Close

बेंदूर सणाच्या शुभेच्छा

बेंदूर!!
लहानपणी सॉलिड वाट पहायचो या सणाची!

हा सण म्हणजे नागपंचमी, रक्षाबंधन, गणपती, दुर्गादेवी, दिवाळी वगैरे सारख्या साऱ्या सणांची सुरुवात वाटायचा!
पाऊस सुरु झाल्यानंतर शेतीच्या विविध कामांमध्ये बळीराजासोबत शेतांमध्ये राब राब राबणाऱ्या बैलांना या दिवशी बळीराजा विश्रांती द्यायचा!
नुसतीच विश्रांती नाही तर, त्याची स्वच्छ अंघोळ, त्याच्या शिंगांची बहुदा अखंड शरीराची रंगरंगोटी, त्याला झगमगीत झुलीचा पेहराव वगैरे करून त्याला या सणासाठी तयार केले जायचे!
दिवसाच्या सुरुवातीला त्याला पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे दाखवला जायचा!
अन त्याची गावभरातून बँड, बाजा, गुलाल, फटाके वगैरेंच्या साथीने भव्य मिरवणूक काढली जायची!

शाळेत असताना, शाळेत म्हणजे अगदी तिसरी चौथीत, वर्गमित्रांपैकी ज्यांच्या घरी खरेखुरे बैल आहेत ते प्रचंड उत्साहाने आदल्या दिवशी बेंदराच्या दिवशी ते काय काय करणार याचे रसभरीत वर्णन करायचे. ते ऐकून आपल्या घरी बैल नसल्याची उणीव जाणवायची. ती उणीव आम्ही कुंभारवाड्यातुन मातीचे बैल आणून त्यांच्या सोबत अखंड दिवस व्यतीत करून दूर करायचो. जेव्हा बैलांची मिरवणूक येणार त्याआधी आम्ही आमच्या मातीच्या बैलांची मांडणी घरासमोर एखाद्या टेबलवर वगैरे करायचो. अर्थातच त्यांसोबत फुगे, जिलेटीन च्या माळा, शिंगामध्ये कडगुळे अशी मस्त सजावट करून मिरवणूक येण्याच्या वाटेवर नजरा लावून बसायचो. खऱ्याखुऱ्या बैलांच्या दिवसभराच्या मिरवणूका आटोपल्यानंतर आता आमच्या मातीच्या बैलांची आम्ही छोटीशी मिरवणूक काढायचो अन दिवसाच्या शेवटी ते मातीचे बैल पुढल्या वर्षी साठी व्यवस्थित ठिकाणी ठेऊन द्यायचो.

थोडे मोठे झाल्यानंतर या परंपरेमध्ये बुजुर्गांच्या मार्गदर्शनातून अजून एका सॉलिड इंटरेस्टिंग गोष्टीची भर पडली होती ती गोष्ट म्हणजे फट्ट्या गुडगुड्या!!

जमिनीत एक छोटा खड्डा काढून, आतून मातीचे गाडगे वापरून त्यावर माती थापून एका ढोल्या शेठजी सारखा दिसणारा अन छोटा पुतळा आम्ही बनवायचो. त्या बनवलेल्या पुतळ्याच्या तोंडात बिडी सारखी वाटावी अशी जाड पुठ्ठयाची पोकळ रीळ लावायचो. पुतळ्याच्या खालच्या खड्ड्यात आग लावल्यानंतर आलेला धूर त्या रीळ वजा बिडीमधून बाहेर पडला पाहिजे जेणेकरून तो मातीचा फट्ट्या गुडगुड्या बिडी ओढतोय असे वाटावे अशा रीतीचे ते एकंदरीत इंजिनियरिंग असायचे. मग त्याचा असा सेटप झाल्यानंतर पुढचा अख्खा दिवस त्याच्या निगराणीत जायचा, बैलांच्या मिरवणुकीसोबत आता हा नॉनस्टॉप धूर काढत बिडी ओढणारा फटट्याही आकर्षण बनून जायचा!

क्वालिटीच असायचा बेंदूर सणाचा दिवस! सणाचे दिवस जगावेत ते गावांमध्येच!!

आता पोळा येतो आणि आम्ही एकमेकांना ते बैल झाल्याची जाणीव करून द्यायला पोळ्याच्या शुभेच्छा देतो! शुभेच्छा देताना किंवा स्वीकारताना स्वतःला बैल समजण्यात कमीपणा वगैरे वाटायचा काही विषयच नसतो उलट एक वेगळाच अभिमान असतो!

असो, तर यायोगे निमित्ताने तमाम शेतकरी बांधव अन मित्रबांधवांना बेंदूर सणाच्या बहारदार शुभेच्छा!!

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...