Close

धडा ससेवडीतला..

गेल्या महिन्यात अनिष, मोठ्या भावाचा मोठा मुलगा,इंटर स्कुल कॅरम स्पर्धेत आरामात जिंकून झोनल साठी क्वालिफाय झाला होता.

 घरात सर्वांचा अन खासकरून आजी आजोबांचा लाडका असल्याने इंटरस्कुल जिंकल्याबद्दल त्याचे भरभरून कौतुक तर झालेच होते, पण त्याच बरोबर एवढया लहान वयात तो आता त्याच्या कॅरम मध्ये मास्टर असलेल्या पप्पांनाही टशन देतो तर त्याच्या बरोबरच्यांना काय आरामात हरवेल असे घरात मतप्रदर्शनही झाले होते. अर्थातच प्रेमभावना उत्कट असल्याने त्याच्या सारख्या प्रत्येक इंटरस्कुल विनर ची जवळपास तशीच अवस्था असणार वगैरे लॉजिक कोणाकडून लावले गेले नव्हते.

हे आज सांगायचं कारण म्हणजे, काल त्याच्या झोनल च्या मॅचेस झाल्या. साताऱ्यासह सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी वगैरे जिल्ह्यांच्या विविध शाळांतून इंटरस्कुल जिंकून आलेले विविध गटातील विद्यार्थी कोकणातील सावंतवाडीमध्ये झोनल सिलेक्शन साठी एकत्र आणले गेले होते. चालू असलेल्या सेमिस्टर चे पेपर बंक करून नुकत्याच लिगामेंट इंजरीतून रीकव्हर होत असलेल्या अनिषला घेऊन आम्ही पाच तास रन करून सावंतवाडीला स्पर्धेसाठी घेऊन गेलो होतो. आठवीत असलेला अनिष त्याच्या गुरुकुल स्कुल ला अंडर फोर्टिन ग्रुप मध्ये रेप्रेझेन्ट करनार होता. त्याचा गेम पाहिलेले आम्ही तो जिंकणारच या अपेक्षा कम विश्वासाने सावंतवाडीतून निघायला उशीर होणार त्यामुळे वेंगुर्ल्याला मुक्काम ठोकून दुसऱ्या दिवशी निघायचे अशा हिशोबाने मुक्कामाची तयारीही करून गेलो होतो.

पहिल्या राऊंड मध्ये बाय मिळाल्यानंतर अनिष चा सामना रत्नागिरीकराला हरवून सेकंड राऊंड मध्ये वरती आलेल्या सांगलीच्या समवयस्क मुलासोबत झाला. खेळायला बसताना तयारीने दोन खुर्च्या घेऊन बसनं, खेळताना खुर्चीच्या पुढच्या भागात ताठ बसून थोडं बोर्ड कडे झुकनं, मधल्या पिसवर कमालीचं नियंत्रण असणं, ब्लॉक पिसेस अत्यंत सफाईदारपणे मोकळ्या करून घेणं हे सारंच त्या मुलाच्या बाबतीत एकंदरीत इम्प्रेसिव्ह वाटत होतं. त्याचा गेमही अनिषपेक्षा काही अंशी सरस ठरला, अनिष त्याच्या समोर कमी पडला, सेकंड राऊंड मध्येच अनिषचा स्पर्धेतला खेळ संपला, मुक्कामाच्या तयारीने गेलो असूनही दुपारीच आम्ही आमचा गाशा गुंडाळला आणि साताऱ्याचा रस्ता धरला.

कमालीच्या हळव्या असलेल्या अनिषचा आपण हरलो म्हणून सांगतानाच कंठ दाटून आला आणि हो हो म्हणता काही सेकंदातच भावनांना मोकळे करणाऱ्या अश्रूधाराही डोळ्यांतून वाहू लागल्या. मग त्याचे सांत्वन करायला अर्थातच झालेल्या चुकांचा, आपण कुठे कमी पडलो या गोष्टींचा पाढा त्याच्या पप्पा आणि चाचु कडून वाचला गेला. त्यामध्ये त्याच्याकडून झालेल्या टाळता येण्यासारख्या शुल्लक चुकांबरोबर दोन ठळक मुद्दे असे होते की,

1) घरी खाली बसून मांडी घालून सराव करणे आणि स्पर्धेत खुर्चीवर बसून खेळणे हा मोठ्ठा फरक आणि

2) तो मुलगा एक सामना जिंकून आला असल्यामुळे कंपॅरिटिव्हली बऱ्यापैकी सेट होता आणि त्याचा आत्मविश्वासही वाढलेला होता, उलटपक्षी अनिषला पहिली बाय मिळाल्यामुळे तो त्याचा स्पर्धेतला पहिलाच सामना खेळत होता.

