Close
In Travel

अनुभव वारीचा सवंगड्यांचा

अनुभव_वारीचा_सवंगड्यांचा

"वसा वारीचा घेतला पावलांनी..." वाली अजय अतुलच्या माऊली माऊली गाण्याची परीस्थितीशी समर्पक लाईन गुणगुणत असताना अचानक सचिन शेटेंच्या आर्टीगाच्या मागे चाललेली क्रेटा कच्च्या छोट्या रस्त्यातुन शॉर्ट कटच्या हिशोबाने मार्ग काढायचा प्रयत्न करू लागली अन माझी वाणी,

"आहो मॅनेजर शेटे
हौस आमची फिटे
चालला कोणत्या वाटे
पहा किती हे रस्ते छोटे
एवढासा रस्ता त्यात दगडगोटे
कशाला फोडताय सरळ रस्त्याला फाटे
घेतलेत ना समझुन अडकण्याचे तोटे..."

गमतीने अशी काहीतरी टे ची भाषा बोलू लागली! पण तेवढ्यात ती निमुळती एकेरी वाट संपली अन आर्टीगाच्या मागोमाग आमची क्रेटा विडणीच्या अलीकडच्या एका वस्तीतील मोकळ्या स्पेस मध्ये स्थिरावली.

दोन्ही गाड्यांचे आठही दरवाजे आबदार उघडले अन एक दोन अपवाद सोडले तर पांढरे शुभ्र तलम धोतर, वरती तीन बटनी शर्ट, डोक्यावर स्वच्छ धवल गांधी टोपी, गळ्यामध्ये माणिमाळ अन टाळ अशी नखशिखान्त वारकरी वेषभूषा केलेले एक डझन सवंगडी पंढरीनाथ महाराज की जय म्हणत गाड्यांतून बाहेर आले. साध्य होते त्या पालखी निवासापासून वारीमध्ये सामील होऊन बरड पर्यंत पायी चालत जाण्याचे! पंढरीच्या ओढीने, विठू माऊलीच्या भेटीच्या आसक्तीने श्री क्षेत्र पंढरपूर कडे चाललेल्या त्या लक्षावधी पावलांबरोबर चालण्याचा, त्या वैष्णवांच्या अद्भुत मेळ्याने तयार झालेल्या भक्तिमय आनंदघनाचा भाग होण्याचा अवीस्मरणनीय अनुभव घेण्याचे!

माथी गंधटीळे लाऊन आमच्या त्या साध्याच्या सिद्धतेची सुरुवात झाली. दोन्ही बाजूला नजर पोहचेल तिथपर्यंत भाविक दिसणाऱ्या वारकऱ्यांसोबत चालायला केलेली ती सुरुवात केवळ स्वप्नवत होती. विविध भागांतून आलेल्या अडीचशेवर दिंड्यांच्या उपसंचांतुन धवल पांढऱ्या रंगाने एकसंग झालेला तो भव्य संच, त्या संचाचा भाग असलेल्या हरएक भाविकाची चालतानाची शिस्त, टाळ मृदूनगाच्या गजरात प्रत्येक दिंडीचा अभंग वा जपातून सुरु असलेला विठ्ठल नामाचा जयघोष, आभाळमय वातावरणात आकाशाकडे तोंड करून पुढे सरकणाऱ्या वारकऱ्यांच्या हातातील ते भगवे ध्वज, स्त्री वारकऱ्यांच्या माथी दिसणाऱ्या त्या तुळशीच्या कुंड्या, एकूणच देवाच्या ओढीने चाललेल्या अवघ्या महाराष्ट्राची ओळख असलेली, गेल्या सात आठशे वर्षांची परंपरा जपणारी, त्या वैष्णवांची ती वारी म्हणजे एक विष्णूमय जगच भासत होती!

त्या विडणीमध्ये जिथे आम्ही गाड्या लावल्या तिथुन बस काही अंतरावर, थोड्या वेळा पूर्वी फलटण सोडलेल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा विसावा होता. आमच्या दिवसाची सुरुवात कसलीही गडबड नसलेल्या ठिकाणी माऊलींच्या तृप्त, सुखद दर्शनाने झाली. माऊलींच्या पालखीचा सहवास लाभलेले केळफळ आम्ही प्रसाद म्हणून खाल्ले आणि माऊलींच्या रथासोबतच पुढे मार्गक्रमण सुरु केले. वेळेनुसार आता मस्त चहा पिण्याच्या झालेल्या इच्छेची वारीसोबत फिरणाऱ्या एका टपरीवर कडक गरम स्पेशल चहा घेऊन आम्ही पुर्ती केली. तोच पावसाची एक मोठी चळक आली अन वारीमध्ये पाऊस आला तर काय होते याचाही अनुभव आम्हाला देऊन गेली. काही वेळातच वातावरण क्लियर झाले अन 'ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम' चा टाळासंगे जप करत पुन्हा सवंगडी चालू लागले.

