Close

जो_जिता_वही_सिकंदर

काल वार मंगळवार, दोन हजार एकोणीस च्या जुलै महिन्याची दोन तारीख,

नुकत्याच जिल्ह्यात दाखल झालेल्या मान्सून च्या पावसाची उघडझाप,
कराड शहरातील वाखाण रोड वरच्या पद्मावती टर्फ ग्राउंड वरती सातारा जिल्हा माहेश्वरी समाजांतर्गत कराडियन्सचे जाम कडक नियोजन,
बरोब्बर एक डझन टीम्स च्या सहभागाने खेळल्या गेलेल्या भव्य सिक्स साईड बॉक्स क्रिकेटचे आयोजन,
गोलंदाजीच्या अगदी शिथिल नियमांत गुरूच्या टणक टेनिस बॉलने गोलंदाजांचा कहर वेगवान मारा,
सहा ओव्हर्स मध्ये पन्नास म्हणजे डोक्यावरून पाणी सारख्या परिस्थितीत लो स्कोरींग गेम्स चा दिवसभराचा थरार तो सारा!

अक्षरशः जगला कालचा दिवस! पंचविशे रुपये भरून सात हजाराच्या रोख बक्षिसासाठी साताऱ्याच्या सातारा खुंखार आणि सातारा थंगड अशा दोन, कोरेगावच्या दोन आणि खुद्द कराडच्या वेगवेगळ्या परगण्यातील आठ अशा एकूण बारा टीम्स दोन लॉट मध्ये परस्परांशी भिडल्या!

एका बाजूने कराडच्या मार्केटयार्ड टु आणि कोरेगावच्या भरत मर्दांच्या संघांवर सहज मात करत आमची टीम खुंखार सेमीफायनल मध्ये पोहचली. दुसऱ्या एन्ड ला पंकज राठी कार्यान्वीत आनंद करवांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सातारा थंगडला स्पर्धेमध्ये हॉट फेवरीट असलेल्या तिखट तेजतर्रार मारेकऱ्यांची फौज असलेल्या मार्केटयार्ड वन संघाशी आपल्या क्वार्टर फायनल मुकाबल्यात भिडावे लागले. थंगड संघाची जिगरबाज गोलंदाजी अन क्षेत्ररक्षण मार्केट यार्ड संघाला सीमित धावसंख्येत रोखु तर शकले पण ते सीमित आव्हान चेस करायला थंगड्स थोडेसे कमी पडले आणि अनफॉर्च्युनेटली स्पर्धेतून नॉक आउट झाले!

पुढे उपस्थितांनी दिवसभरातील खऱ्या अर्थाने पहिला थरार अनुभवला तो सातारा खुंखार आणि कराड बालाजी यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या सेमीफायनल मध्ये!

