Close
In Videos

Yaro-Chale-Dekhe-Aaj-TajMahal


गेल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयुष्यात पहिल्यांदा दिल्ली दौरा घडून आला. एवढी हक्काची सक्खी मावशी असूनही एवढ्या वर्षांत देशाची ही कॅपिटल सिटी काही पाहिली नव्हती. यावर्षी मात्र देवीच्या जगरात्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ती इच्छा पूर्ण झाली अन एकदाची दिल्ली नजरे खालून गेली.

तीन ऑगस्टच्या सकाळी, बरोब्बर अकरा वाजून दहा मिनिटांनी, आम्ही पुणे सोडले आणि दुरंतोने चार ऑगस्ट च्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी निजामुद्दीन गाठले.

सकाळी सकाळी दिल्ली दर्शन करत करत निजामुद्दीन पासून साधारण पस्तीस किलोमीटर वर असणाऱ्या नांगलोई कडे पर हेड ओन्ली पंचवीस रुपये तिकीट काढून बस ने प्रस्थान केले.

नाष्टा बिष्टा अंघोळ पांघोळ उरकून त्याच दिवशी हातासरशी फर्स्ट टाईम मेट्रो मेट्रो खेळत श्री स्वामी नारायणांचे भव्य अक्षरधाम टेम्पल पाहून घेतले.

दिल्ली तील पहिली रात्र देवीच्या जगरात्याची रात्र होती, व्होल नाईट जागून देवीला स्मरायची रात्र होती, साचे दरबार की जय चा जयकारा करत चार तारखेच्या सकाळ पर्यंत देवीला नाचगाण्यातून भजले.

चार तारखेला घरी येऊन तीन चार तास झोप घेऊन इंटर दिल्ली मधेच व्हाया मेट्रो नांगलोई पासून लोटस टेम्पल गाठले. पावसाच्या तुरळक रिमझिम सरींमध्ये लोटस टेम्पल पाहून आम्ही तिथून स्वातंत्र्य दिनासाठी सज्ज होत असलेल्या ऐतिहासिक लाल किल्याकडे मार्गक्रमण केले.

लाल किल्याचे काऊ कलरचे सौंदर्य नजरभर पाहून आम्ही दिल्लीतील जवळच्याच सुप्रसिद्ध चांदणी चौकातील बाजारपेठेत स्वतःचे खिसे सांभाळत फेरफटका मारला. बॅटरीवरती चालणाऱ्या इलेक्ट्रिक तीन चाकी ऑटोतुन फिरत, आलू टिक्की, काके दी भट्टी चे छोले बटोरे अलॉंग वुइथ भला मोठ्ठा ग्लास भरून लस्सी फॉलोड बाय ऐतिहासिक पराठा गल्लीतील पराठे वगैरे डिनर च्या हिशोबाने ठीकठिकाणी टेस्ट करत आम्ही दिल्लीदर्शन संपवून मुक्काम पोस्ट नांगलोई कडे मुक्कामासाठी मोर्चा वळवला.

या पाच तारखेच्या नागपंचमी दिवशी, दिल्ली शहरापासून साधारण 230 किलोमीटर वरती वसलेल्या जगप्रसिद्ध आग्रा शहरातील जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहाल ला भेट देण्याचा योग आला.

सकाळी साडे सहाच्या दरम्यान आम्ही सहा जणांनी रेंटेड इनोव्हाने आग्र्याकडे जाण्यासाठी नांगलोई (दिल्ली) सोडली. नांगलोई पासून साधारण पन्नास किलोमीटर वर असलेल्या नोयडा पासून पुढे आग्र्यापर्यंत एकशे साठ सत्तर किलोमीटरचा हार्डली एखादे वळण असलेला, दूर दूर पर्यंत नजर न्यावी तर फक्त रस्ताच दिसावा असा सहापदरी यमुना एक्स्प्रेसवे होता. मधे नऊ साडे नऊ च्या दरम्यान एका ढाब्यावर मस्त पराठ्या लस्सीचा केलेला नाश्टा सोडला तर बाकी कुठेही न थांबता आम्ही अकरा च्या दरम्यान तडक आग्र्याला पोहचलो.