चालताना गायक श्री आशिष गणपुलेंनी अबीर गुलाल उधळीत रंग गाण्यावर आपले स्वर छेडले, त्यांच्या मागे गात आम्हीही आमचे स्वर उधळून त्या पायी मेहफिलीमध्ये रंग भरले. अबीर गुलाल पाठोपाठ आशिष सोबत आम्ही अवघे गर्जे पंढरपूर गाऊन नामाचा चाललेला तो गजर कंटीन्यू केला. एरव्ही ही गाणी गाने अन वारीबरोबर चालताना ही गाणी गाने या दोन गोष्टींची परस्परांशी तुलना अशक्यच होती. वारीत गाण्याचा तो अनुभव, तो आनंद वादातीतच होता.

मात्र तोच आमच्या त्या आनंदावर काही अंशी विरजण लागल्यासारखे झाले. माऊलीची ही लेकरे विठू माऊली तू माऊली जगाची गाऊन त्या माऊलीतील विठ्ठल मूर्ती मनी उभी करायचा प्रयत्न करत होते तोच ज्या दिंडीसोबत आम्ही चालत होतो त्या दिंडीतील एका माऊलींनी आम्हाला ते गाणे बंद करायला भाग पाडले. एकतर ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग म्हणा किंवा येत नसतील तर केवळ ज्ञानोबा तुकाराम चा जप करा असे सांगितले. वारीमध्ये अशा गाण्यांना 'पर्मीशन' नाही असाही पावशेर त्यांनी ठेवला. ते ऐकून काहीसे लाजरे बुजरे, काहीसे कन्फ्युज झालेल्या आमचे टाळ हळू हळू उतरले अन त्याचबरोबर सुरही म्यान झाले! तिथून पुढे आम्ही अशी कुणाची मने दुखाऊ नयेत म्हणून जेव्हा गायचे असेल तेव्हा एखाद्या झाडाखाली थांबून 'प्रायव्हेटली' भगवंताला स्मरायचा मार्ग अवलंबला आणि अर्थातच तोही निस्सीम आनंद देऊन गेला.

जसजशी पाऊले पुढे पडत होती तसा घड्याळाचा काटाही पुढे सरकत होता अन त्याचबरोबर समस्त वारकरी मंडळींना सावलीची सोय करायला आभाळभर विखुरलेल्या काळ्या ढगांच्या आड दडून बसलेला तो मध्यान्हीचा सूर्यही! त्या मध्यान्ही बरोबर वारकऱ्यांच्या जेवणाची वेळही झाली होती. त्या जेवणाच्या वेळी वारकऱ्यांना भोजनाच्या माध्यमातून प्रसाद देणारी मंडळे टप्प्याटप्प्यावर दिसत होती. गावातील घराघरांना वारकऱ्यांना प्रसाद, पाणी देऊन त्यांची सेवा करण्याचे पुण्य लाभत होते. ती सेवा करताना त्या वारकऱ्यांमध्ये त्यांना जणू साक्षात विठ्ठलच दिसत होता, विठ्ठल दर्शनाच्या अनुभूतीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर प्रतीत होत होता. ते वीस बावीस दिवस आपल्या घरापासून दूर आलेले ते हरीजन, कोणी शेतांमध्ये विसावा घेत होते, कोणी भाकरीचा घास मोडत होते. आमच्या साठी ती त्या दिवशी पुरती एक दुपार होती, त्यांच्यासाठी मात्र त्या अखंड वीस दिवसांच्या प्रवासातील एक दुपार! आता जणू आभाळाच्याच अखंड छपराखाली राहण्याची अन धरेच्या कुशीत विसावण्याची त्यांना सवयच होऊन गेली होती!