अर्थातच 'जो जीता वही सिकंदर' या आख्यायिके प्रमाणे त्या विजयाचे सारे श्रेय त्या मुलालाच जात होते पण झालेल्या पराभवामुळे थोड्या खचलेल्या लहान अनिषला पराभवाची सकारात्मक कारणमीमांसा करून वेळीच आत्मबळ देणेही तितकेच गरजेचे होते. त्या धर्तीवर आम्ही हा प्रयत्न केला खरा पण तो करत असताना इकडे विचारांनाही चारा मिळाला.

कालपर्यंत आम्हाला एवढ्या लहान वयात एवढं चांगलं खेळणाऱ्या अनिषच जे कौतुक वाटत होतं, ते स्पर्धेतले एकंदरीत चित्र पाहिल्यानंतर आसपासच्या जगाची सखोल माहिती नसताना आपण स्वतःच किंवा आपल्यांचं प्रेमापोटी केलेलं आंधळं कौतुक किती उथळ असू शकतं हे नकळत कळून जात होतं.

मान्य आहे की असं एखाद दुसऱ्या जय पराजयामुळे कोणाचं मूल्यांकन नक्कीच ठरत नसतं, पण प्रयत्नामध्ये पडलेल्या थोड्याशा कमतरतेमुळे वर जायला मिळालेल्या संधीचं सोनंही होत नसतं.

छंद, हौस, मजा म्हणून एखादा खेळ खेळणं आणि स्पर्धेत उतरून जिंकण्याचा ध्यास घेऊन, नकळत इतरांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन तो खेळ खेळणं या दोन गोष्टींना एका पारड्यात तोलनं कधीच शक्य नसतं.

अशा स्पर्धांमध्ये समोरच्या बरोबर स्पर्धा करणे ही नंतरची गोष्ट असते, स्वतःशी असलेली स्पर्धा आधी जिंकावी लागते. इथे बोर्डही तोच असतो, सोंगट्याही त्याच असतात आणि खेळणारेही आपणच असतो पण परिस्थिती नुरुप बदललेली मानसिकता मात्र कमालीची वेगळी असते.

स्वतःवर विजय मिळवत अशा स्पर्धेत उतरता नाही आलं तर अवघड पीस चे सोडा साधी पॉकेट वर पडायला टेकलेली पीस ही तुमच्या हाताला कंप आणि किंबहुना नाकावर घाम आणायची ताकद ठेऊन असते.

अशा तुल्यबळ स्पर्धात्मक लढतींमध्ये खासकरून जिथे प्रत्येक बोर्ड हा क्लोज फिनिश होतो तिथे तो कंप अन घाम मिनीमल ठेवायचा असेल तर त्यासाठी मॅक्सिमम डेडिकेटेड प्रॅक्टिस सारखा दुसरा पर्याय नसेल.

बोर्डवरची कोणतीही मोकळी सोंगटी पॉकेट मध्ये मारण्याचे कौशल्य असणे हे चांगल्या खेळाडूचे लक्षण असते,
बोर्डवरची कोणतीही मोकळी सोंगटी प्रत्येक वेळी तितक्याच सफाईदारपणे पॉकेट मध्ये मारण्याचे कौशल्य असणे हे दर्जेदार खेळाडूचे लक्षण असते,
तर बोर्डवरची कोणतीही मोकळी सोंगटी कोणत्याही परिस्थितीमध्ये तितक्याच सफाईदारपणे पॉकेट मध्ये मारणे हे स्पर्धात्मक खेळाडूचे लक्षण असते!

अनिष, लहानपणी झोनल बिनल सारख्या लेव्हल्स ही माहित नसलेल्या पप्पा चाचु सारखे चांगले खेळायला येणे, इंटर स्कुल जिंकून झोनल स्पर्धेत उतरायची संधी मिळणे यातच आनंद मानायचा का तो आनंद मानत आपला खेळ खऱ्या अर्थाने स्पर्धात्मक उंचीचा बनवण्यासाठी आपल्या खेळावर कायम असमाधानी राहून तो उत्तरोत्तर कसा वृद्धिंगत होईल याचा पाठपुरावा करायचा ही सर्वस्वी तुझी चॉईस आहे!

आत्ता क्लोजेस्ट गोल म्हणून त्या पाचगणीच्या आपल्याच झोन च्या मुलाने मोटिव्हेशन द्यायला खुल्या दिलाने बोललेलं वाक्य लक्षात ठेवायला हरकत नाही,

"फिकर मत करना, अगले साल अंडर सेव्हेंटिन में सबको ठोक देना!"

ऑल द बेस्ट!

- D For Darshan

 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...