आग्र्यामध्ये एंट्री मारताच आपल्या लोणावळ्यात जशी जिथे तिथे चिक्कीची दुकाने दिसतात तशी आग्र्याच्या पेठ्याची दुकाने दिसू लागली. आग्रा सिटीही कल्पनेतील ताजमहालाप्रमाणेच स्वच्छ सुंदर असेल ही जी काही माझी पूर्वकल्पना होती ती शहरात एंट्री केल्यानंतर दुर्दैवाने फोल ठरली. ज्या वास्तूला एक आश्चर्य म्हणून पहायला जगभरातून पर्यटक येतात त्या वास्तुकडे जाण्याच्या मार्गावरील अस्वच्छता पाहून आश्चर्यच वाटले. पण त्याविषयी फार विचार न करता मन फक्त एकाच गोष्टीची वाट पाहण्यात मग्न होते ती म्हणजे अर्थातच संपूर्ण जगाने जिला एक आश्चर्य मानले आहे त्या ताजमहालाचे आपले काही वेळात होणारे प्रथम दर्शन कसे असेल ही!

आग्रा सिटीमध्ये येऊन काही अंतर मार्गक्रमण केल्यानंतर आमची इनोव्हा पार्किंग च्या हिशोबाने थांबली अन आम्हाला ताज च्या जवळ पोहचल्याची जाणीव झाली. गाडीतील वीस-बावीस डिग्रीमधून आम्ही खाली उतरलो तेव्हा झटक्यात आमच्या शरीरांसाठी टेम्परेचर लेव्हल डबल झाली. इकडे मध्य महाराष्ट्रात पाऊस शाळा ऑफिसेस ना सुट्ट्या देऊ लागण्या इतपत रेटून बरसत असताना तिकडे आग्र्यात मात्र सूर्य तिथल्या सवयीप्रमाणे आगच ओकत होता. गाडीतून उतरून थोडे स्थिरस्थावर होतोय ना होतोय तोवर एका प्रोफेशनल वेल ड्रेस्ड इसमाने न विचारता सल्ले द्यायला सुरुवात केली. अपेक्षेप्रमाणे थोडे जनरल मार्गदर्शन केल्यानंतर त्याने आपले नऊशे रुपये फिज मेन्शन केलेले आयडी कार्ड दाखवत गाईड करण्याचे फायदे सांगत त्याला ऍज ए गाईड म्हणून आमच्या सोबत घेऊन जाण्याच्या मुद्याच्या मार्गाचे आम्हाला दर्शन घडविले. त्याचा नाद तिथेच सोडून आम्ही पुढे चालू लागलो, थोडा फॉलोअप केल्यानंतर त्यानेही आमचा नाद सोडून दिला.

किरकोळ शुल्क आकारून पार्किंग पासून ताज पर्यंत वाहून नेणाऱ्या व्ह्यान्स ची तिकिट्स काढून आम्ही व्हॅन मध्ये स्थानापन्न झालो. रस्त्यामध्ये लावलेल्या एडव्हर्टायजिंग बोर्डस मधून एक दीड किलोमीटरची नागमोडी वळणे घेत व्हॅन आम्हाला ताजच्या समीप घेऊन आली. ताज अजून कणभरही नजरकक्षेत आला नव्हता. उन्हाचा कहर लक्षात घेऊन आतमध्ये जायच्या आधी ताजच्या बाहेरील बाजारपेठेत एका दुकानात मी तीनशे रुपये किंमत सांगितलेली पस्तीस चाळीस रुपयांची आभाळी रंगाची कॅप तीस चाळीस रुपये जास्ती देऊन ऐंशी रुपयांना घेतली. तिने माझे आत काढलेले पुढचे सारे फोटो स्पॉईल केले पण इतरांच्या कंप्यारीजन मध्ये त्या प्रचंड हिट मध्ये माझ्या घामाचे पाणी काही अंशी नक्कीच वाचवले.