थोड्याच वेळात महाराजांच्या पालखीचाही पुढचा विसावा आला. जेव्हा जेव्हा पालखी रथातून उतरून विसाव्याच्या ठिकाणी जाते अन विसाव्याच्या ठिकाणाहून ती रथामध्ये आणली जाते त्यावेळी दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा होणारा गडबड गोंधळ, दर्शनासाठी त्यांनी केलेली चढाओढ आणि त्यामुळे हे सारे हाताळायला पोलीस आणि चोपदार वगैरे मंडळींची होणारी धावपळ या गोष्टींमध्ये नक्कीच सुधारणेस वाव असल्याचा भाव मनी येऊन गेला.

मात्र आज फक्त अन फक्त भक्त म्हणूनच जगू अन जसे आहे तसे घेऊ म्हणत आता या विसाव्यावर पालखी जोवर विसावली आहे तोवर आपणही आपल्या आणलेल्या शिदोऱ्या उघडून भोजन करून घेऊ असा विचार करून एका स्वच्छ सुंदर वावरामध्ये हवेशीर वातावरणात दुपारच्या जेवणासाठी ठिय्या मांडला. डाव्या बाजूने हवेचा झोत आला की आमच्या नेसलेल्या धोतराला उजव्या बाजूने आकाशाची ओढ लागायची अन शेटेंच्या भाषेत आमची हेलन होऊन जायची. इकडे खाली धोतर सांभाळतोय तोवर तिकडे डोक्यावरची टोपी कोणाची तरी ओढ लागल्यासारखी दूर उडून जायची. त्या परिस्थितीत टोप्यांच्या घड्या करून ते सवय नसलेले धोतर सावरत मोठ्ठाला गोल करून आम्ही बारा जण जेवायला बसलो. डाळ कांदा, बटाट्याची भाजी, म्हाद्या, तेलतिखट, तुपसाखर लावलेली चपाती, कांदा, जोडीला भाजलेले शेंगदाणे आणि त्या जोडीला तिथेच जवळ जेवायला बसलेल्या सांगलीकरांनी आणून दिलेला साखर आंबा अन लसणाची चटणी असा भरगच्च मेनू आमच्या समोर होता. अतिशय सुंदर जेवण झाल्यानंतर, "वाह! मजाच आली बरं का, फक्त भात पाहिजे होता.." असं कोणीतरी म्हणायला अवकाश आणि मागून जणू माऊली प्रसन्न व्हावेत तसेच तेच सांगलीकर काका थोडा भात आणू का रे म्हणत भाताची ऑफर घेऊन आले! थोडे निर्लज्जासारखेच एकवदनी सारे येऊ द्या येऊ द्या म्हणाले अन आमच्या पुढे साऱ्यांना पुरेल एवढा भात अन त्याबरोबर स्वादिष्ट असा डाळ तडका असे दोन आयटम्स हजर झाले! अशा रीतीने जेवणाचा कार्यक्रम संपन्न करून तिथेच रानात थोडी वामकुक्षी घेण्याचा निर्णय आम्ही घेतला. काही वेळ पडल्यानंतर पुन्हा गणपुले अन वागडोळे सरांच्या मागे सूर ओढत टाळ बोले चिपळीला, वृंदावनी वेणू सारख्या गीतांचा घाट आम्ही घातला अन वाझेगावच्या दिशेने प्रस्थापित झालेल्या वारी बरोबर चालायचा कार्यक्रम सुरु केला!

भरल्या पोटी पुन्हा विठ्ठल नामाचा जयघोष सुरु झाला. एखाद्या हिरव्यागार डोंगरातून पोखरून काढलेल्या बोगद्यातून मार्ग जावा तशा पद्धतीने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेल्या पिंपळनीच्या दाट वृक्षांच्या कमानितून आम्ही चालत होतो. रस्त्याच्या डाव्या बाजूला पायी चालणारे वारकरी आणि उजव्या बाजूला त्या वारकऱ्यांचा लवाजमा वाहणारे सामानाने भरलेले मोठ्ठाले ट्रक एका दोरीत शिस्तीत चालले होते. वाटेत आम्हाला एका ठिकाणी बहुदा टेम्भुर्णी करांनी बनविलेले तत्सम ट्रक चे माऊलींची छोटीशी मूर्ती आसनस्थ असलेले एक सुंदर छोटेसे मॉडेल दिसले होते. त्या मॉडेल च्या भोवती गोळा होऊन आम्ही सवंगड्यांनी त्याला आमच्या सोबत कॅमेराकैद ही केले होते.