नाणेफेक हरून प्रथम फलंदाजी करण्यास भाग पडल्यावर चांगल्या सुरुवातीनंतर धावा घेताना कॉलिंग च्या गडबडीमुळे खुंखार संघाची वाताहत झाली आणि पूर्ण सहा षटकेही न खेळू शकलेल्या आमची बारी अवघ्या तेवीस धावांत गुंडाळली गेली.
चोवीस धावांचे माफक म्हणायलाही तोकडे असलेले हे आव्हान डिफेन्ड करायच्या जिद्दीने आम्ही क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झालो. अर्थातच पहिली ओव्हर महत्वाची होती आणि ती टाकायला पुन्हा एकदा कर्णधार गोविंद ने माझ्या हातात चेंडू सुपूर्द केला होता.
आधीच्या दोन्ही मॅचेस मध्ये मी सरळ विकेट किपर असलेल्या आदित्यच्या च्या हातात चेंडू जाईल असा आखूड टप्पा टाकला होता आणि त्या दोन्ही मॅचेस च्या दोन्ही षटकांत मिळून जेमतेम चार धावा दिल्या होत्या.
पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. काहीही करून तीन चार ओव्हर्स मध्ये त्यांच्या पाची विकेट्स घेणे हेच काय ते विजयासाठी आम्हाला गरजेचे होते.
त्यामुळे हे षटक टाकताना बुमराचे नाव मनी चिंतत हुकला तर डायरेक्ट बोल्ड च्या अपेक्षेने नेम धरून पायांचा वेध घ्यायचे ठरवले होते.
माझ्या त्या योजनेचे फळही मला मिळाले आणि दुसऱ्याच चेंडूवर बालाजीच्या ओपनर ची दांडी गुल झाली. ती विकेट मिळताच आम्हां साही जणांत कमालीची इलेकट्रीक ऊर्जा इन्स्टॉल झाली.
पुढे एक ओव्हर पाच रन्स एक विकेट अशा अवस्थेत रोहनने दुसरी ओव्हर सुरु केली.
रोहनच्या दुसऱ्या चेंडूवर कमालीच्या वेगाने उसळी घेतलेला बाउन्सर बालाजीच्या स्नूकर चॅम्प राहुलला सुधरायला जड गेला आणि तिथल्या तिथेच उडालेला झेल विकेट किपर आदित्यने आबदार टिपला अन आम्ही पुन्हा एकच जल्लोष केला.
बालाजी टीमची अवस्था झाली दोन आऊट सहा रन्स!
चौकार षटकार तर दूरच साधी एक एक धाव देणेही त्या क्षणी आम्हाला अमान्य होते आणि तशा परिस्थितीत आमच्या अक्षय ने नॉन स्ट्रायकर च्या दिशेने विनाकारण ओव्हर थ्रो केला. सारेजण एकाच वेळी त्याच्या वर "अरे अक्षा कस्श्याला!!??" म्हणत एकमुखाने तुटून पडणार इतक्यात त्याने मारलेला थ्रो गोविंदाने फुल्ल डाइव्ह वगैरे मारून अडवला आणि नॉन स्ट्रायकर एन्ड ला त्याने केलेला थ्रो बोनस मधे त्याच ओव्हर मध्ये अजून एक रन आऊटची विकेट देऊन गेला.
त्या विकेट ने बालाजी संघाची अवस्था दोन ओव्हर तीन बाद सात अशी बिलबिलीत केली आणि त्या परिस्थितीत आदित्यची डावातील तिसरी ओव्हर सुरु झाली.
पहिला चेंडू ऑफ साईड ला स्लो वाईड टाकल्यानंतर अरे आदया एवढा स्लो कशाला असा मी म्हणे पर्यंत पुढचा बॉल सुटला तर सिक्स च्या अँगल मध्ये माझ्या दिशेने आला आणि उडी मारून मी तो टिपला अन पुन्हा एकच गलका झाला. निघालेला सिक्सर ही वाचला होता आणि त्याचबरोबर गरजेच्या पाचपैकी चौथा मासाही आम्ही गिळला होता!
आता स्पर्धेतील रोख पाच हजाराच्या दुसऱ्या बक्षीसापासून आम्ही फक्त एक पाऊल दूर होतो.
आर्थिक आनंदच पाहायचा झाला तर दोन संघांच्या काँट्रीब्युशन चे पैसे कव्हर होणार होते! आत्मिक आनंद पाहायचा झाला तर रात्रीच्या पार्टीला कारण मिळणार होते!
पण तिथून पुढे पुन्हा सिच्युएशन टाईट झाली जेव्हा आदित्य चे उर्वरित षटक आणि शुभम अन अक्षय च्या ओव्हर्स विकेटलेस गेल्या, कराड बालाजी संघाच्या पाच ओव्हर्स मध्ये चार बाद सतरा धावा झाल्या!
आता राहिलेली शेवटची ओव्हर पावर प्ले ची होती, म्हणजे बाऊंड्री वर एकच फिल्डर ठेवण्याची!
या ओव्हर मध्ये बालाजी संघाला धावा करायच्या होत्या अवघ्या सात, त्यात आमच्या बॉलर गोविंद चा दुखत होता हात, फक्त एक विकेट पडली तर मात्र बनणार होती आमची बात!
अन अगदी झालेही तसेच!
गोविंदने टाकलेला पहिलाच चेंडू कराड बालाजीच्या फलंदाजाने गोविंद च्या दिशेने मारला, गोविंद कडून मिसफिल्ड होऊन तो चेंडू त्याच्या दोन्ही पायांच्या मधून बाउंड्री च्या दिशेने जाणार तोच त्याला मध्ये बाउंड्री वर उभ्या असलेल्या एकमेव रोहनचा रेझिस्टन्स झाला, अडविलेला चेंडू फुर्तीने स्टम्प्स च्या दिशेने टाकून रोहनने नॉन स्ट्रायकर च्या यष्ट्यांचा अचूक वेध घेतला अन त्या वेधाने दुसरी धाव घेण्यासाठी धावलेल्या बालाजी संघाच्या शेवटच्या फलंदाजाचा बळी घेतला, टीम खुंखार चा एकच गलका एकच जल्लोष झाला, छत्तीस चेंडूत गरजेच्या असलेल्या अवघ्या चोवीस धावा डिफेन्ड करत टीम खुंखार ने सेमीफायनलचा हा थरारक सामना सात धावांनी जिंकून आपला फायनलचा रस्ता मोकळा केला!