पुढे तिकिट गेट वर आम्ही बाहेरुन पहायचे पन्नास रुपये आणि महालच्या आत प्रवेश करण्याचे दोनशे अशी एकूण अडीचशे रुपयांची तिकिट्स काढून सिक्युरिटी गेट्स मधून आत एंट्री केली. एन्ट्री करताच ताजच्या बाहेरील इमारतींचे सौदंर्य आमच्यावर जादू करायला लागले होते पण ऍक्च्युअल ताजचे दर्शन काही अजून झाले नव्हते.

गाईड न घेता जगातील आश्चर्य पाहणे ही गोष्ट आमच्या मनाला जरा रुखरुख लावून राहिली होती. पण आत जाताच एक गाईड आम्हाला स्वतःहुन एप्रोच झाला आणि आम्ही त्याला दोनशे रुपयांमध्ये डन करून टाकला. 'ताजमहाल के टोटल चार गेट है साहब, एक है ताज गंज की ओर मुह किया हुआ साऊदर्ण गेट जहाँ से पैदल आनेवाले लोग आते है, माना जाता है के ओ शाहजहान ने मुमताज की एक सहेली की याद में बनाया था! दुसरा है फतेहाबाद की ओर मुह किया हुआ ईस्टर्न गेट जिसे सिऱ्ही दरवाजा कर के भी जाना जाता है, ये शाहजहान ने अपनी दुसरी बीवी की याद मे बनाया था! तिसरा गेट है आग्रा सिटी की ओर देख रहा वेस्टर्न गेट जिसे फतेहपूर बेगम के नाम से जाना जाता है जो बादशहा की और एक बीवी थी और चौथा है रेड सँडस्टोन से बना लगभग सौ फीट कद का रॉयल गेट जहाँ से अभी हम अंदर जा रहे है! इन चारो गेटस् की एन्ट्री सेे ताजमहल एक जैसा दिखता है असेे म्हणत गाईड सुुरु झाला, लागलीच त्याने माझ्या हातातील डीएसएलआर घेऊन आमचा त्या गेट च्या समोर छान ग्रुप फोटो काढला आणि आओ मेरे पीछे म्हणून पुढे चालू लागला.

त्या भव्य गेट ची कारागिरी विस्मयाने पहात, ताजमहाल काही अजून दिसेना म्हणत आम्ही गेट च्या आत पाय ठेवले आणि हे समोर गेट वजा मोठाल्या देवळीतून त्या पांढऱ्या शुभ्र संगमरवरी कलाकृतीचे प्रथमदर्शन घडले. समोरचा तो एकरंगी बर्फाच्या रंगाचा धवल नजारा पाहताच नखशिखान्त 'wow' वाला फील येऊन गेला, काही वेळासाठी पापण्यांना लवायचा विसर पडला, नजर त्या विशाल मोहक अविष्कारावर स्ट्याच्यु दिल्यासारखी स्तब्ध झाली अन मनाला त्या रुपाला कसं अन किती पाहू असं होऊ लागलं कारण त्या दर्शनाने आपण ज्या वास्तुसमोर उभे आहे ती वास्तू जगातील एक आश्चर्य म्हणून का ओळखले जाते याची क्षणार्धात प्रचिती आली!

गेट मधून दिसणारे ताजचे ते प्रथमदर्शन मी कॅमेराबंद केले आणि आम्ही गेट मधून आत गेलो. आता,

काही अघटीत घडले आणि मनोरे पडले तर ते ताजवर न पडता बाहेरच्या बाजूला पडावे अशा हिशोबाने थोडे बाहेरच्या बाजूला झुकवलेल्या चार उंच मनोऱ्यांच्या मध्ये दिमाखात उभी राहीलेली ती ताजची जवळ्पास कुतुबमिनार एवढीच उंच असलेली ७३ मीटर उंचीची,

त्या काळी जवळपास तीन-साडे तीन कोटी रुपये ज्याचा आत्ताच्या चलनाच्या हिशोबात अंदाज बांधायचा झाला तर साधारण १ अब्ज रुपये खर्च करून बांधलेली,

उस्ताद येहमद लाहोरी या इराणियन आर्किटेकट् च्या हाताखाली पूर्णत्वासाठी वीस बावीस वर्षे घेऊन वीस एक हजार कामगारांच्या कारागिरीचा हातभार लागलेली,

हजार भर हत्तीच्या मदतीने आशिया खंडाच्या विविध भागातून गोळा केलेल्या तीस एक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रेशियस स्टोन्स चा वापर करून आकार घेतलेली ,

त्या स्टोन्स मुळे काळ आणि वेळे नुसार आपला रंग थोड्या फार प्रमाणात बदलणारी,

एकूणच आर्किटेक्चरल परफेक्शन चे एक जिवंत उदाहरण असलेली ती यमुनाकिनारी नेटाने उभी असलेली ताजमहालची संपूर्ण वास्तू आमच्या नजरेसमोर होती.