थोड्या वेळात आमुची पाऊले वाझेगाव मध्ये दाखल झाली. तारळ्याच्या पाटणकरांच्या पाहुण्यांनी तिथे आमची चहापाण्याची सोय केली. पालखीच्या आगमनाने अवघ्या वाझेगाव ला जणू यात्रेचे स्वरूप येऊन गेले होते. वाझेगाव च्या त्या भल्या मोठया सैनिक परेड ग्राऊंड वरती ठिकठिकाणी वारकरी विसावले होते. तो निवांतक्षण अनुभवणाऱ्या त्या वारकऱ्यांपैकी एका गृप शी थोडा सवाल जवाब करून संवाद साधायचा आम्ही छोटा प्रयत्न केला. माझ्या गळ्यात कॅमेरा वगैरे असल्याने अन हाती असलेल्या मोबाईल मध्ये प्रशांत शेठनी मुलाखतीचा व्हिडिओ शूट वगैरे सुरु केल्याने बहुदा त्यांना आम्ही कोणत्या तरी चॅनेल ला वगैरे रिप्रेझेन्ट करतो आहे असा समज झाला.

बुलढाण्यावरून एका वारकरी संस्थे अंतर्गत साधारण अडीचशे वारकरी आळंदीला आले होते. एकवीस दिवसांचा घरापासून दूर असलेला हा अविरत प्रवास पूर्ण करण्यासाठी लागणारा लवाजमा वाहायला त्यांच्या सोबत त्यांचे आठ ट्रक आणि तीन पाण्याचे टँकरही ही होते. शक्य असेल त्याच्याकडून माफक एक हजार रुपये वर्गणी घेऊन ती संस्था दरवर्षी बुलढाण्याच्या माऊली भक्तांना ही संधी उपलब्ध करून देते. गेल्या सोळा सतरा वर्षांपासून त्यांचा अशा पद्धतीने वारीतील सहभाग अखंड सुरु आहे.

"माऊली, दरवर्षी तुम्ही या वारीमध्ये सहभागी होता, बहुदा तुम्हाला वर्षभर या सोहळ्याची ओढही लागत असावी, तुमची असे नियमितपणे येण्यामागची प्रेरणा काय असते? ऊन पाऊस अनुभवत एवढे वीस दिवस घरापासून दूर राहण्याचा, जवळपास अडीचशे किलोमीटर चालण्याचा त्रास वगैरे नाही होत?", अशा मी केलेल्या प्रश्नाचे त्यांनी दिलेले उत्तर हे कायम स्मरणात राहणारे होते. उत्तरादाखल माऊली बोलले, "एकदा साध्य निश्चित झाले की त्या साध्याच्या सिद्धतेसाठी अविरत समाधानी भावनेने जी साधना केली जाते त्या साधनेचा मनुष्य प्राण्याला कधी त्रास नाही होत. उलट ही केलेली साधना हाच परमोच्च आनंद असतो. एवढे अडीचशे किलोमीटर चालून पुढे पंढरपुरातही आम्ही पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस तास दर्शनासाठी रांगेत उभे राहतो आणि शेवट पाच ते दहा सेकंदासाठी मिळणाऱ्या विठू माऊलींच्या दर्शनाचा आनंद घेतो आणि तीच आमच्या साध्याची सिद्धता समजतो!"

वेळ आणि गाड्यांची पोझिशन पाहता आम्ही पुढे बरड पर्यंत चालत जाण्याच्या ऐवजी आहे त्या मार्गाने तीन जणांना दुचाकीवरून पुढे पाठवून जिकडे गाड्या लावल्या आहेत तिकडे उलट दिशेने पायी जाण्याचा निर्णय घेतला. मध्यवर्ती पिंपळद मध्ये आम्हाला उलट दिशेने येणाऱ्या गाड्यांनी गाठले. गणपुले सरांनी समारोपाचे छोटेसे भाषण देऊन श्री कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची अंगावर शहारे आणणारी आरती गायली, पुढच्या वर्षी आता एक दिवस मुक्कामाच्या हिशोबाने येऊ असे सध्या ठेऊन, एक प्रसन्न दिवस जगून, गाड्यांमध्ये स्थानापन्न होऊन आम्ही साताऱ्याची वाट धरली! पंढरीनाथ महाराज की जय!! 

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...