळगाव मार्गे सातारा टाकून पुन्हा गोव्याला कधी यायचं हा विचार करत परतीच्या प्रवासाला लागलो!

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...