आता फायनल मध्ये आम्ही ग्राऊंड मालक भूषण शहा च्या प्रोफेशनल क्लब प्लेयर्स नी भरलेल्या झुंजार टीमशी झुंजणार का मार्केटयार्डच्या एकशे ऐंशीच्या स्पीड ने बॉल टाकणाऱ्या संघाशी दोन हात करणार हे काही वेळातच स्पष्ट झाले जेव्हा मार्केटयार्ड वाले भूषण शहाच्या संघावर त्यांच्या सेमीफायनल मुकाबल्यात भारी ठरले!

तिकडे ते ठरत असताना आमच्यावर मात्र इकडे वेगळेच प्रेशर होते कारण आमच्या खुद्द खुंखार कॅप्टन ला फायनल मॅच चे प्रेशर घेण्याच्या वेळी इकडे सामन्यापूर्वी नैसर्गिक प्रेशर आले होते. पण सारे काही जिथल्या तिथे मार्गी लागले अन टॉस जिंकून खुंखार्स फायनल मधे प्रथम फलंदाजीस उतरले!

ब्याटिंग मध्ये डेप्थ वाढविण्यासाठी शुभम च्या ऐवजी अक्षय माझ्यासोबत ओपनिंग ला आला. मला मार्केटयार्डच्या कहर पेसर्स चे बॉल मस्त कनेक्ट तर होत होते पण बाउंड्रीज कडे क्लियर करणे जड जात होते. पहिल्या पाच ओव्हर्स मध्ये माझ्या सिंगल डबल, शुभम ने वसूल केलेल्या दोन बाउंड्रीज अन रोहन ने शेवटच्या ओव्हर मध्ये ऐन मोक्यावर ओढलेली सिक्सर यांचे गणित जुळवत आम्ही प्रथम फलंदाजी करताना चौतीस धावा फलकावर लावून मार्केट यार्ड संघासमोर सहा ओव्हर्स मधे पस्तीस धावांचे आव्हान उभे करू शकलो.

यावेळी क्षेत्ररक्षणास उतरताना आमच्याकडे दहा-अकरा रन्स जास्त होत्या पण पुढची टीम कंप्यारेटिव्हली तगडी. आत्मविश्वास मात्र तेवढाच जेवढा सेमीफायनल मध्ये होता!

यावेळीही पहिली ओव्हर टाकायला चेंडू माझ्या हातात होता आणि डोक्यात टार्गेटही एकच होते, कशीही करून एकतरी विकेट घेणे! यावेळीही मला विकेट घेण्यात यश मिळालेय असे क्षणभर वाटले जेव्हा मार्केटयार्ड च्या मेन फलंदाजाने मी टाकलेला उंच उडालेला आखूड टप्प्याचा चेंडू गोविंदाच्या दिशेने सीमारेषेकडे मारला. मात्र कमनशिबाने तो गोविंदच्या ओंजळीपासून काही सेंटिमीटर्स दूर राहिला आणि डायरेक्त सिक्सरच गेला. त्या अनफॉर्च्युनेट सिक्सर मुळे मी पहिल्या ओव्हर मध्ये नऊ धावा देऊन बसलो.

यावेळी रोहन ची ओव्हर पावरप्ले साठी राखून पुढची ओव्हर आम्ही अक्षयला दिली. मार्केट यार्ड च्या फलंदाजांनी कसलीही जोखीम न घेता सिंगल सिंगल काढत धावसंख्या दोन ओव्हर बिनबाद तेरा पर्यंत नेली.

पुढे शुभम आणि गोविंद च्या ओव्हर्स मधेही विकेट न पडता सिंगल सिंगल्स येत राहिल्याने सामन्याचे पारडे मार्केटयार्ड कडे झुकल्यासारखे वाटले. त्यात गोविंदाच्या चौथ्या ओव्हरचा सेकंड लास्ट बॉल पोल ला थटून मला चुकवून सीमारेषेकडे गेला आणि रिकवायर स्कोरबोर्ड बारा बॉल्स दहा वर आला. विकेटस्च्या कॉलममध्ये अजूनही शून्यच होता!