गाईड च्या मदतीने वेगवेगळ्या अँगल्स मधून अँटिक फोटोग्राफी करत, दीड दोन तास आग्र्याच्या त्या कहर गरमीमध्ये घाम पुसत पुसत आम्ही त्या आश्चर्याची विविध आश्चर्ये एक्सप्लोअर केली. शाहजहान ने ताजमहाल बांधणाऱ्या कारागिरांचे त्यांनी पुन्हा तत्सम कारागिरी करू नये म्हणून हात वगैरे कापले होते सारख्या वर्षानुवर्षे ऐकत आलेल्या गोष्टी ताजमहल आठवला की सर्वप्रथम आठवायच्या. त्या गोष्टी निव्वळ अफवा असल्याचे गाईडने आम्हाला निदर्शनास आणून दिले. ज्या आर्किटेक्त्त ने ताजमहाल बांधला होता त्यानंतर लाल किल्लाही बांधला होता. ताजमहालच्या शेजारीच शाहजहानला म्हणे काळा ताजमहाल ही बांधायचा होता पण त्याआधीच त्याला औरंगजेबने बंदी केले.

एकंदरीतच आमची ताजमहल ची छान सफर झाली. ताजमहालच्या बाहेर आल्यावर गाईड ने आम्हाला आपले खिसे सांभाळून चालायला सांगितले. पुन्हा जगातील एका आश्चर्याच्या ठिकाणी असे खिसेकापूंच्या भीतीने चालायला लागतेय याचे विचित्र आश्चर्य वाटले. आग्र्याचे सुप्रसिद्ध पेठे खरेदी करून आम्ही गाईडला अलविदा केले अन आता तिथून पुढे साठ वगैरे किलोमीटर वर असलेल्या श्रीकृष्ण जन्मभूमी अर्थातच मथुरा, गोकुळ, वृंदावनला मुक्कामी जायचे वेध आम्हाला लागले.

नजरेला एक वेगळाच थंडावा देणाऱ्या त्या ताजमहालच्या अलौकिक सौंदर्याच्या आठवणी मनी घेऊन, दिलीपकुमार आणि मीनाकुमारी वर चित्रित झालेले लीडर चित्रपटातील 'एक शहेनशाह ने बनवाके हंसी ताजमहल, सारी दुनिया को मोहब्बत की निशानी दी है, इसके साये मे सदा प्यार के चर्च होंगे , खतम जो हो न सके ओ कहानी दी है' हे गाणे प्ले करून मथुरेकडे मार्गक्रमण सुरु केले. ते ऐकता ऐकताच इकडे माझ्या मेंदूने मनातल्या मनात चार ओळी त्या ताजमहल वर रचल्या :

यारों चलो देखे आज ताजमहल
जहाँकी नजरमें जो इक अजुबा है
अपनी मेहबुबा की याद के पिछे
शाहजहाने जीसे बनवाया है!

यारों चलो देखे आज ताजमहल
जहाँकी नजरमें जो इक अजुबा है!

संगेमरवर से बनी ये अदाकारी
मोहब्बत की आला निशानी है
चारों दिशासे एक जैसी नजर आये
मानो कला की गझब रवाई है!

यारों चलो देखे आज ताजमहल
जहाँकी नजरमें जो इक अजुबा है!

मेहेज नजारा नजर को थंडक दे दे
रंग बदलता अजब अफसाना है
दुनिया के ख्यालों पे इकामत करता
भारत से मिला अनमोल नजराना है!

यारों चलो देखे आज ताजमहल
जहाँकी नजरमें जो इक अजुबा है!

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...