आता पुढची ओव्हर रोहन टाकणार का आदित्य यात कन्फ्युजन होते ते मार्केटयार्ड संघाने पावरप्ले घेऊन दूर केले अन रोहनचे नाट्यमय षटक सुरु झाले. आपली उंची अन खांद्यांचा पुरेपूर उपयोग करून रोहनने खपाखप चेंडू टाकायला सुरुवात केली. दोन निर्धाव चेंडूच्या प्रेशर मध्ये रोहनच्याच अचूक फेकीवर मार्केटयार्डच्या वेल सेट असलेल्या मुख्य प्लेयर ची रन आउट च्या फॉर्म मध्ये आम्हाला विकेट मिळाली. टीम खुंखार पुन्हा रीतसर सामन्यामध्ये आली जेव्हा पावरप्ले ची ओव्हर रोहन ने अवघ्या तीन रन्स देऊन अक्षरशः तारली!

आता शेवटची निर्णायक ओव्हर आदित्य टाकणार होता. मार्केट यार्ड संघाला गरज होती ती सहा चेंडूंत सात धावांची! डोके कमालीचे शांत ठेऊन आदित्य ने पहिले पाचही चेंडू एकाच टप्प्यावर टाकले. अचूक बॉलिंग अन फुल चार्जड्ड फिल्डिंग मध्ये मार्केटयार्ड च्या फलंदाजांना पहिल्या पाच चेंडूंत अवघ्या तीनच धावा करता आल्या अन त्यामुळे शेवटच्या चेंडूवर चार धावांची गरज अशी परिस्थिती तयार झाली.

जे पहिल्या पाच चेंडूंत केलं होतं तेच आदित्य ला फक्त अजून एकदा रिपीट करायचं होतं. बॉल ला सीमारेषेपर्यंत पोहचवणे कमालीचे अवघड असलेल्या कंडिशन्स मध्ये आता आपला विजय म्हणजे औपचारिकताच आहे याच अविर्भावात आम्ही सारे होतो. बाहेर उभ्या असलेल्या पंकजशेठ ना मी मोबाईल रेडी ठेऊन व्हिडिओ करायला सांगायलाही विसरलो नव्हतो. आदित्य ने सहावा बॉल टाकला, ओपनिंग पासून खेळत असलेल्या मार्केटयार्ड च्या खेळाडूने तो कनेक्ट करून समोरच्या दिशेने भिरकावला, हवेतून आलेल्या चेंडूंवर मिड ऑन वर असलेला रोहन कॅच करण्याच्या प्रयत्नाने सूर मारून झेपावला, मात्र रोहनचे पोट अन त्या हिरव्यागार टर्फ ची सपाटी यामध्ये राहिलेल्या पोकळीतुन चेंडू आपला मार्ग काढण्यात यशस्वी झाला अन त्या शेवटच्या बॉलवर बसलेल्या चौक्याने मार्केटयार्ड च्या कोर्ट मध्ये विजयाचा जल्लोष सुरु झाला!

खुंखार जणू अजूनही कोम्यात होते, काय घडले यावर विश्वास ठेवणे अजूनही कठीण होते, आम्ही पार गिळलेला घास आमच्या पोटातून काढून घेतला गेला होता, हातातोंडाशी आलेला विजय आमच्या कडून हिरावून नेला होता!

जर आदित्यने तो बॉल काहीसा वेगळ्या पद्धतीने टाकला असता तर,
जर रोहनने तो बॉल कॅच करायचा प्रयत्न न करता नुसता अडवायचा प्रयत्न केला असता तर,
जर थोडे मागे जाऊन माझ्याकडून तो चकवा देऊन गेलेला फोर अडला असता तर,
जर पहिल्याच ओव्हर मध्ये गोविंद कडून त्या मेन ब्याट्समन चा कॅच झाला असता तर,
असे किती जर अन किती तर खरंतर निरर्थक ठरून गेले होते कारण शेवटच्या चेंडूवर चौकार मारून मार्केट यार्ड विजयी ठरले हे एकमेव सत्य उरले होते!

काहीही असो, कराडकर बंधूंच्या दिवसभराच्या क्वालिटी नियोजनाचे अशा अटीतटीच्या सामन्यामुळे जणू चीज झाले! जो जिता वही सिकंदर च्या आख्यायिकेप्रमाणे मार्केटयार्ड तर बघ्यांच्या भूमिकेतून क्रिकेट जिंकले!! आम्हाला मात्र आपले एका वर्षात दुसऱ्यांदा रनर अप राहून आता या मिळालेल्या पाच हजाराचे करायचे काय यांवर वाद घालण्यातच समाधान मानावे लागले!!

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...